लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

आँखों को निचोड़ा मै ने बहुत, पर कोई आँसू उतरा नहीं

या आधी 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा...' या लेखात लताच्या काही घनव्याकुळ गाण्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता. पण तशी आणि तितकीच आवडणारी इतकी गाणी लताने गायली आहेत की तो लेख लिहितानाच माहीत होतं की केवळ एका लेखात संपणारं वेड नाही हे. पुर्वी जशी बिनाका गीतमाला असायची तशी लेखमाला लिहिली तरी दोन-चार गाणी राहूनच जातील... त्यामुळे लताच्या आवडत्या गाण्यांवर आणखी काही लेख तरी नक्की लिहायचे असं तेव्हा ठरवूनच टाकलं होतं; पण आपण ठरवलं आणि तसं खरंच घडलं असं किती वेळा घडतं? दरम्यानचा काळ दुसऱ्या एका वेडाने पछाडलं होतं. सध्या ते थोडं मागे पडलंय, तेव्हा म्हटलं या मूळ वेडाकडे जरा परत वळून पहावं.

रविवार, २० जानेवारी, २०१३

तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे

काय गंमत आहे पहा! या आधीच्या लेखात मी म्हणाले की मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द मला भावतो आणि त्यामुळे त्याच्या आवाजातली मन व्याकुळ करणारी गाणी मनात ठाण मांडुन बसतात. तो लेख लिहिताना, ती गाणी एकीकडे गुणगुणताना माझं दुसरं मन मुकेशचीच अगदी दुसऱ्या टोकाची गाणी गुणगुणत होतं - प्रेमाच्या परमोच्च आविष्काराची गाणी! आणि गंमत म्हणजे ही गाणीही म्हणावीत तर मुकेशनीच. एकाच आवाजात पराकोटीचे दुःख आणि तितकेच उत्कट प्रेम या दोन्ही भावना अगदी सार्थपणे व्यक्त करण्याच सामर्थ्य असावं असं फार कमी होतं. पण मुकेशच्या आवाजात ही किमया फारच सहज वाटते. पण नमनाला घडाभर तेल कशाला? आपण वानगीदाखल काही गाणीच बघुया ना...

अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये...

एकेका आवाजात उपजतच दर्द असतो... त्या आवाजात इतरही अनेक प्रकारची गाणी आपल्याला आवडतात. त्यात त्याच आवाजातली प्रेमगीतं असतात, द्वंद्वगीतं असतात - ती ही छान प्रेमाची, उडत्या चालीची असतात, तशीच विरहाचीही असतात, भजनं असतात, गज़ल असतात, देशभक्तीपर गीतंही असतात. कधी चक्क शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणंही ऐकायला मिळतं तर बऱ्याच वेळा जीवन-मरणाच्या खेळावर, तत्त्वज्ञानाने भरलेलीही गाणी असतात. थोडक्यात काय, तर कोणत्याही हरहुन्नरी पार्श्वगायकाकडून चोखंदळ श्रोत्याची ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्या तो आवाज अगदी समर्थपणे पार पाडतो, ते ही कित्येक दशकं - अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! पण तरी या सगळ्यांत मनाला स्पर्शून जातो तो त्या आवाजातला उपजत दर्द... मुकेशची गायकी मला सगळ्यांत जास्त भावते ती त्याच्या या दर्दभऱ्या गाण्यांसाठी. तशी मुकेशच्या आवाजात वर म्हटलेली सगळ्या प्रकारची गाणी आहेत, अगदी माझ्या आवडीचीही! पण तरी माझ्या मनाला भिडतो तो त्या आवाजातला दर्दच.

तेरे बिन सूने नयन हमारे...

रफी आणि लता हे दोघेही माझे खूप आवडते गायक. त्यांनी दोघांनीही इतक्या प्रकारची, इतक्या विविध भावना व्यक्त करणारी आणि पडद्यावर इतक्या कलाकारांसाठी गाणी गायिली आहेत की नुसती यादी वाचुनही आपण दमतो आणि थक्क होतो. दोघांच्याही पार्श्वगायनाचा एक विशेष म्हणजे पडद्यावर गाणे कोणावर चित्रीत होणार आहे त्याप्रमाणे त्यांची गायकी बदलायची. दोघांचीही कारकीर्द प्रदीर्घ, दोघांनीही बिनीच्या आणि अनवट अश्या दोन्ही प्रकारच्या संगीतकारांकडे पार्श्वगायन केलं. दोघांच्याही आवाजाच्या रेंजला जणू बंधनंच नाहीत. एकेकाळी दोघांनीही हिंदी चित्रपटगायनावर राज्य केलं, जणू अन्य कोणी गायक नसावेतच! त्यामुळे त्या दोघांनी एकत्र गायलेली गाणीही असंख्य - संख्येने, रचनाकारांच्या दृष्टीने, पडद्यावर ती गाणी साकार करणाऱ्या कलाकारंच्या विविधतेने त्यांची गाणी जितकी गाजली ते केवळ अजोड आहे. अर्थात त्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांची गाण्याची तयारी आणि शिवाय एकमेकांना पूरक असे त्यांचे आवाज. गाण्यांच्या बाबतीत का कोणास ठाऊक, पण माझा अधिक अोढा दुःखद, विरहाच्या गाण्यांकडे अधिक. तेव्हा आज माझ्या या दोन आवडत्या गायकांनी गायलेल्या अश्याच काही मन व्याकूळ करणाऱ्या, हुरहूर लावणाऱ्या गाण्यांची आठवण काढते आहे. रफीचे अकाली निधन झाले नसते तर कोणास ठाऊक यांत आणखी किती भर पडली असती! हा विचार ती हुरहूर आणखीच वाढवतो...


गुरुवार, ७ जून, २०१२

मैं तवायफ़ हूँ, मुजरा करुँगी

नगरवधू, देवदासी, तवायफ़ - काल आणि संस्कृती कोणतीही असो; वेगवेगळ्या नावानी या स्त्रिया समाजाचे (म्हणजे मुख्यतः पुरुषांचे) रंजन करत आल्या. या सगळ्या स्त्रियांचं खरं काम खरोखरच रंजन करणे इतकेच अपेक्षित होते, कारण या सगळ्या चित्रकला, नृत्य, गायन, काव्य, संभाषण या आणि अशा कलांचा अभ्यास असलेल्या. तेच त्यांचं उपजिविकेचं साधन. पण दुर्दैवाने त्यांचं नाव मात्र निगडित झालं ते समाजाने आणि परिस्थितीने त्यांच्यावर लादलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीशी! त्यांच्यातले हे गुण जणू समाधान करायला अपुरे पडल्यासारखे त्यांच्यावर भलतेच काम लादले गेले आणि नगरवधू, देवदासी, तवायफ़ हे सगळे शब्द वेश्याव्यवसायाशी जोडले गेले. साधारणपणे चित्रपट हे सामाजिक जीवनाचा आरसा असतात, त्यामुळे हिंदी चित्रपटातली 'तवायफ़' ही नृत्य-गान (क्वचित काव्य) निपुण असली तरी मुख्यतः आपल्यासमोर येते वेश्येच्या स्वरुपातच. काही अपवाद वगळता हिंदी चित्रपट गाण्यांशिवाय पुढे सरकतच नाही आणि कधी कधी ते शब्द या तवायफ़ची कैफियत आपल्यापर्यंत पोहोचवतात. अश्याच काही मुजरा नृत्य-गीतांची ही आठवण...

रविवार, २२ एप्रिल, २०१२

इशारों इशारों में दिल लेनेवाले...

लताच्या गाण्यांवर लागोपाठ दोन लेख लिहिलेले पाहून बहिणीने मुद्दाम फोन करुन निषेध व्यक्त केला - म्हणाली, 'तुला माहितिये मला आशा जास्त आवडते म्हणून मुद्दाम मला चिडवायला लतावर लेख लिहिलेस ना?' तिची समजूत घालताना माझी पुरेवाट झाली! तरी तिला सांगून पाहिलं की बये, दुसरा लेख दोघींनी म्हटलेल्या गाण्यांवर लिहिलाय ना... पण बाईसाहेब अश्या काही फुरगंटून बसल्या, काही केल्या पटेचना. शेवटी म्हटलं, बरं, मग आता काय लिहू तूच सांग. म्हणाली की आशा-रफी अशा द्वंद्वगीतांवर लिही काहीतरी आणि मग फोन कर. तोवर केलास तर तुझ्या मेहुण्यांशी, भाचरांशी बोल... आता अशी धमकी दिल्यावर बाईसाहेबांची मर्जी सांभाळणं भाग आहे, तेव्हा ताई, हा लेख खास तुझ्यासाठी!

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

तीनी सांजा सखे मिळाल्या...

संध्याकाळची वेळ फार विचित्र असते नाही? त्यातून कालच्यासारखी आज नसते आणि आजच्यासारखी उद्या... खरं तर सूर्य नुकताच क्षितिजाखाली गेलाय आणि आकाशात एखादी चांदणी नुकतीच डोकावतेय, चंद्राच्या आगमनाची चाहूल देतेय यापेक्षा फार काही वेगळं बाहेर घडत नसतं. जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.

या वेळेला कातरवेळ म्हणतात ते काही उगीच नाही! दिवस-रात्रीच्या सीमारेषेवर, धड दिवसाचा लख्ख प्रकाश नाही की चंद्राचं शीतल चांदणं नाही अशा वेळेस अोळखीच्या वाटा वेगळ्या दिसतात. आपल्याच बागेतल्या झाडांच्या सावल्या भिववतात. आठवणींच्या गोफाच्या धाग्यांचा नुसता गुंता होतो. नेमक्या नको त्या आठवणीच का येतात अशा वेळी? त्याही एकेकट्या नाही... सोबतीला जणू सगळ्या वेदना, सगळे निःश्वास, मनाच्या खोल कप्प्यात पार दडपून बंद केलेल्या आठवणी उफाळुन वर येतात, जणू बजावतात, आम्ही आहोत अजून; असं बंद दरवाज्यामागे ढकललंस म्हणून आम्ही तुझी साथ सोडू असं वाटलं की काय तुला? बहुधा म्हणूनच मन सारखं म्हणत असतं 'या कातरवेळी पाहिजेस तू जवळी'... कारण एकटं असलं की संध्याकाळ अशी अंगावर येते... त्यात बाहेर पावसाने थैमान मांडलेलं असावं! नको-नको होतं नुसतं. तो पाऊस नक्की बाहेरच पडतोय ना? की डोळ्यांत न मावणाऱ्या अश्रुंमुळे तसं वाटतंय? ढगांत उगीचच चित्रविचित्र आकार दिसू लागतात, वीजांच्या रेघांनी क्षितिज उजळुन निघतं तेव्हा तर ती वीज जणू आपल्यावरच पडतेय असं वाटतं. अशा वेळी असहाय्य मन जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या जीवासारखं होतं...

गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

अो चाँद जहाँ वो जाये...

दोन बहिणी... खरं तर चार; पण याच दोघींवर सगळ्यांच प्रेम आणि लक्ष केंद्रित होतं. अर्थात त्याला कारणंही अनेक आहेत, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखं या जगात कोणी नाही... याआधी झालं नाही आणि पुढचं कोणी पाहिलंय? मजा म्हणजे त्या दोघींमध्येही फारसं साम्य नाही. दोघींची गाण्याची जात निराळी, अदा निराळी, पेशकारी निराळी; इतकंच काय, पण दोघींच्या आवाजातला दर्दही निराळा... मोठीने अगदी टिपीकल फिल्मी गोष्टीसारखं वडिलांच्या अकाली निधनानंतर कोवळ्या वयातच सगळ्या घराची जबाबदारी घेऊन, भावंडांना लहानाचं मोठं केलं, आईचा सांभाळ केला; ज्या-ज्या भावंडांची इच्छा होती, त्यांचे संसार मांडून दिले आणि आपण मात्र व्रतस्थ योग्यासारखी संगीतसाधना करत राहिली, जीव अोतून गात राहिली. कितीतरी भावना स्वतः न अनुभवतादेखिल असा एकही भाव नसेल जो तिने समर्थपणे आपल्यासमोर मांडला नाही; जणू तिचं स्वतःचं आयुष्य ती त्या गाण्यांमधून जगत असावी इतक्या आर्ततेने.

दुसरी त्याच टिपीकल फिल्मी गोष्टीत असते तशी बंडखोर आणि मनस्वी निघाली. लहान वयात सगळ्यांचा विरोध झुगारुन देऊन तिने लग्न केलं. नवरा कसलीच जबाबदारी घेत नाही म्हटल्यावर संसार-मुलं सांभाळण्यासाठी जे जे कष्ट पडतील ते उचलले. वारशाने तिलाही मिळाली ती फक्त गानकला. तेव्हा तेवढं एकच उपजिविकेचं साधन तिच्याकडे होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जी मिळतील ती गाणी गायली, अगदी कोरसमध्येसुद्धा! हळुहळु तिच्या आवाजाचं सामर्थ्य आणि मुख्य म्हणजे त्यातली विविधता लोकांसमोर आली आणि तिची स्वतंत्र अोळख निर्माण व्हायला लागली. आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य ती स्वतःच्या तत्त्वांनुसारच जगली. तिनेही अफाट संगीतसाधना केली, तीही कायमच जीव अोतून गात राहिली. फरक इतकाच, जीवनातील बऱ्या-वाईट अशा सगळ्या प्रकारच्या प्रसंगांतून तावून-सुलाखून निघाल्यामुळे तिची गाणी अगदी वेगळ्याच तेजाने झळाळली. तिनेही गाण्यातून व्यक्त केली नसेल असा भाव नाही. काय गायली नाही ती? प्रेमगीतं, विरहगीतं, आईने म्हटलेली गाणी, मुलाने म्हटलेली गाणी, बालगीतं, पडद्यावर जुगलबंदी असलेली गाणी, कव्वाली, गज़ल, क्लब साँग, अाणि मुख्य म्हणजे तिच्यावतीने वडिलांना जणू श्रद्धांजलीच अशी नाट्यगीतं.

दोघी बहिणींचे चाहते अक्षरशः न मोजता येण्यासारखे! आणि तेही किती कडवे असावेत - तर ही बहीण जास्त चांगली गाते की ती यावरून जवळपास महायुद्ध सुरू होऊ शकतं! कधी वाटतं, चाहत्यांच्या या अशा प्रतिक्रिया वाचून त्यांची चांगलीच करमणूक होत असेल. दोन सुरांत डावं-उजवं ठरवता येतं का? सरस्वती आणि गणपती दोन्ही ज्ञानाच्या, विद्येच्या, कलांच्या देवता. त्यातली कोणती देवता श्रेष्ठ? शैव आणि वैष्णव यांचं अजिबात पटत नाही, त्याची आठवण होते मला... विश्वाचं धारण-पोषण करणारा विष्णू आणि विश्वात अमंङल, पाप यांचं साम्राज्य वाढू लागल्यावर नवनिर्मितीसाठी त्याचा विनाश करणारा शिव यांत कोणी लहान-मोठं आहे का?

तर - या दोघींनी अनेकोनेक गाणी जवळपास सगळ्या भाषांत गायिली, जवळपास सर्व संगीतकारांकडे गायिली, सगळ्या सहगायकांबरोबर गायिली पण लता आणि आशा यांनी एकमेकींबरोबर मोजकीच गाणी गायिली. तेही बरोबरच आहे म्हणा! आपल्याला जरी कितीही आवडली त्यांनी एकत्र गायिलेली गाणी ऐकायला, तरी गाण्याशी संबंधित बाकी सगळ्यांसाठी ते दोन शिवधनुष्य एकदम उचलण्यासारखं आहे. अशाच काही गाण्यांची आठवण काढायचं मनात आहे.

जब जब तुम्हें भुलाया - गाण्याची सुरुवात होण्यापुर्वीच्या प्रसंगात अौरंगजेब आपली मुलगी जहाँ आरा हिला वाढदिवासानिमित्त भेटी देतो आणि सांगतो की खास तिच्यासाठी दरबारात मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. गाण्याच्या सुरुवातीला दोन नर्तकींपैकी मिनु मुमताज एक शायरी पेश करते, 'मैं तेरी नज़र का सुरुर हूँ, तुझे याद हो के ना याद हो...' जहाँ आरा एकदम चमकते कारण ती गज़ल तिच्या प्रियकराने लिहिलेली असते. तलत महमूदच्या आवाजात ती गज़ल आपल्या अोळखीचीही आहे. प्रत्यक्ष गाण्याला आणि नृत्याला सुरुवात होईपर्यंत जहाँ आराचा मैफिलीमधला रस निघुन जाऊन त्याची जागा एक प्रकारच्या व्याकुळतेने, विषण्णतेने घेतलेली असते. पण आपल्यासाठी मात्र गीत आणि नृत्याची मेजवानीच सुरु होते! मिनु मुमताजच्या अोळी लताने आणि कोवळ्या अरुणा ईराणीच्या अोळी आशाने म्हटल्या आहेत. तशी या चित्रपटाची सगळीच गाणी गाजली. अर्थात मदन मोहनचे संगीत असल्यावर यात विशेष असं काहीच नाही. पण प्रसंग आनंदाचा, अतिशय सुंदर कत्थकच्या अंगाने जाणारे नृत्य आणि गाण्याचे शब्द मात्र जीवघेणे हे असं रसायन खूपच विरळा.

मरने की आरजू में हम जी रहे ऐसे, हम जी रहे ऐसे
जैसे के लाश अपनी, खुद ही कोई उठाये

जहाँ आराच्या मनातली खळबळ समजल्यामुळे जणू तिला वाट देण्यासाठी या अोळी लिहिल्या असव्यात असं मला नेहमी वाटतं. पडद्यावर माला सिन्हाने आपल्या अभिनयाने, मिनु मुमताज आणि अरुणा ईराणी या नृत्यकुशल अभिनेत्री असल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर गाण्याचे भाव आरशासारखे दिसतात. माझं प्रचंड आवडतं गाणं - बघायलाही आणि अर्थातच ऐकायला.

कर गया रे, कर गया मुझ पे जादू - बसंत बहार हा चित्रपट मुख्यतः मन्ना डेंनी गायलेल्या एकाहून एक सरस शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. संगीत हाच जणू प्राण मानणारा गोपाल आणि त्या शहरात दुर्दैवाने एका नृत्यगृहात सापडलेली गोड गळ्याची आणि सुंदर नृत्य करणारी गोपी यांच्या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा धागा गोपालच्या संस्थानातील सर्वश्रेष्ठ गायक होण्याच्या महत्त्वाकांक्षेशी अशातऱ्हेनी जोडला गेला आहे की एकाला दुसऱ्यापासून वेगळं करणं अशक्य! काही कारणाने (आता प्रेमिकांची भांडणं आणि रुसवे-फुगवे इतक्या असंख्य आणि भलभलत्या कारणांवरुन होतात की 'काही कारण' हे पुरेसं आहे, मला वाटतं) गोपी आणि गोपाल यांच्यात गैरसमज आणि अबोला होतो. तिची आई असल्याचा बहाणा करणारी त्या नृत्यगृहाची मालकीण गोपीच्या भेटीचा आणि तिचं गाणं ऐकण्याचा मोबदला म्हणून गोपालकडून पाच हजार रुपये मागते. तेव्हा स्वतःचा आवाज गहाण ठेवून गोपाल ते पैसे देतो. हे काहीच माहीत नसलेली आणि त्यामुळे गोपालवरची नाराजी कायम असलेली गोपी आणि तिची सखी चित्रा हे गाणं म्हणतात. चित्राची भूमिका करणाऱ्या कुमकुमच्या नृत्यातही तिचं गोपीवरचं बहिणीसारखं प्रेम आणि गोपालवरचा राग सहज कळतो. गोपीच्या भूमिकेतील निम्मी आणि कुमकुम यांच्या तोंडचं हे गाणं गोपीची कैफियत गोपालपर्यंत पोहोचवण्याचं काम किती छान करतं! कर गया रे, कर गया मुझ पे जादू, सांवरिया । ये क्या किया रे, गज़ब किया रे, चोर को समझी मैं साधु, सांवरिया, कर गया मुझ पे जादू

बालम ये सब है तुम्हारे ही कारन
मैफिल में नाचे तुम्हारी पुजारन
मत पूछो दिल किधर गया

'जब जब तुम्हें भुलाया' मध्ये गाण्याचा भर लतावर आणि नृत्याचा भर मिनु मुमताजवर आहे. आशाचा गाण्यातला सहभाग आणि अरुणा ईराणीचा नृत्यातला सहभाग हा मुख्य चित्राला महिरपीची सजावट असावी तसा आहे. अर्थात महिरप मुख्य चित्राइतकीच सुरेख आणि सुरेल असल्याने दोन्ही एकमेकांना खुलवतात.  तसं इथे होत नाही; लता आणि आशा बरोबरीने गातात. कदाचित निम्मी आणि कुमकुम जिवलग मैत्रीणी - अगदी काही गुपीत एकमेकींत नसलेल्या - असल्याने तसं असेल, पण त्यामुळे आशाच्या आवाजाची बहार लताच्या बसंताला अगदी इतकी साथ देते की डावं-उजवं करणं कठीण व्हावं; खरं तर अशा गोष्टीत डावं-उजवं करायचा विचारही करु नये कारण ते अशक्य तर आहेच पण अन्यायकारकही आहे.

मन क्यों बहका रे बहका - १९८४ सालचा 'उत्सव' हा चित्रपट अनेक अर्थानी व्यावसायिक हिंदी चित्रपटाची ठराविक चौकट मोडतो. चित्रपट शुद्रक-लिखित 'मृच्छकटिक' आणि भासाने लिहिलेल्या 'चारुदत्त' या नाटकांवर आधारित आहे. गिरीश कर्नाडनी या दोन नाटकांचा संगम करुन अप्रतिम पटकथा लिहिली आहे. चित्रपटाच्या निर्मितीत शशी कपूरने कसलीही कसर सोडली नाही किंवा काटकसर केली नाही. वसंतसेनेचे दागिने असोत, प्रत्येक छोट्या-मोठ्या पात्राची वेशभूषा-रंगभूषा असो, छायाचित्रण असो किंवा अभिनेत्याची पात्रांसाठी निवड असो - गिरीश कर्नाड आणि शशी कपूर यांनी घेतलेले कष्ट, केलेलं संशोधन एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान देतो. या गाण्याबद्दल बोलायचं तर त्याची पार्श्वभूमी आपण स्वप्नातही कल्पना करणार नाही अशी आहे. चारुदत्त्ताची पत्नी माहेरी गेल्याची संधी मिळाल्यामुळे वसंतसेनेला रात्र चारुदत्ताबरोबर त्याच्याच घरी घालवायची संधी मिळते. सकाळी चारुदत्त काही कामासाठी बाहेर पडतो, वसंतसेना अजुन रात्रीच्या आठवणीत हरवलेली असते. अचानक शयनगृहाचा दरवाजा उघडुन एक अगदी साध्या वेषातील तरुण स्त्री हातात काहीतरी घेऊन येते. वसंतसेना तिला विचारते की ती चारुदत्ताची दासी आहे का. त्यावर तिला (आणि आपल्यालाही) अगदीच अनपेक्षित उत्तर मिळतं. ती स्त्री सांगते की ती चारुदत्ताची पत्नी आहे आणि सांपत्तिक स्थिती फार चांगली नसल्यामुळे वसंतसेनेच्या स्नान-श्रृंगारासाठी ती फक्त चंदनाचा लेप तेवढा आणू शकली. वसंतसेना चमकते, अवघडते; तिला विचारते की ती माहरी गेली होती ना? पत्नी हसून म्हणते, 'हो, पण मला माहीत होतं की मी नसले की तू येशील आणि वसंतसेनेला भेटण्याची संधी एरवी कशी मिळणार; म्हणून मी लवकर परत आले.' नंतर पत्नीच्या भूमिकेतील अनुराधा पटेल रेखाच्या वसंतसेनेला श्रृंगार करायला मदतही करते आणि त्यावेळेस दोन मैत्रिणींनी एकत्र गाणं म्हणावं तसं हे गाणं - 'मन क्यों बहका रे बहका आधी रात को? बेला महका रे महका आधी रात को'. या चित्रपटाची गाणी वसंत देवांनी लिहिल्यामुळे हिंदी भाषेचं सौंदर्य अधोरेखित होतं, शिवाय त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्त्वामुळे चित्रपटाचा काळ, एकूण मूड फार छान जपलं गेलं आहे.

झाँझर झमके सुन, झमके आधी रात को
उसको टोको न रोको आधी रात को
लाज लागे रे लागे आधी रात को
बिना सिंदूर सोऊँ आधी रात को

बात कहते बने क्या आधी रात को
आँख खोलेगी बात आधी रात को
हम ने पी चाँदनी आधी रात को
चाँद आँखों में आया आधी रात को

रात गुनती रहेगी आधी बात को
आधी वातों की प्रीत आधी रात को
रात पूरी हो कैसी आधी रात को
रात होती शुरू है आधी रात को

गाण्याच्या शब्दांतच इतकी गेयता, नाद, स्वतःचीच चाल आहे की मला (चुकून) वाटतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं अर्ध काम तर देवांच्या शब्दांनी आधीच करुन ठेवलं आहे. लता आणि आशा यांचे आवाज इतके सुंदरपणे गोफ विणावा तसे गाण्यात गुंफले आहेत की कधी लता सुरु करते आणि आशा अोळ पुढे नेते कळतही नाही!

अो चाँद जहाँ वो जाये - एक प्रियकर आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या दोघी (कधी परिस्थिती उलटीही असते) हा प्रेमाचा त्रिकोण चित्रनिर्माते त्यांचा हुकमी एक्का असल्यासारखा वापरतात. 'शारदा' चित्रपटात पुढे ते तेवढ्यावर भागत नाही तो भाग वेगळा - म्हणजे हा चित्रपट मी का पाहिला असा हताश भाव सतावत राहतो. पण ते नंतरचं... आयुष्यात पहिल्यांदा परदेशी गेलेल्या प्रियकराची खुशाली कळवण्याचं काम दोघी प्रेयसी चंद्रावर सोपवतात. 'अो चाँद जहाँ वो जाये, तू भी साथ चले जाना । कैसे है, कहाँ है वो, हर रात खबर लाना' चित्रपटाची नायिका मीना कुमारी असल्यामुळे ती अगदी सात्त्विक, सद्गुणांची पुतळीच जणु! नायकावर प्रेम करणारी दुसरी ही श्रीमंत घरची, मॉडर्न मुलगी श्यामा. गाण्याचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या स्वभावातला फरक त्यांच्यासाठी गाण्यात ज्या अोळी लिहिल्या आहेत, त्यातही जाणवतो. असं नेहमीच होत नाही - त्यासाठी राजेंद्र कृष्णांसारखा संवेदनशील आणि चित्रपटाच्या कथेत चपखल बसणारी गाणी लिहिण्याचं सामर्थ्य असलेला गीतकार हवा. उदाहरणार्थ गाण्याचं शेवटचं कडवं बघा -
मीना - ऐ चाँद कसम उनकी कुछ अौर न तू कहना
श्यामा - कहना के मेरा तुम बिन मुश्कील यहाँ रहना
इक दर्द के मारे को अच्छा नहीं तड़पाना
हर रात खबर लाना

मीना कुमारीसाठी लताचा आवाज आणि श्यामासाठी आशाचा. दोघींच्या गाण्याची जातकुळी पाहूनच जणू दोन्ही नायिकांचं स्वभावचित्रण चित्रपटात केलं गेलं असावं इतके ते आवाज चपखल बसतात. केवळ या गाण्यासाठी चित्रपट बघण्याचं दुःख सहन करावं लागलं कारण तेव्हा YouTube ची सोय नव्हती!

सखी री सुन बोले पपीहा उस पार - 'मिस मेरी' हा AVM चा अगदी टिपिकल दक्षिणी चित्रपट. मुख्यतः 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारीने खरं तर सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. या चित्रपटात अगदी खेळकर भूमिका आहे तिची, दिसतेही गोड - तेव्हा तिच्यासाठी १९५७ सालचा लताचा आवाज वापरला नसता तरंच आश्चर्य! चित्रपटात मीना कुमारी गाणं शिकवण्याचं काम करत असल्यामुळे हे गाणं तशाच रुपात आपल्या समोर येतं. हेमंत कुमारनी गाण्याची चाल शास्त्रीय संगीताच्या खूप जवळुन जाणारी बांधली आहे. गाणं सुरु होतं संथ लयीत आणि हळुहळु लय वाढत जाते, आलाप आहेत, शिकवताना गुरु एक अोळ म्हणतो आणि शिष्य ती अोळ पुन्हा म्हणून दाखवतो, शिवाय जमेल तेव्हा गुरुच्या बरोबर गायचा प्रयत्नही करतो. खरोखरच गाणं ऐकताना किंवा पाहताना आपण संगीतशिक्षणाचा प्रसंग पाहतोय असं वाटतं. त्यामुळे लता एक अोळ म्हणते किंवा आलाप शिकवते आणि आशा ते तसंच्या तसं म्हणून दाखवते. अतिशय विलक्षण कल्पना आहे ही आणि अगदी साध्या-सरळ चालीत, अगदी कमी पार्श्वसंगीत यामुळे गाणं अत्यंत श्रवणीय आहे.

मेरे मेहबुब में क्या नहीं - 'मेरे मेहबूब' चित्रपटात प्रेमाचा त्रिकोणच काय, चौकोनदेखिल म्हणता येईल! पुर्णपणे मुस्लिम वातावरण - इतकं की आधी जे सेंसॉरचं प्रमाणपत्र दाखवलं जातं त्यावर चित्रपटाची भाषा उर्दू लिहिली आहे. त्यामुळे नायक-नायिका एकाच कॉलेजमध्ये शिकत असले तरी एकमेकांचं दर्शन त्यांना होत नाही यात काही आश्चर्य नाही. शिक्षण संपल्यावर दोघं लखनौमध्ये येतात - म्हणजे ती तिच्या घरी आणि तो नोकरीच्या शोधात. तो रहायला जिथे जागा घेतो तिथे समोरच एक सुंदर तरुणी रहात असते, नसीम - थोडी पुढारलेली असावी कारण खिडकीशी येते ती बुरखा न घालता. दोघांची अशी नुसती पाहूनच अोळख पण ती मात्र त्याच्या प्रेमात पडते. इकडे नायक-नायिकेची प्रत्यक्ष भेट होते, प्रेमाच्या आणा-भाकाही होतात. नायिका 'हुस्ना' आपल्या जिवलग मैत्रीणीला, नसीमला भेटायला येते तर तेवढ्यात नसीम नोकराणीचा बुरखा घालून नायकाला भेटून यायचं धाडस करुन आलेली. दोघी मैत्रिणी लगेच एकमेकींजवळ आपापल्या प्रियकराचं वर्णन आणि स्तुती करायला लागतात आणि एक अतिशय खेळकर, प्रसन्न गाणं आपले कान तृप्त करतं! दोघी जेव्हा आपल्या प्रियकराचं वर्णन करु लागतात खरं तर तेव्हाच कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते कारण त्या म्हणतात,

आशा : तेरे अफ़सानों में मेरी जान
है झलक मेरे अफ़सानों की
लता : दास्तानें हैं मिलती हुई
अल्लाह हम दोनों परवानों की
दोघी : एक ही शमा हो ना कहीं
वो तो लाखों में है एक हसीं, इक हसीं

इथे लता कोणासाठी गाते आणि आशा कोणासाठी, वगैरेनी काही फरक पडत नाही. दोघींच्या आवाजात प्रेमात पडलेल्या दोन अल्लड तरुणींची निरागसता, आनंद, प्रेम अगदी पुरेपूर जाणवतं.

लायी कहाँ ऐ ज़िंदगी - 'टॅक्सी टॅक्सी' नावाचा म्हटलं तर आर्ट फिल्म प्रकारात मोडणारा एक चित्रपट १९७७ साली आला होता. त्या काळात अमोल पालेकरनी अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. एका बाजुला जंज़ीर, शोले, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी सारखे हाणामारीचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय होत असताना, अमोल पालेकरनी रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, घरोंदा, बातों बातों में, गोलमाल यांसारखे सामान्य माणसाचे जीवन, त्याचे छोटे-छोटे आनंद, त्याची स्वप्नं यांवर केंद्रित चित्रपट दिले. साहजिकच ते खूप भावले कारण सर्वसामान्य लोकांना ते आपलेच चित्रपट वाटले. यातच मध्ये केव्हा तरी 'टॅक्सी टॅक्सी' आला आणि गेला. टॅक्सी ड्रायव्हर असलेला अमोल पालेकर चित्रपटात पार्श्वगायिका बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने मुंबईत आलेल्या पण त्या दुनियेच्या व्यापाराची काहीच माहिती नसलेल्या ज़ाहीराला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतो. अोळखी काढून कुठूनतरी तिला कोरसमध्ये गाण्याची संधी मिळवून देतो. मुख्य गायिका असते आशा. चित्रपटात त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा प्रसंग आहे. आणि अहो आश्चर्यम्! मुख्य गायिकेचं गायन पडद्यावरही स्वतः आशाने केले आहे. खरोखरच्या रेकॉर्डिंगला जशी ती जात असेल तशीच पडद्यावर दाखवली आहे - मेकअप नाही (म्हणजे निदान मला तरी असल्याचं कळलं नाही असं म्हणू आपण फार तर), साधी साडी. चित्रपट पाहायला जाताना या मेजवानीची अजिबात कल्पना नसल्याने तो प्रसंग सुरु झाल्यावर माझा वरचा श्वास वर आणि खालचा खाली अशी अवस्था झाली! अचानकपणे माणूस श्वास घेणंसुद्धा कसं विसरतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. सुरुवातीला फक्त आशा गाते - आणि कोरस. पण कोरसमध्ये गाण्याचीही ज़ाहीराची हिंमत होत नाही. कदाचित कोरसमध्ये गाणं म्हणजे हार मानण्यासारखंही वाटत असेल तिला. पण अचानक काय होतं तिला? न राहवून ती आजुबाजूचा कोरस विसरुन गायला लागते ते लताच्या आवाजात आणि जणू हृदय दुःखाने फाटावं अशी गाते - इतकी की मुख्य गायिका आशाही हे भान हरपून पाहात-ऐकत राहते.

जान-ए-मन इक नज़र देख ले - हे अगदी विचित्र गाणं. विचित्र अशासाठी की 'मेरे मेहबूब' प्रेमाचा त्रिकोण वर लिहिल्याप्रमाणे आहेच. पण या गाण्याच्या वेळी अमीता आपलं प्रेम बाजूला ठेवून मैत्रीणीच्या सुखात आपलं सुख पाहते. आणि साधना आणि राजेंद्रकुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी हे गाणं म्हणते. आता हा प्रसंग सांगितल्यावर कोणीही म्हणेल की मग हे गाणं या यादीत का? कारण साधना हे गाणं अजिबात गात नाही. पण तरी लता आणि आशा, दोघींनीही हे गाणं गायलं आहे. पडद्यावर पूर्ण गाणं अमीताच म्हणते - म्हणजे एकाच पात्रासाठी, एकाच गाण्यात दोन आवाज वापरले आहेत. का? कुणास ठाऊक! खरं तर नौशादसारख्या संगीतकाराकडून असं होण्याची शक्यता जवळपास नाही. तेव्हा गाणं रेकॉर्ड करताना काही एक विचाराने केलं गेलं आणि चित्रीकरण होईपर्यंत काहीतरी गडबड-घोटाळा झाला असावा... (यावरुन आठवलं, याच्या अगदी उलटा प्रकार नौशादनेच संगीत दिलेल्या 'दिल दिया दर्द लिया' मधल्या 'क्या रंग-ए-महफ़िल है दिलदारम्, अो जाने आलम' या गाण्यात आहे. मुळात हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्याचं संगीत नौशादचं आहे हे काही केल्या पटेचना! कारण हिंदुस्थानी राग-रागिण्यांवर आधारित गाणी हा नौशादचा 'ट्रेडमार्क'च आहे. गाणं मुख्यतः वहिदा रहमान गाते पडद्यावर आणि प्रसंग पार्टीचा असल्यामुळे त्याला थोडयाश्या पाश्चात्य धर्तीच्या नृत्याची जोडही आहे. चित्रपटात तिची होणारी नणंद श्यामा नृत्यात सहभागी असते. संपूर्ण गाणं लता आणि काही साथीदार यांनी म्हटलं आहे. पण पडद्यावर मध्येच काही अोळी श्यामाही गाते, लताच्याच आवाजात. म्हणजे गाणाऱ्या दोघी पण आवाज फक्त लताचा. या निर्मात्यांची काय गणितं असतात त्यांची त्यांनाच ठाऊक! हे गाणं ऐकलं नसेल तर मात्र जरुर ऐका... गाण्याबद्दल - तेही लताच्या - अजिबात तक्रार नाही. समजत नाहीत ती पडद्यामागची कोष्टकं आणि राजकारण.)
मितवा, तेरे लिये जीना, तेरे लिये मरना - लेखाचा शेवट अशा गाण्याने जे रेकॉर्ड तर केलं गेलं, 'शान' या चित्रपटासाठी त्याचं चित्रीकरणही झालं, पण १९८० सालच्या सेंसॉर बोर्डाला न झेपल्याने गाण्याला कात्री लागली. दुर्दैवाने हे गाणं मला कुठे पहायला मिळालं नाही, पण ऐकलं आहे. गाण्याचं संगीत थोडं पाश्चात्य वेळणाचं असलं तरी लताच्या अोळी नेहमीप्रमाणे भारतीय वळणानेच जातात. चित्रपट १९८० सालचा असल्यामुळे असेल पण आशाच्या आवाजात पाश्चात्य वळण अगदी ठसठशीतपणे दिसतं पण अर्थातच सुराला पक्कं! त्यामुळे ते इतकं सहज आणि आकर्षक वाटतं की या गाण्यात मला आशाचा आवाज खूपच जास्त आवडतो. आता एकविसाव्या शतकात (तेव्हाच्या सेंसॉर बोर्डाला कात्री लावाविशी वाटली त्यापेक्षा) खूपच जास्त 'प्रगती' हिंदी चित्रपटांनी, सेंसॉर बोर्डाने आणि प्रेक्षकांनी केली आहे, त्यामुळे नुसतं हे गाणं जरी निर्मात्यांनी कुठे उपलब्ध करुन दिलं तर फारच छान होईल.

तर अशी ही दोन सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या बहिणींनी रसिकांना एकत्र येऊन दिलेली मेजवानी. ही संपूर्ण यादी अर्थात नाही, पण ही माझ्या आवडीच्या गाण्यांची संपूर्ण यादी म्हणायला हरकत नाही. तुम्हांला काय वाटतं? तुमच्या आवडीचं एखादं गाणं इथे हवं होतं असं वाटतंय का तुम्हांला? तसं असेल तर जरुर कळवा... मला खूप आवडेल तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला...

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

छुपा लो युँ दिल में प्यार मेरा...

गाण्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस बरेच वेळा सकाळी उठतो तोच डोक्यात एखाद्या गाण्याची अोळ किंवा धुन घेऊन. उठता-उठता नेमकं तेच गाणं का? या प्रश्नावर विचार करत मी कित्येक तास घालवले असतील... आधल्या दिवशी घडलेल्या कशाशी त्याचा संबंध आहे का? रात्री पडलेल्या स्वप्नात कुठे त्याचा संदर्भ लागतो का? शेवटी नाद सोडला. आज सकाळी जाग आली ती 'ममता' चित्रपटातल्या 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' गुणगुणत. गाभाऱ्यात भरुन राहणारा अोंकार असावा तसा हेमंतकुमारचा आवाज आणि जोडीला मन व्याकुळ करणारा तिचा आवाज. पार्श्वभुमीला संगीत म्हणून फक्त घंटानाद आहे तोही गाण्यावर कुरघोडी न करता फक्त मंदीरात ताल धरल्यासारखा! असं एखादं गाणं म्हणत उठलं की तेव्हाच समजतं आजचा दिवस छान जाणार! गाण्याचे शब्द, फक्त पार्श्वभुमीलाच राहणारं नाजूक संगीत आणि या गाण्याला दुसरे कुठलेही आवाज चालले नसते असे हेमंतकुमार आणि लताचे आवाज... बास्! केवळ या गाण्यानीच दिवसाचं सोनं होतं; नंतरचा दिवस कसाही जावो, इथे मनात सतत हे गाणं वाजत असतं!

लतानी गाण्यातून व्यक्त केली नाही अशी एकही भावना नसेल; पण का कोणास ठाऊक, मला सगळ्यांत जास्त भावतात ती तिने गायलेली मन व्याकुळ करणारी गाणी - कधी ती व्याकुळता प्रेयसीची असते, कधी पत्नीची, कधी आईची तर कधी मुलीची; एखाद्या गाण्यात मानवी जीवनाची क्षणभंगुरता मनाला भिडते तर कुठे जीवनाच्या संध्याकाळच्या छाया भिववतात. पण दरवेळी, हे असं प्रत्येक गाणं ऐकताना हे लक्षात येतं की आपला आवाज हे एक माध्यम आहे याची जाणीव तिच्या मनात सतत असावी. खरं तर तिच्या आवाजाशिवाय दुसऱ्या आवाजात त्या गाण्याची कल्पनाही असह्य वाटते आणि तो आवाज हा त्या गाण्याचा अविभाज्य घटक असतो, इतका की तिचा आवाज आणि गाण्याचा भाव जणू तद्रुप होतात; पण तरी तो आवाज भावावर कुरघोडी करत नाही. ही तारेवरची कसरत तिची तीच करू जाणे...

'वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह, आज यूँ मिलते हैं जैसे कभी पहचान न थी' दोघं काही गैरसमजुतीमुळे एकमेकांपासून दुरावतात तेव्हा हा दुरावा कसा दूर करावा न उमजल्यामुळे नुसत्याच जुन्या आठवणींवर दिवस काढायची जेव्हा वेळ येते तेव्हाही सगळ्यांत जास्त दुःख कशाचं होतं तर,

देखते भी है तो यूँ मेरी निगाहों में कभी
अजनबी जैसे मिला करते हैं राहों में कभी
इस कदर उनकी नज़र हम से तो अंजान न थी

याचं जास्त होतं! एकेकाळी एकमेकांवर जीव जडलेला, एकमेकांशिवाय एक-एक क्षण युगासारखा वाटायचा आणि आज अचानक भेट झाली तरी जणू दोन अनोळखी व्यक्तींच्या पहिल्या भेटीसारखं त्यानी आपल्याकडे बघावं - प्रेयसीसाठी यासारखी दुसरी जीव तोडणारी गोष्ट नसेल! मदन मोहनच्या चालीचं सोनं करावं तर ते 'तिनी'च! 'अकेली मत जईयो' या चित्रपटातल्या या संपूर्ण गाण्याची लय, मंद स्वरात मनातली वेदना गुणगुणल्यासारखा गोड आवाज - त्या प्रेयसीचं दुःख किती नेमकेपणानी पोहोचतं आपल्यापर्यंत!

तर दुसऱ्या टोकाला पती मृत्यूच्या छायेत वावरतोय आणि त्यानी मृत्युला सामोरं जाताना आपल्या पत्नीकडून एक वचन मागितलं - आपल्या मृत्यूनंतर तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर तिने पुनर्विवाह करावा. या विचित्र परिस्थितीत त्या  स्त्रीच्या मनातली खळबळ, काळजाचे तट् तट तुटणारे धागे, जुन्या सुखद आठवणी आणि कितीही नाकारावंसं वाटलं तरी समोर दिसणारं ढळढळीत सत्य अशा गुंत्यात सापडलेली पत्नी पतीला सांगते, 'हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है, खो बैठे। तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाअो, भूल जाअो'.

सपनों का दर्पन देखा था, सपनों का दर्पन तोड़ दिया
ये प्यार का आंचल हम ने तो दामन से तुम्हारे बाँध लिया
ये ऐसी गाँठ है उल्फत की जिसको ना कोई भी खोल सका
तुम आन बसे जब इस दिल में दिल फ़िर तो कहीं ना ड़ोल सका
अो प्यार के सागर, हम तेरी लहरों में नाँव ड़ुबो बैठे
तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाअो, भूल जाअो

मला हे गाणं अशासाठी भावतं की गाण्यातून ती पत्नी एकप्रकारे कबुली देते की एकेकाळी मी दुसऱ्या कोणावर प्रेम केलं होतं, पण तुझी झाल्यापासून माझ्या तन-मनात फक्त तूच भरून राहिला आहेस आणि आता तू जे मागतो आहेस ते केवळ अशक्य आहे. प्रेमाचा त्रिकोण असंख्य रूपातून आपल्यासमोर येतच आला आहे. पण पुर्वाश्रमीचं प्रेम लग्नाच्या होमात समर्पण करून पतीबरोबर एकदा सात पावलं टाकल्यावर भारतीय स्त्रीला पतीशिवाय दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा - मग तो आधीचा प्रियकर का असेना - आपल्यासंदर्भात उल्लेख किती असह्य होतो; ते शब्द, चाल, पडद्यावर मीनाकुमारीचा अभिनय आणि 'तिचा' आवाज हे रसायन या सगळ्या भावना आपल्यापर्यंत किती नेमकेपणाने पोहोचवतात! कधी वाटतं याची उत्कटता समजायला स्त्रीचं, त्यातूनही भारतीय स्त्रीचं मन हवं. प्रेमाचं हे रूप अगदी निराळं - वेदना, मृत्यूचं भय याहूनही इथे त्या पत्नीचं निस्सीम प्रेम साथीला असलेल्या सतारीसारखं मनात झंकारत राहतं. चित्रपट 'दिल एक मंदीर'.

आणि 'दिल दिया, दर्द लिया' मधलं हे दुःखद प्रेमाचं आणखी निराळंच रूप. आपल्याच भावाने प्रियकरावर अनन्वित अत्याचार करून त्याला मरणाच्या खाईत लोटून दिलं, लग्न त्याच्या पसंतीच्या माणसाबरोबर ठरवलं, सगळी दौलत उधळून टाकली आणि एक दिवस अचानक प्रियकर आला, नुसता आला असं नाही, तर प्रचंड श्रीमंती कमवून आला आणि सगळ्यांत वाईट गोष्ट म्हणजे प्रेयसीबद्दल गैरसमज आणि त्यातून उद्भवलेला तिरस्कार मनात काठोकाठ भरुन आला. या सगळ्या समीकरणात बिचाऱ्या प्रेयसीला ना भावाने समजून घेतलं, ना ज्याच्याबरोबर लग्न ठरलं त्याने आणि सगळ्यावर कळस म्हणजे ज्याच्यावर जीव अोवाळून टाकला तो प्रियकर तर घालून-पाडून बोलायची आणि दुखवायची एकही संधी सोडत नाही. तरीही प्रेयसीचं मन मात्र म्हणत राहतं, 'फ़िर तेरी कहानी याद आयी, फ़िर तेरा फ़साना याद आया। फ़िर आज हमारी आँखों को इक ख्वाब पुराना  याद आया'

जलते हैं चिराग़ों की सुरत, हर शाम तेरी हम यादों में
जब सुबह को शबनम रोती है, खो जाते है हम फ़रियादों में
जब दिल ने कोई आवाज़ सुनी, तेरा ही तराना याद आया

'तिच्या' आवाजात त्या प्रेयसीचं सगळं दुःख कसं ठसठशीतपणे जाणवतं! सगळी तडफड, सगळं दुःख, सगळा मनस्ताप आणि या सगळ्यापासून मनानेच दूर गेलेला प्रियकर आणि त्याच्या मनात भरलेला अंगार - या सगळ्यात मूकपणे जळतेय ती फक्त नायिका. असं म्हणतात की अंगात तीन ताप असतानासुद्धा 'तिनी' या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. 'तिच्या' बाबतीत या अशा कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास बसावा इतकी तिची तपस्या नक्कीच आहे.

सलीम-अनारकलीची प्रेमकथा भलेही ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीला उतरत नसेल, पण तरी ती प्रेमकथा चित्रपटनिर्मात्यांना आणि प्रेमिकांना सतत भुरळ घालत आली आहे. सी. रामचंद्रांनी 'अनारकली' एवढ्या एकाच चित्रपटाला संगीत दिलं असतं तरी ते अनेक जन्मं पुरण्याइतकं पुण्य होतं, पण हा तर त्यांच्या संगीताने सजलेल्या चित्रपटांच्या हारातला एक - फारतर आपण त्याला हारातील रत्नजडीत पदक म्हणू... एका युद्धात जखमी झालेला सलीम जीवन-मरणाच्या रेषेवर अधांतरी रेंगाळत असताना अनारकलीच्या आवाजाने त्याला थोडी शुद्ध येते, तेव्हा बादशाह अनारकलीला शोधून आणवून मुलाला पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी गाणं म्हणायला सांगतो; पण त्याला तेव्हा हे कुठे ठाऊक असतं की अनारकलीच्या रूपाने त्याने सलीमची ज़िंदगीच त्याच्यासमोर पुन्हा उभी केली आहे... सलीमला त्या अवस्थेत पाहून अनारकलीच्या तोंडून बाहेर पडतं

'दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर। 
वफ़ाअों का मजबूर दामन बिछाकर। दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर।। 
जो बिजली चमकती है उनके महल पर।
वो कर ले तसल्ली मेरा घर जलाकर। दुआ कर ग़म-ए-दिल खुदा से दुआ कर।।'

गाण्याचा मुखडाच किती काळजाला हात घालतो! जर विजेला कुणाचं तरी घर जाळून समाधान मिळणार असेल तर माझं जळू दे, पण माझ्या प्रियकराचं घर शाबूत राहू दे!

सलामत रहे तू, मेरी जान जायें।
मुझे इस बहाने से ही मौत आयें।
करूँगी मैं क्या चंद साँसें बचाकर।।

१९५३ सालचा 'तिचा' आवाज म्हणजे पुरणपोळीवर सुधारस घालून ती आमरसात बुडवून खाल्ली तरी गोडीला कमीच पडेल. शैलेंद्रसारख्या हळव्या कवीच्या शब्दांना, सी. रामचंद्रांच्या अवीट चालीला आणि चित्रपटातील प्रसंगाला पूर्ण न्याय मिळायचा असेल तर केवळ 'तिचा'च आवाज हवा.

१९५७ साली मधुबाला आणि अशोक कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला एक अगदी वेगळ्या विषयावरचा चित्रपट आला होता 'एक साल'. ब्रेन ट्युमरमुळे जेमतेम एक वर्षाचं आयुष्य बाकी असलेल्या आपल्या एकुलत्या एका आणि तरुण मुलीचं ते शेवटचं वर्ष आनंदात जावं म्हणून तिचे वडिल एका माणसाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगतात आणि त्याला विनंती करतात की त्याने त्यांच्याकडे नोकरी करण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री करुन तिला डॉक्टरकडे जायला आणि उपचारासाठी तयार करावे. तिला आपल्या आजाराची काहीच कल्पना नसल्याने ती डॉक्टरचं नाव काढलं तरी भडकायची. दुर्दैवाने मॅनेजर म्हणून नोकरीला येताना अशोक कुमारचा वेगळाच बेत असतो. मुलीवर प्रेमाचं नाटक करायचं, वर्षभरात ती जाणार, तेव्हा हळुहळु सगळी दौलत ताब्यात घ्यायची या उद्देशाने तो येतो खरा, पण निरागस, प्रेमळ, सुंदर अशा मधुबालाच्या तो कधी खरंच प्रेमात पडतो ते त्यालाही कळत नाही. अशोक कुमारच्या तोंडी असलेलं 'सब कुछ लुटा के होश में आयें तो क्या किया' जवळपास सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. पण अशोक कुमारचं खरं रूप समजल्यावर याच मुखड्याचं गाणं मधुबालावरही चित्रीत झालं, ते मात्र दुर्दैवाने 'भुले-बिसरे गीत' मध्ये शोभून दिसेल. 'तिच्या' आवाजातलं हे गाणं या पंक्तीत जावं यासारखी वाईट गोष्ट नसेल कारण गाणं निव्वळ अप्रतिम आहे. 'तिनी' ते फारच छान म्हटलं आहे हे सांगायची गरजच नाही!

न पुछो प्यार की हम ने जो हकीकत देखी
वफ़ा के नाम पे बिकते हुए उल्फ़त देखी
किसी ने लुट लिया अौर हमें खबर ना हुई
खुली जो आँख तो बरबाद मुहोब्बत देखी

सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया 
दिन में अगर चराग़ जलाए तो क्या किया

मैं वो कली हूँ जो न बहारों में खिल सकी
वो दिल हूँ जिसको प्यार की मंज़िल न मिल सकी
पत्थर पे हमने फूल चढ़ाए तो क्या किया 

जो मिल न सका प्यार ग़म की शाम तो मिले
इक बेवफ़ा से प्यार का अंजाम तो मिले 
ऐ मौत जल्द आ ज़रा आराम तो मिले 
दो दिन ख़ुशी के देख न पाए तो क्या किया 

मुखड्याच्या आधीच्या अोळी, मुखडा आणि पहिलं कडवं ऐकलं की कधी डोळ्यांत टचकन् पाणी येतं आपल्यालाही कळत नाही. गाण्याचे शब्द, चाल सुंदर आहेच पण माझ्यासाठी तरी ही जादू केवळ 'तिच्या' आवाजाची... दुसऱ्या कडव्यात 'तिचा' आवाज हळुहळु जो काही चढत राहतो त्यानी अंगावर सर्रकन् काटा उभा राहतो! सुर जागचा न ढळता आवाजाची इतकी मोठी झेप घेणारा दुसरा आवाज मला तरी माहीत नाही! ते दुसरं कडवं ऐकताना अक्षरशः हृदय हलतं. आवाजात इतका दर्द कुठून आणते 'ती' हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे.

'तिची' गाणी हा वीक पॉईंट असणाऱ्या हजारो लोकांपैकी मी एक. थोडं टोकालाच जातं ते प्रेम कधी-कधी; म्हणजे 'तिनी' अमक्यावर अन्याय केला, हे चुकीचं केलं नि ते... पण मी प्रेम करते ते तिच्या आवाजावर, गाण्यांवर, प्रत्येक भावना अचूकपणे माझ्यापर्यंत पोहोचवण्याच्या ताकदीवर, केवळ उर्दू शब्दांचे उच्चार बिनचूक व्हावेत म्हणून ती भाषा शिकण्याच्या तिच्या निष्ठेवर... त्यामुळे हे बाकीचे टीकाकारांचे मुद्दे खरंतर माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत; म्हणजे ऐकू येतात, कधी मी हिरीरीने वादही घालते पण शेवटी मला काय त्याचे, हेच खरं. आयपॉड सुरू करावा तर नेमकं सुरू होतं 'छुपा लो युँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदीर में लौ दिये की' आणि या अोळीनंतर जेव्हा लता म्हणते 'तुम अपने चरणों में रख लो मुझको, तुम्हारे चरणों की धूल हूँ मैं। मैं सर झुकाये खड़ी हूँ प्रीतम, के जैसे मंदीर में लौ दीये की' तेव्हा दिवसभर ते गाणं पाठलाग करतं ते उगीच नाही!


सोमवार, २६ मार्च, २०१२

।। ॐ नमोजी आद्या ।।





उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिंचा नायक, सुखदायक भक्तांसी

कुठुनतरी या गाण्याचे सूर कानावर आले आणि नकळत मन कित्येक वर्षं मागे गेलं. सकाळची शाळा… वय वर्ष सात-आठ… त्यामुळे सकाळी लवकर उठणं अत्यंत जीवावर यायचं. बरं, आईचीही नोकरी - तिचीही शाळा सकाळचीच. त्यामुळे लवकर उठुन स्वयंपाक करुन, सगळ्यांचे डबे भरणं, तिचं स्वतःचं आवरणं या सगळ्या धावपळीत सात-आठ वर्षाच्या आपल्या 'मोठ्या' झालेल्या लेकीने पहिल्या हाकेला उठुन आपलं आवरलं तर तिला किती मदत झाली असती! पण डोळ्यावरचा गाढ झोपेचा पडदा मुळी जरासुद्धा बाजुला व्हायचा नाही. मग आई म्हणायची 'उठा उठा हो सकळिक'… तेवढ्या झोपेतही तिचं हे गुणगुणणं ऐकू यायचं आणि इतका राग यायचा! आता हसू येतं - गणपतीला उठवण्यासाठी लिहिलेली प्रार्थना आपल्या मुलीला उठवायला म्हणायचं फक्त आईच्याच मनात येऊ शकतं ना? आणि त्यावर चिडचिड फक्त 'त्या' वयातच शक्य आहे!

तसं म्हटलं तर आपल्याकडे जितके देव, तितक्या प्रकारच्या त्यांच्यावर लिहिलेल्या प्रार्थना, आरत्या, गाणी… पण आपल्या भाव-मनात गणपतीचं स्थान जसं आगळं असतं तशीच गणपतीवर लिहिलेली गाणीही आपल्या मनात स्वतःसाठी वेगळी जागा व्यापून असतात. अशीच काही माझ्या मनाच्या खास कप्प्यात राहिलेली गाणी.

कोणत्याही कार्याची सुरुवात करताना देवाचा - विशेषतः श्रीगजानानाचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. अगदी संत ज्ञानेश्वरही याला अपवाद नाहीत. भगवद्-गीतेचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ज्ञानेश्वरांनी श्रीज्ञानेश्वरी लिहिली. पण गीतेची सुरुवात जरी रणांगणाच्या वर्णनाने होत असली तरी ज्ञानेश्वरांनी मात्र गणपतीच्या प्रार्थनेने ज्ञानेश्वरीची सुरुवात केली.



ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।


देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ।।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।


अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ।।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।


हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।।
ये मी यां श्रीगुरुकृपे नमिले । आदिबीज ।।


आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ।।
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मी यां ।।

ज्ञानेश्वरांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकरांची चाल आणि साक्षात गानसरस्वती लता मंगेशकरांचा स्वर याहून अजरामर संगम तो कुठला! लताबाईंचा आवाज ज्या लिलयेने सर्व सप्तकांत फिरतो त्यानी नुसतं वेड लागतं. आणि पार्श्वभूमीत जो अोंकाराचा नाद घुमतो त्याने तर अंगावर कांटा येतो!

सुधाताई करमरकरांच्या 'लिटल् थिएटर - बाल रंगभूमी'च्या नाटकांनी ज्यांचं बालपण श्रीमंत केलं अशा भाग्यवान पिढीतली मी. त्यांनी एक 'गणपती बाप्पा मोरया' नावाचं नाटक बालप्रेक्षकांसाठी रंगभूमीवर आणलं होतं आणि माझी आठवण बरोबर असेल तर आशालता वाबगांवकरांनी त्यात एक गाणं म्हटलं होतं. कित्येक वर्षांत ते गाणं कुठे ऐकायलाही मिळालेलं नाही. लेखाच्या निमित्ताने गणपतीवरची गाणी मनात फेर धरत असताना आठवणीच्या खोल कुठल्यातरी कप्प्यातून हे गाणं वर यायचा प्रयत्न करत होतं. आधी तर 'गणपती बाप्पा मोरया' याशिवाय काहीच आठवेना आणि जितका प्रयत्न करायला लागले तितकं ते गाणं माझ्याशी लपंडाव खेळायला लागलं. चैन पडेना… जागेपणीचा प्रत्येक क्षण जणू त्या गाण्याचा पाठलाग करत होता. आणि एका रात्री अचानक दीड वाजता उठले, शेजारीच टेबलवर नेहमी असतं ते पॅड आणि पेन घेतलं, नाईटलॅंपच्या उजेडात अक्षरशः झपाटल्यासारखं गाणं लिहायला घेतलं आणि काय आश्चर्य! जसजसं मी लिहित गेले तसतश्या गाण्याच्या अोळी विनासायास आठवायला लागल्या. आता तुम्हांलाही उत्सुकता लागली असेल ना या गाण्याबद्दल?

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया ।।


मंगलमूर्ती तू, गणनायक
वक्रतुंड तू, सिद्धीविनायक
पामर मी स्वर उणे भासती, तुझी आरती गाया ।। 
तू सकलांचा भाग्यविधाता
तू विद्येचा स्वामी-दाता
ज्ञानदीप उजळुन आमुचा, निमवी नैराश्याला ।।


तू माता, तू पिता जगी या
ज्ञाता तू, सर्वस्व जगी या
तुझिया दारी आज ठाकलो, ये ईप्सित मज द्याया ।।

असंच आणखी एक लहानपणापासून आजता-गायत आवडीचं गाणं आहे 'अन्नपूर्णा' चित्रपटातलं. गाणं तर सुंदर आहेच पण या गाण्याच्या संदर्भात विशेष लक्षात राहिलं आहे ते पडद्यावरचं सुलोचनाबाईंचं अतीव सुंदर आणि सोज्वळ रूप.

 
तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती

महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग, साडे तीन शक्तिपीठं याबरोबरच किंवा कदाचित याहूनही जास्त लोकप्रिय आहेत अष्टविनायक. मोरगांवचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिध्दटेकचा सिध्दीविनायक, रांजणगांवचा महागणपती, अोझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरीजात्मज, महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर - या आठ गणपतींवर अवघ्या महाराष्ट्राचे प्रचंड प्रेम आणि भक्ती आहे.

'अष्टविनायक' या चित्रपटाचा गाभाच मुळी त्यांवर आधारलेला आहे. श्रध्दा आणि अश्रध्दा, आस्तिकता आणि नास्तिकता, यांत्रिकीकरण आणि संस्कृती यांचा संघर्ष चित्रपटात पुढे सरकत राहतो तो एकाहून एक सरस गाण्यांच्या साथीने. नायिकेच्या वडिलांच्या भुमिकेत साक्षात पं. वसंतराव देशपांडे आणि गणपतीच्या भोवती गुंफलेली गाणी असा संगम झाल्यावर 'प्रथम तुला वंदितो कृपाळा', 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता' आणि चित्रपटाचा मुकुटमणी असलेलं अष्टविनायक गीत… कुठलं गाणं सरस हे ठरवणं केवळ अशक्य! पण तरी अष्टविनायक गीत खास लक्षात राहतं ते प्रत्येक गणपतीचं अतिशय सुंदर रीतीने घडवलेलं दर्शन, पडद्यावर ते सादर करायला मराठी चित्रपटसृष्टीतले जुने-नवे मोठे कलाकार, प्रत्येक कडव्यात त्या-त्या गणपतीचं नेमकं वर्णन आणि प्रत्येक कडव्याला वेगळी पण चपखल बसलेली चाल यामुळे.



स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणीं थेवरम्‌ ।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजण संस्थितो गणपतीः कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।


अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्सनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा


(पडद्यावर कृष्णकांत दळवी)
गणपती, पहिला गणपती, आहा,
गणपती, पहिला गणपती, आहा
मोरगांवचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो
नंदी-कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो, शोभा साजरी हो
मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा


(पडद्यावर सूर्यकांत)
गणपती, दुसरा गणपती, आहा,
गणपती दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहानी त्याची लई लई जुनी
काय सांगू? आता काय सांगू?
डाव्या सोंडंचं नवाल केलं साऱ्यांनी, हो साऱ्यांनी
इस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी, हो पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी, हो वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा


(पडद्यावर अशोक सराफ)
गणपती, तिसरा गणपती
शिद्धिविनायका तुजा शिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुज्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर
इस्नुनारायण गाई गणपतीचा मंतर
राकुस मेलं, नवाल झालं, टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळंचं मखर
चंद्र-सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा


(पडद्यावर उषा चव्हाण)
गणपती, गणपती ग चौथा गणपती
बाई रांजणगांवचा देव महागणपती
दहा सोंडा इस हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधुन किरण
किती गुणगान गावं, किती करावी गणती
बाई रांजणगावचा देव महागणपती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा


(पडद्यावर आशा काळे)
गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर, बाई अोझरचा इघ्नेश्वर
लांब रुंद हाई मूर्ती
जड जवाहीर त्याचं, काय सांगू शिरीमंती
ओझरचा इघ्नेश्वर
डोळ्यामंदी माणकं हो, हिरा सोबतो कपाळा
तानभूक हरती हो, सारा बघून सोवाळा
चारी बाजू तटबंदी, मधी गणाचं मंदिर
ओझरचा इघ्नेश्वर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा

(पडद्यावर सुधीर दळवी)

गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव
रमती हितं रंका संगती राव, हो जी जी
खडकात केलं खोदकाम, दगडात मंडपी खांब
वाघ शिंव्ह हत्ती लई मोठं, दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरीजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
जी जी रं, जी रं हं जी
दगडमाती रूप द्येवाचं लेण्याद्री जसा

(पडद्यावर रवींद्र महाजनी)

सातवा गणपती राया, सातवा गणपती राया, सातवा गणपती राया
महड गांव अती महासूर, वरदविनायकाचं तितं येक मंदिर
मंदिर लई सादं-सूदं, जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर, कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं हाय तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्येनं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप शिंव्हासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो, जी जी रं जी
माज्या गणा रं जी जी
माज्या गणा रं जी जी
माज्या गणा रं जी जी
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

(पडद्यावर शाहू मोडक आणि जयश्री गडकर)

आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा,
पालीगांवच्या बल्लाळेश्वरा, आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख, सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ, विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती, देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा


अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्सनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा


मोरया मोरया मंगलमूर्ती। मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया। मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया।।
मोरया मोरया महागणपती मोरया। मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया। मोरया मोरया वरदविनायक मोरया।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया। मोरया मोरया अष्टविनायक मोरया।।

या चित्रपटानंतर अगदी थोड्या कालावधीत कविवर्य वसंत बापटांनी अष्टविनायकांवर आठ वेगवेगळी गीतं लिहिली. मराठी साहित्य-रसिक कवी आणि गीतकार ही दोन वेगळी व्यक्तित्वं मानतात. दुर्दैवाने पुष्कळ वेळा गीतकारांना कवीइतका दर्जा मिळातोच असं नाही. गदिमा, शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर यांसारख्या अनेक गीतकारांच्या लेखणीतून उतरलेली कित्येक गीतं कविता म्हणूनही अतिशय दर्जेदार आहेत. वसंत बापटांची आपल्याला अोळख मुख्यतः कवी म्हणूनच आहे. अगदी मोजकी गीतं त्यांनी लिहिली. त्यांत सर्वांत लक्षणीय प्रयोग म्हणावा लागेल या आठ गीतांचा. प्रत्येक गीत हे त्या त्या गणपतीचे वर्णन, त्यामागचा इतिहास/ कथा अशा ताकदीने सादर करते की आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन ही गीतं आपल्यासमोर येतात. अशा अनवट प्रयोगाला संगीत द्यायला संगीतकारही तितक्याच ताकदीचा हवा. आणि यशवंत देवांसारखा शब्दप्रधान गायकीचा पुरस्कर्ता आणि विचारवंत संगीतकार या गीतांना लाभला हे त्या गीतांचं आणि आपलं भाग्य म्हणावं लागेल. देवसाहेब स्वतः कवीही असल्याने कुठल्याही गीताचं संगीत तयार करताना चाल, संगीत आणि स्वर यांत शब्द हरवणार नाहीत याची अतिशय जाणिवपूर्वक काळजी घेतात. किंबहुना 'मी ज्या गीतांना चाली लावतो त्या चाली त्या मूळ काव्यातच दडलेल्या असतात, मी फक्त त्या शोधून काढतो.' असं स्वतः देवसाहेबच आग्रहाने सांगतात. त्यामुळे हा अनोखा प्रयोग अतिशय सुरेल, प्रसादिक पण शब्द- आणि भावप्रधान झाला आहे. उषाताई मंगेशकरांनी आपल्या स्वरांनी सजवलेल्या त्या आठ गाण्यांची ही झलक.

१. सा रे ग म प, म प ध नि सां
   मंद्र, मध्य अन् तार
   झणाणत उसळे स्वरझंकार
   फुलांतून दरवळला गंधार
   मयुरेश या वनी प्रकटला मावळला अंधार

२. रमा-माधवांचे जिथे चित्त लागे
    जिथे सत्य-चिंतामणी नित्य जागे
    तया थेऊराला चला जाऊया
    गणेशाप्रती आरती गाऊया

३. चल साधका, चल यात्रिका
    चल श्रीगजानन पूजका
    चल पाहू त्या वरदायका
    चल पाहू सिध्दीविनायका

४. रांजणगांवाला, गांवाला
    महागणपती नांदला
    चला पहाटे, पहाटे
    देव केव्हाचा जागला

५. झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो
    श्रीविघ्नेश्वर-सदन-शुभंकर अोझर हो

६. गणनायका, शुभदायका
    यावे तुम्ही गिरीकंदरा
    सह्याद्रीच्या हृदयामध्ये
    लेण्याद्रीच्या या मंदिरा

७. रचिल्या ऋषि-मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
    डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत

८. बालभक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा
    पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा
    जय देव, जय देव

लेखाच्या शेवटी लताबाईंनी अमर केलेल्या या गाण्यांचा उल्लेख केला नाही तर लेख अपूर्ण राहिल्यासारखा वाटेल. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाल दिलेली ही गाणी. गेली कितीतरी दशकं घरोघरचे कौटुंबिक गणपती आणि गावोगावचे सार्वजनिक गणपती ही गाणी ऐकल्याशिवाय कधी साजरे झाले नाहीत. ती गाणी म्हणजे 'गजानना श्री गणराया, आधी वंदु तुज मोरया' आणि 'गणराज रंगि नाचतो-नाचतो, पायी घागऱ्या करिती रुणुझुणु, नाद स्वर्गी पोचतो'.

'सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची' ही श्रीगजाननाची पारंपारिक आरतीही अशीच लताबाईंनी आपल्या स्वर्गीय सुरांनी अमर केली आहे. आरतीनंतर यशवंत देवांनी ज्या धीरगंभीर सुरांत मंत्रपुष्पांजली म्हटली आहे त्याने तर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अर्थात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लहान वयापासूनच देवसाहेबांच्या वाणीवर वैदिक संस्कृत उच्चारांचे संस्कार झाले होते. त्यामुळे ही आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकली की, विशेषतः गणेशोत्सवाच्या या दिवसांत तर मन झपकन् अनेक वर्षं मागे जातं, मुंबईच्या आमच्या सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात! सार्वजनिक गणेशोत्सव असला तरी अत्यंत विधीपूर्वक, साग्रसंगीत, पंचागात दिलेल्या वेळा पाळून, सोवळ्यांत अशी रोज सकाळ-संध्याकाळ पूजा होत असे. दर वेळेस दहा आरत्या, नंतर 'घालीन लोटांगण' आणि मग मंत्रपुष्पांजली. त्यात जास्तीत जास्त वेळ कोण स्वर लावू शकतो याची जणू स्पर्धाच असे! लहान असताना प्रसाद घेण्यासाठी रांगेत पुढे नंबर लागावा म्हणून पळापळ, थोडी मोठी झाल्यावर स्वयंसेविका म्हणून उत्साहानी उचलेला खारीचा वाटा, निरनिराळ्या स्पर्धांत आणि कार्यक्रमांत घेतलेला भाग आणि दहा दिवस पाहिलेले असंख्य दर्जेदार कार्यक्रम! कालचक्र पुढे सरकतच राहतं, त्याप्रमाणे कदाचित यांत आता काळाप्रमाणे बदल झालेही असतील… पण गणपती म्हटला की मला मात्र आठवतो तो जुना गणेशोत्सव आणि माझ्या मनाच्या खास कप्प्यात राहिलेली ही गाणी.







(हा लेख "मायबोली.कॉम" च्या गणेशोत्सवात या आधी प्रसिद्ध झाला होता.)