मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

दीर्घकथा?

माझ्या ‘नवी पहाट’ या विज्ञेनकथेचे भाग टाकताना मी लिहिले होते की ही मला दीर्घकथा का वाटते ते सांगेन. पण मध्यंतरी पुलाखालून पूर वाहून गेला; जाताना बरोबर पूलही घेऊन जाईल का इतका मोठा. त्यामुळे ते लिहिणे झालेच नाही. आज बरेच दिवसांनी ब्लॉगवर नजर टाकली तर वाटलं की निदान माझ्या मनात काय आहे हे थोडक्यात तरी लिहावे. साहित्यिकदृष्ट्या ते योग्य असेल असे नाही - पण एखादी कथा ही दीर्घकथा आहे म्हटल्यावर वाचक म्हणून माझ्या तिच्याकडून काय अपेक्षा असतात तेवढे तरी मी मांडू शकते.


मी लिहिल्याप्रमाणे "क्षणकथा, रुढार्थाने वाचक जिला कथा म्हणतो ती कथा, दीर्घकथा, कादंबरी - या सगळ्यांत फरक केवळ त्यांच्या लांबीचा नाही. केवळ लेखकाने एखादी कथा पन्नास पृष्ठे भरतील एवढी मोठी लिहिली म्हणजे ती दीर्घकथा होत नाही. किंवा केवळ पान-दीड पानात लिहिली तर ती क्षणकथा होत नाही. थोडक्यात साहित्य-निर्मितीचेही आपले असे तंत्र आहे.”


दीर्घकथेत मला काही गोष्टी आवश्यक वाटतात. 

१. दीर्घकथा ही मुळात कथा असायलाच हवी - लेख/ नुसतीच विचारांची शृंखला नव्हे. 

२. कथेची लांबी निव्वळ बरीच पृष्ठे भरतील अशी असणं पुरेसं नाही.

३. दीर्घकथेत निरनिराळे आयाम, आकर्षबिंदू असायला हवेत. हे सगळे आयाम, आकर्षबिंदू कथेने उलगडायचा निदान प्रयत्न करायला हवा - प्रत्येक वेळी ते सगळे पूर्णत्वाला नेता येणं कथावस्तूला जमेलच असं नाही पण निदान त्यांना कथेत त्यांचं स्वत:चं असं अस्तित्त्व हवं.

४. आयाम/ आकर्षबिंदू अनेक असले तरी संघर्षाचं कारण ते सगळे किंवा एकाहून जास्त असायला हवेत असे बाही.


“नवी पहाट” या विज्ञानकथेचा विचार करता पहिले दोन मुद्दे कथेला लागू पडतात याबद्दल शंका असण्याचं कारण मला दिसत नाही.


आयाम किंवा आकर्षबिंदूंचा विचार केला तर विप्लविचं पौगंडावस्थेत पदार्पण सर्वसाधारण वयापेक्षा लवकर होणं, त्यासाठी आई/ आजीने तिला झेपेल अश्या भाषेत त्याचा अर्थ तिला उलगडून सांगणं आणि तरी ते सगळं समजण्याइतका मेंदू परिपक्व नसल्यामुळे (शरीराची आणि मेंदूची वाढ एकाच गतीने होत नाही) तिच्यात खोल मानसिक तणाव निर्माण होऊन शेवटी मानसोपचाराची मदत घ्यावी लागणं हा मुख्य आकर्षबिंदू आणि कथेतील संघर्षाचा भाग झाला.


पण त्यापलिकडे जाऊन कथा इतर अनेक सामाजिक, मानसिक पातळींवर जाण्याचा प्रयत्न करते.


कथेमधली नाती ही आपण सर्वसाधारणपणे आपल्या अवती-भवती पाहतो त्यापेक्षा जास्त परिपक्व, विश्वासाचं आणि प्रेमाची आहेत. हे केवळ कथेत काही सुंदर, छान, कल्पनारम्य असावं यासाठी नाही. अशी मोजकी का होईना माणसं मी पाहिली आहेत, अनुभवली आहेत. तुरळक असतील, त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न, आपल्या आवडी/ विचारांना मुरड घालणं हे ही करावं लागत असेल. पण काही कारणानी थोड्या लोकांना का होईना असे ऋणानुबंध निर्माण करणं आणि टिकवणं जमतं. कथेच्या दृष्टीने पाहिलं तर त्यातला मुख्य विषय अत्यंत नाजूक आणि विप्लविच्या संबंधांत येणाऱ्या सगळ्यांचीच कसोटी पाहणारा आहे. त्यामुळे तिच्या भोवतीची माणसं, नाती ही अशी विरळा प्रेमाची असण्यानी थोडा तोल सांभाळायला उपयोग होतो.


सुभाष आणि वसुंधराच्या आयुष्यात विप्लवि येण्याआधी जो अत्यंत कठीण आणि कसोटीचा काळ येऊन गेला तो मात्र अगदीच विरळा, अशक्यातला नाही. अशी कितीतरी जोडपी आहेत ज्यांना हवं असताना, वैद्यकीय दृष्ट्या काही अडचण नसताना अपत्यप्राप्ती होत नाही. कधी जोडीतली एक किंवा दोघेही कोलमडतात, कोषात जातात तर कधी नाईलाजाने दोघं दोन दिशांनी आयुष्याचा प्रवास करायला लागतात या ताणामुळे. 


