गुरुवार, २४ मे, २०१२

Black and White

'नील'...  जॉन जवळ-जवळ धावतच नीलच्या अॉफिसमध्ये शिरणार तेवढ्यात त्याला लक्षात आलं की अॉफिसचा दरवाजा अोढून घेतलेला होता. दार उघडून जॉन आत  शिरला आणि क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं - इतकं की आपण नीलकडे का आलो ते सुद्धा तो विसरायच्या बेतात होता. समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की वैतागावं हेही कळेना... अॉफिसमधल्या मोठ्ठ्या मॉनिटर वॉलवर एरवी जेम्स वेब किंवा चंद्रा दुर्बिणीवरुन येणारं चित्र आणि जवळच भल्यामोठ्या व्हाईटबोर्डवर मोठ-मोठी समीकरणं यात हरवलेला नील हे नेहमीचं दृश्य. त्याऐवजी आज त्या वॉलवर मायकेल जॅकसन 'Black or White' च्या तालावर गात-नाचत होता आणि नील त्या गाण्यातल्या मॅकॉले कल्किनला इमिटेट करत होता. गाण्याचा आवाज इतका मोठा होता की नीलला हाक ऐकू आली असती तरच आश्चर्य! जॉननी आधी अॉफिसचं दार परत लावून घेतलं आणि गाणं कुठून ऐकू येतंय याचा शोध घेऊ लागला... पहिल्यांदा त्यानी नीलचा लॅपटॉप बघितला तर त्यावर नेहमीसारखं कामाचंच काहीतरी होतं. इकडे-तिकडे पाहिलं तर चक्क नीलच्या म्युझिक सिस्टीममधून ते कानठळ्या बसवणारं गाणं वाजत होतं. हेही एक आश्चर्यच कारण बहुतेकवेळा त्यातून व्हाईट नॉईज तरी ऐकू यायचा नाहीतर मंद सुरात भारतीय वाद्यसंगीत. जास्त विचार न करता आधी जॉननी ती म्युझिक सिस्टीम बंद केली आणि पाठोपाठ मॉनिटर वॉल. क्षणात सगळं इतकं शांत झालं की जॉननी सुटकेचा निःश्वास सोडला - जेमतेमच, कारण पाठोपाठ नील अोरडलाच 'कोणी बंद केलं गाणं?'