रविवार, २० जानेवारी, २०१३

तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे

काय गंमत आहे पहा! या आधीच्या लेखात मी म्हणाले की मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द मला भावतो आणि त्यामुळे त्याच्या आवाजातली मन व्याकुळ करणारी गाणी मनात ठाण मांडुन बसतात. तो लेख लिहिताना, ती गाणी एकीकडे गुणगुणताना माझं दुसरं मन मुकेशचीच अगदी दुसऱ्या टोकाची गाणी गुणगुणत होतं - प्रेमाच्या परमोच्च आविष्काराची गाणी! आणि गंमत म्हणजे ही गाणीही म्हणावीत तर मुकेशनीच. एकाच आवाजात पराकोटीचे दुःख आणि तितकेच उत्कट प्रेम या दोन्ही भावना अगदी सार्थपणे व्यक्त करण्याच सामर्थ्य असावं असं फार कमी होतं. पण मुकेशच्या आवाजात ही किमया फारच सहज वाटते. पण नमनाला घडाभर तेल कशाला? आपण वानगीदाखल काही गाणीच बघुया ना...

अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये...

एकेका आवाजात उपजतच दर्द असतो... त्या आवाजात इतरही अनेक प्रकारची गाणी आपल्याला आवडतात. त्यात त्याच आवाजातली प्रेमगीतं असतात, द्वंद्वगीतं असतात - ती ही छान प्रेमाची, उडत्या चालीची असतात, तशीच विरहाचीही असतात, भजनं असतात, गज़ल असतात, देशभक्तीपर गीतंही असतात. कधी चक्क शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणंही ऐकायला मिळतं तर बऱ्याच वेळा जीवन-मरणाच्या खेळावर, तत्त्वज्ञानाने भरलेलीही गाणी असतात. थोडक्यात काय, तर कोणत्याही हरहुन्नरी पार्श्वगायकाकडून चोखंदळ श्रोत्याची ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्या तो आवाज अगदी समर्थपणे पार पाडतो, ते ही कित्येक दशकं - अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! पण तरी या सगळ्यांत मनाला स्पर्शून जातो तो त्या आवाजातला उपजत दर्द... मुकेशची गायकी मला सगळ्यांत जास्त भावते ती त्याच्या या दर्दभऱ्या गाण्यांसाठी. तशी मुकेशच्या आवाजात वर म्हटलेली सगळ्या प्रकारची गाणी आहेत, अगदी माझ्या आवडीचीही! पण तरी माझ्या मनाला भिडतो तो त्या आवाजातला दर्दच.

तेरे बिन सूने नयन हमारे...

रफी आणि लता हे दोघेही माझे खूप आवडते गायक. त्यांनी दोघांनीही इतक्या प्रकारची, इतक्या विविध भावना व्यक्त करणारी आणि पडद्यावर इतक्या कलाकारांसाठी गाणी गायिली आहेत की नुसती यादी वाचुनही आपण दमतो आणि थक्क होतो. दोघांच्याही पार्श्वगायनाचा एक विशेष म्हणजे पडद्यावर गाणे कोणावर चित्रीत होणार आहे त्याप्रमाणे त्यांची गायकी बदलायची. दोघांचीही कारकीर्द प्रदीर्घ, दोघांनीही बिनीच्या आणि अनवट अश्या दोन्ही प्रकारच्या संगीतकारांकडे पार्श्वगायन केलं. दोघांच्याही आवाजाच्या रेंजला जणू बंधनंच नाहीत. एकेकाळी दोघांनीही हिंदी चित्रपटगायनावर राज्य केलं, जणू अन्य कोणी गायक नसावेतच! त्यामुळे त्या दोघांनी एकत्र गायलेली गाणीही असंख्य - संख्येने, रचनाकारांच्या दृष्टीने, पडद्यावर ती गाणी साकार करणाऱ्या कलाकारंच्या विविधतेने त्यांची गाणी जितकी गाजली ते केवळ अजोड आहे. अर्थात त्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांची गाण्याची तयारी आणि शिवाय एकमेकांना पूरक असे त्यांचे आवाज. गाण्यांच्या बाबतीत का कोणास ठाऊक, पण माझा अधिक अोढा दुःखद, विरहाच्या गाण्यांकडे अधिक. तेव्हा आज माझ्या या दोन आवडत्या गायकांनी गायलेल्या अश्याच काही मन व्याकूळ करणाऱ्या, हुरहूर लावणाऱ्या गाण्यांची आठवण काढते आहे. रफीचे अकाली निधन झाले नसते तर कोणास ठाऊक यांत आणखी किती भर पडली असती! हा विचार ती हुरहूर आणखीच वाढवतो...