ह्यूस्टनच्या चर्चच्या फादरसारख्या व्यक्ती इथे अमेरीकेत राहून मी स्वत: पाहिलेल्या, परिचयाच्या आहेत. केवळ त्यांच्या धर्मात बसत नाही ते सगळं तोडून-मोडून-फेकून देण्याच्याच लायकीचं आहे असं न मानता इतर धर्म, श्रद्धा यांचा मान ठेवणारे, त्यांच्याबद्दल कुतूहल असणारे प्रीस्ट माझ्या स्वत:च्या परिचयातही आहेत. आणि विप्लविला सुभाष-वसुंधरा हिंदू म्हणून वाढवणार म्हटल्यावर धार्मिक आणि राजकीय समीकरणं, कधी वैचारीक तर कधी शारीरिक हिंसेला सामोरं जाऊन सोडवावी लागतात हे ही तितकंच सत्य आहे. माझ्या वाचनाप्रमाणे हे अमेरीकेपुरतं किंवा ख्रिश्चन धर्मापुरतंच मर्यादित नाही. या प्रीस्टच्या व्यक्तिमत्त्वाच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा भीतिदायक दबाव टाकणारा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्यामुळे धर्म म्हणून जे मानलं जातं ती केवढी मोठी सत्ता आहे हे ही मला दाखवायचं होतं.


मुलं झाल्यावर किंवा आई-वडिल वयस्कर झाल्यावर स्वदेशी कायमचं परत जायचा निर्णय घेणं कठीण असलं तरी करणारी कुटुंबही असतात. अनेक वर्षं दुसऱ्या देशात राहिल्यावर पुन्हा स्वदेशी जाताना अश्या कुटुंबांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. दुसऱ्या देशात राहात असताना जश्या अडचणी आपल्या-आपणच सोडवाव्या लागतात त्याप्रमाणेच आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि जबाबदारीही असते. स्वदेशी परत गेल्यावर अडचणीला मदत करायला माणसं मिळू शकतात; पण तसंच तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जाऊही शकतं, स्वभाव मुळचा जरी एकलकोंडा असला तरी परत गेल्यावर त्याला वेगवेगळी लेबल लागू शकतात, परदेशी ज्या राहणीमानाची सवय असेल ते स्वदेशी परत गेल्यावर मिळेलच याची खात्री नसते (हे लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर इकडे ३-४ हजार स्क्वेअर फूटांच्या स्वतंत्र बंगल्यात राहणारा मित्रवर्ग आहे 😀). तेव्हा ये तडजोडी खऱ्या, प्रामाणिक असतात, त्यातून उद्भवणारे प्रश्नही तितकेच खरे असतात!


कथेत विप्लविचा प्रवेश झाला तो वसुंधरेने आसुसून तिला आपलं मानलं म्हणून; पण नंतर एरवीही आपण पाहतो-अनुभवतो ते वडिल आणि मुलगी यांच्यातलं लोभस नातं जे इथेही आहे ते अगदी ज्यांनी अनुभवलंय त्यांना आनंद देऊन गेलं असेल. पण विप्लविच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं ते पाहून कोलमडलेला-हादरलेला सुभाष सहसा दिसत नाही आणि तेच बरं आहे… इतके सुंदर बंध असे तटातट तुटताना होणाऱ्या वेदना आणि ते का तुटताहेत हे नीट न कळल्यामुळे येणारी हताशा हा एका वेगळ्या कथेचा विषय होऊ शकेल कदाचित.


सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या कथेतील विप्लविचा प्रश्न हा प्रत्यक्षात शारीरिक आणि सामाजिक प्रश्न आहे! जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे असेल, पण मुलींचं पौगंडावस्थेत प्रवेश करण्याचं वय कमी-कमी होत चाललं आहे. त्यातून निर्माण होणारे मानसिक, शारीरिक, सामाजिक प्रश्न जास्त गुंतागुंतीचे आहेत कारण कौटुंबिक व्यवस्था, गतीमान आयुष्य, अगदी लहान वयापासून तंत्रज्ञानाशी होणारी ओळख, त्या वयात मुलांची सर्वांगीण वाढ न झाल्यामुळे चांगले-वाईट ठरवता न येणे या सगळ्यांमुळे जे प्रश्न उभे राहताहेत ते आपल्याच सोडवायचे आहेत. त्यात वैद्यकीय शास्त्राला अजुनही मानवी शरीराची कितीतरी कोडी उलगडलेली नाहीत. कित्येक ठिकाणी मानसिक तज्ञांची मदत घेणं हे अजुनही कमीपणाचं मानलं जातं किंवा अशी गरज असू शकते हे ही नाकारलं जातं. त्यामुळे समस्या गंभीर आहेच - फक्त आशा कधी सोडू नये म्हणून एक लेखक म्हणून मी विप्लविच्या भोवती चांगली माणसं उभी करुन निदान तिचा प्रश्न तरी सुटण्याची शक्यता उभी करु शकते.


तर “नवी पहाट” ही माझ्या दृष्टीने दीर्घकथा का याची माझी कारणं ही आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे साहित्य-प्रकार, त्यांच्या व्याख्या, शाखा, समीक्षा या गोष्टीचा माझा अभ्यास नाही. वाचनातून जे कळलं, त्या अनुषंगाने जे थोडं वाचलं-समजलं त्यावरच माझं मत तयार झालं आहे. तुम्हांला काय वाटतं? साहित्य हा विषय शिकलेल्या, त्यातल्या बारकाव्यांशी ओळख असलेल्या किंवा आवड म्हणून हे सगळं जाणून घेतलेल्यांच्या मताबद्दल खास उत्सुकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा