काय गंमत आहे पहा! या आधीच्या लेखात मी म्हणाले की मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द मला भावतो आणि त्यामुळे त्याच्या आवाजातली मन व्याकुळ करणारी गाणी मनात ठाण मांडुन बसतात. तो लेख लिहिताना, ती गाणी एकीकडे गुणगुणताना माझं दुसरं मन मुकेशचीच अगदी दुसऱ्या टोकाची गाणी गुणगुणत होतं - प्रेमाच्या परमोच्च आविष्काराची गाणी! आणि गंमत म्हणजे ही गाणीही म्हणावीत तर मुकेशनीच. एकाच आवाजात पराकोटीचे दुःख आणि तितकेच उत्कट प्रेम या दोन्ही भावना अगदी सार्थपणे व्यक्त करण्याच सामर्थ्य असावं असं फार कमी होतं. पण मुकेशच्या आवाजात ही किमया फारच सहज वाटते. पण नमनाला घडाभर तेल कशाला? आपण वानगीदाखल काही गाणीच बघुया ना...
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने (आनंद) - ज्या चित्रपटात मुकेशनी 'अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये...' सारखी चित्रपटाचा नायक आनंद याच्या अंतर्मनातल्या भावना व्यक्त करणारी, अप्रतिम काव्यरचना सादर केली, त्याच चित्रपटात 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने' सारखे निख्खळ प्रेमाची, आनंदाची भावना व्यक्त करणारे गाणेही तितक्याच प्रसन्नपणे सादर केले. 'कहीं दूर जब दिन ढ़ल जाये' म्हणून आपल्यातच हरवलेला आनंद तो हाच का? त्या आनंदचे दुःख आपल्या आवाजात सहज मिसळणारा हाच का तो मुकेशचा आवाज? कसं शक्य आहे? या गाण्याची सुरुवातच 'मैने' अशी थोडीशी प्रोजमध्ये पण खोडकर आवाजात मुकेश करतो - जणू पुढे येणाऱ्या एका सुंदर गाण्याची प्रस्तावनाच त्या एका शब्दात होते.
संगीतकार सलिल चौधरींबद्दल काय लिहीणार? त्यांची संपूर्ण कारकीर्द या आणि अश्या असंख्य गाण्यांनी सजलेली आहे. या गाण्यातही आनंदचं जीवनावरचं प्रेम, त्याचं झोकून देणं सुरांत छानपैकी येतं. पडद्यावर राजेश खन्नाने आणि गीतकार गुलज़ारनी या एका गाण्यात जणू आनंदचे पूर्ण व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. आपला अटळ मृत्यू क्षणाक्षणाने जवळ येतो आहे पण त्याआधीचे लाखो क्षण 'जगायचं' आहे हा ध्यास गाण्यात प्रकर्षाने जाणवतो. हेच कडवं बघा ना -
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं (दिल ही तो है) - १९६३ सालचा हा चित्रपट त्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या मुस्लिम वातावरणावर आधारित होता. राज कपूर, नूतन, प्राण मुख्य भूमिकांमध्ये, रोशनचं संगीत, साहिरच्या लेखणीतून उतरलेली गीतं - खरं तर चित्रपट लोकप्रिय आणि स्मरणिय होण्यासारखं बरंच काही होतं. पण चित्रपटापेक्षा त्यातली गाणीच जास्त गाजली. साहजिकच आहे! मुळात, गीत-संगीताची बाजू भरभक्कम होतीच; जोडीला लता, आशा, मुकेश, मन्ना डे यांसारखे नावाजलेले गायक... त्यामुळे 'निगाहें मिलाने को जी चाहता है', 'लागा चुनरी में दाग', 'भूले से मुहोब्बत कर बैठे', 'चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना', 'तुम्हारी मस्त नज़र गर इधर नहीं होती' आणि 'तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं' यांसारखी एकाहून एक सरस गाणी आजही चोखंदळ श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. (जाता-जाता सहज आठवलेली एक गोष्ट म्हणजे पुढे थोडे-फार संगीत-दिग्दर्शन स्वतंत्रपणे करणारे सोनिक-अोमी या चित्रपटात रोशनचे सहाय्यक होते.)
नायिका जमीला हिचा आवडता गायक चाँद, पण तिने प्रत्यक्ष कधी त्याला पाहिलेले नाही. मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना एका युवकाशी तिची टक्कर होते. तिचा राग तर तिच्या चाफेकळीसारख्या नाकावर फणकारा होऊन सदाचाच मुक्कामाला. एका रुप-गुण-ऐश्वर्यवतीच्या मागे लागणाऱ्यांची काय कमी? त्यामुळे त्या टक्कर झालेल्या युवकालाही त्यातलाच एक समजून ती नुसती वैतागून जाते पण तिला काय माहीत की त्या फणकाऱ्यानेही तो घायाळ झालाय? जणू त्यांची मंज़िल एकच असल्यासारखे दोघे पाठोपाठ वाढदिवसाच्या समारंभात पोहोचतात. त्याला बघून तिचा पारा आणखीच चढतो आणि तिला तिथे बघून तो जास्तच घायाळ होतो. मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती काही शेर ऐकवते आणि मग मैत्रिणीचा भाऊ मैफिलीसाठी खास बोलावलेल्या प्रसिद्ध गायक चाँद याला गाण्यासाठी आमंत्रित करतो. ती उत्सुकतेने पहायला लागते की आपला आवडता गायक एकदाचा आपल्याला दिसणार तर काय! ज्याच्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लालेलाल झालेला तोच नेमका चाँद निघावा! बरं, त्यानी गाणं तरी काय निवडावं?
जिस गली में तेरा घर ना हो बालमा (कटी पतंग) - कटी पतंग फार पुर्वी कधी तरी पाहिला होता. तेव्हा त्यातला कथेचा भाग समजण्याची अक्कल नव्हती, पण तरी गाणी मात्र आवडली होती. नंतर चित्रपट परत पहायचा योग यायच्या आधी गुलशन नंदांची मूळ कादंबरी वाचायचा योग आधी आला. तोवर थोडी फार समज आली असावी कारण पुस्तक वाचल्या-वाचल्या चित्रपट पहायची अोढ लागल्याचं आजही स्पष्टपणे आठवतंय. राजेश खन्ना सुपर-हिरो असण्याच्या काळातला हा चित्रपट. साहजिकच, चित्रपटात हिरोला झुकतं माप मिळणं सहज-शक्य होतं, शिवाय त्याची भूमिकाही सतत प्रेक्षकांची सहानुभूती मिळत राहिल अशी, पण तरी आता चित्रपट पाहताना त्यातली आशा पारेखची मधू/ पूनमही तितकीच लक्षात राहते. विवाह-मंडपातून पळून आपल्या प्रियकराकडे गेलेली मधू ते मरताना आपल्या मैत्रिणीला दिलेल्या वचनासाठी लग्न न होताच विधवा झालेली, एका बाळाचं आईपण स्विकारुन आणि लग्नाला विरोध असलेल्या, कधी न पाहिलेल्या सासरी निघालेली पूनम हा स्त्रीचा प्रेयसी, मुलगी, मैत्रिण, सून, आई या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यातला प्रवास पडद्यावर फारच छान आणि हृद्यपणे दाखवला आहे. मैत्रिणीच्या सासरी तिची जागा घेऊन राहताना तिची भेट होते ती नेमकी त्या कुटुंबाचा स्नेही असलेल्या आणि तिच्याशी लग्न ठरलेल्या कमलशी. त्या दोघांची कधी भेट न झाल्याने त्याने तिला अोळखायचं काहीच कारण नसतं. या एकाकी, दुःखी, विधवा पूनमच्या तो प्रेमात पडतो. इतका की -
गीत-संगीत-सुर यांची त्रिवेणी किती जादू करते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि गाणं अधिक उंची गाठतं ते माझ्या मते मुकेशच्या आर्त, शब्द-सुरांची जाणीव असलेल्या आवाजामुळे.
जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे (सफ़र) - एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांना नियतीच्या एका इषाऱ्यानिशी वेगळ्या वाटेने चालणं भाग पडतं - ते ही केवळ त्याच्या इच्छेखातर. त्याला कॅन्सर झाल्याचं कळल्यावर तो खचतो, पण ती मात्र तरीही खंबीर असते, आपल्या निर्णयावर ठसम राहते, जितकी पावलं चालायची ती दोघांनी हातात हात घेऊनच. पण त्याला मात्र तिचं हे रोजचं मरण मान्य नाही; आपल्या विधीलिखिताशी तिने स्वतःचं नशीब बांधण्यापेक्षा तिने आपलं आयुष्य जगावं, फुलवावं. दोघांच्याही मनात खरं तर एकच इच्छा आहे - दुसऱ्याचं आयुष्य होता-होईतो आपल्यामुळे चांगलं जावं - पण कधी-कधी या दोन चांगल्या इच्छा एकमेकांना छेद देतात त्या या अश्या! शेवटी तिला त्याच्या इच्छेखातर, त्याचे उरलेले दिवस त्याला जे हवंय ते द्यावं यासाठी दुसऱ्याशी लग्न करणं भाग पडतं. मेडिकल कॉलेजचा खर्च एकट्या भावावर पडू नये म्हणून ती एका श्रीमंत घराण्यातल्या मुलाची शिकवणी घेत असते. त्याचा मोठा भाऊ खरं तर पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलेला. शेवटी कुणाशी तरी लग्न करायचंच तर त्याच्याशी केलं तर काय फरक पडतो या भावनेने ती लग्न करते आणि नवऱ्याचं आख्खं आयुष्य जणू उजळुन निघतं!
जिच्यावर अबोल प्रेम केलं तीच आपली झाली म्हटल्यावर त्याच्या मनाची अवस्था अशी झाली तर ते साहजिकच ना? इतकं जीवापाड प्रेम की यापुढे तिला जे आवडेल तेच करायचं, तिचं मन रिझवेल तेच फक्त बोलायचं, अगदी दिवसा-ढवळ्या ती म्हणाली की किती छान चांदणं पडलंय तर आपणही म्हणायचं, खरंच, किती सुंदर रात्र आहे! इतकं प्रेम फार थोड्या भाग्यवान लोकांनाच लाभतं.
१९७० चा हा चित्रपट. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ही पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय जोडी. पण चित्रपटात हे गाणं मात्र आहे तिच्या नवऱ्याच्या भूमिकेतील फिरोज़ खानवर चित्रित केलेलं. फिरोज़ खानच्या चित्रपटातील भुमिकेशी हे गाणं अत्यंत सुसंगत आहे. याचं श्रेय गीतकात इंदीवर यांना. कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताबद्दल वेगळं काय सांगणार? इतक्या गंभीर चित्रपटातलं प्रत्येक गाणं लोकप्रिय करण्याची करामत ते करु शकतात यातच सगळं आलं. हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्ण कारकीर्द करुनही कुठल्याही व्यसनापासून, वाईट सवयींपासून - इतकंच कशाला तर कुठल्याही वादंगापासून दूर राहिलेले लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. या गुर्जर बंधूंवरचे संस्कार इतके पक्के होते की त्यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. हे सगळं टाळूनही मोठी आणि दर्जेदार कारकीर्द कशी करावी याचं आदर्श उदाहरण आह ही संगीतकार द्वयी.
मुकेशच्या आवाजाचं मला राहून-राहून आश्चर्य वाटतं. हाच का तो आवाज, 'मेरे टुटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे' म्हणून आपल्या असफल प्रेमाची फरियाद आपल्यापुढे मांडतो? मग त्याच आवाजात 'तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे' यातलं प्रेमाचं समर्पण, तादात्म्य कसं आपल्याला पटतं? बरं, आवाज फार वेगळा लावलाय असंही नाही आणि नुसती शब्द-सुरांची जादूही नाही - ती आहेच, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतं, अगदी थेट आपल्या हृदयात; ते मुकेशच्या आवाजातच.
कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे (पूरब अौर पश्चिम) - १९७० सालचंच, इंदीवर यांनी लिहीलेलं आणि कल्याणजी-आनंदजींनीच संगीत दिलेलं हे गाणं. गाण्याचा गाभाही तसाच - आत्यंतिक प्रेम आणि त्यासाठी काहीही करायची तयारी. इथे फरक इतकाच, की त्याला कळलंय आपलं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे; पण तिला मात्र त्याची जाणिवच नाही. ती रुपगर्विता, पाश्चात्य संस्कारात वाढलेली - तिला याचं साधंभोळं पण जीव अोतून केलेलं प्रेम मुळी समजतच नाही. त्याला याची कल्पना आहे आणि तिला ते कळेपर्यंत थांबण्याचा संयमही त्याच्याजवळ आहे. तिला जरी आज आपल्या रुपाच्या, श्रीमंतीच्या भ्रमामुळे उद्याची कल्पना करवत नसली तरी त्याला समजतंय की आज जे तिच्या अवती-भवती रुंजी घालताहेत, ते उद्या यौवनाचा भर अोसरल्यावर, रुपाची झळाळी कमी झाल्यावर तिच्याजवळपासही फिरकणार नाहीत.
तेव्हा तिला आपल्या प्रेमाची खात्री पटेल या भरवशावर तो लागेल तितकी वाट पहायला तयार आहे.
'जंगली' चित्रपटामधली सायरा बानू रुपगर्विता म्हणून सहज पटते, पण तिथे ती अस्सल भारतीय संस्कारात वाढलेली, मुग्ध युवती आहे. इथे मात्र विदेशी अंश दाखवण्यासाठी विग घातलेली, तंग, अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेली, सहजगत्या सिगरेट पेटवणारी सायरा बानू रुपगर्विताही वाटत नाही आणि विदेशी म्हणून शोभतही नाही. इतकं सुंदर गाणं मुकेशला परत एकदा मनोज कुमारसाठी गायला लागलं. थोडक्यात, हे फक्त ऐकण्याचं आणि भाग्यवान असलात तर अनुभवण्याचं गाणं आहे. मुकेशच्या आवाजाच्या जादूने थोडा काळ का होईना हा अनुभव ऐकणारा घेतोच.
प्रेमाची किती विविध रुपं असतात! अगदी एकतर्फी प्रेमापासून ते असफल प्रेमापर्यंत... पण दोन जीव जेव्हा एक होतात किंवा प्रेम जेव्हा समर्पणाचं रुप घेतो तेव्हा ते परमोच्च बिंदु गाठतं. केवळ आवाजातून ही भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं महाकठीण! काही भाग्यवंतांनाच ही किमया साधते. सुदैवाने मुकेशला ते सहज जमतं आणि वर लिहीलेली आणि अशीच इतर काही गाणी चिरंतन होतात. जोपर्यंत प्रेम आहे, जोवर आपल्यासारखे रसिक आहेत, तोवर या गाण्यांची आठवण काही कारणाने किंवा कधी कारणाशिवायही येतच राहणार. मृत्यू होऊन जवळपास सदतीस वर्षं होऊनही रसिकांच्या मनात मुकेशची जागा कोणालाच घेता आलेली नाही - अगदी बराचसा तसाच आवाज असलेल्या मुकेशच्या मुलाला - नितीन मुकेशलाही!
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने (आनंद) - ज्या चित्रपटात मुकेशनी 'अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये...' सारखी चित्रपटाचा नायक आनंद याच्या अंतर्मनातल्या भावना व्यक्त करणारी, अप्रतिम काव्यरचना सादर केली, त्याच चित्रपटात 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने' सारखे निख्खळ प्रेमाची, आनंदाची भावना व्यक्त करणारे गाणेही तितक्याच प्रसन्नपणे सादर केले. 'कहीं दूर जब दिन ढ़ल जाये' म्हणून आपल्यातच हरवलेला आनंद तो हाच का? त्या आनंदचे दुःख आपल्या आवाजात सहज मिसळणारा हाच का तो मुकेशचा आवाज? कसं शक्य आहे? या गाण्याची सुरुवातच 'मैने' अशी थोडीशी प्रोजमध्ये पण खोडकर आवाजात मुकेश करतो - जणू पुढे येणाऱ्या एका सुंदर गाण्याची प्रस्तावनाच त्या एका शब्दात होते.
संगीतकार सलिल चौधरींबद्दल काय लिहीणार? त्यांची संपूर्ण कारकीर्द या आणि अश्या असंख्य गाण्यांनी सजलेली आहे. या गाण्यातही आनंदचं जीवनावरचं प्रेम, त्याचं झोकून देणं सुरांत छानपैकी येतं. पडद्यावर राजेश खन्नाने आणि गीतकार गुलज़ारनी या एका गाण्यात जणू आनंदचे पूर्ण व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. आपला अटळ मृत्यू क्षणाक्षणाने जवळ येतो आहे पण त्याआधीचे लाखो क्षण 'जगायचं' आहे हा ध्यास गाण्यात प्रकर्षाने जाणवतो. हेच कडवं बघा ना -
रुठी रातें, रुठी हुई रातों को मनाया कभी
तेरे लिये बिती सुबह को बुलाया कभी
तेरे बिना भी, तेरे लिये ही
दिये जलाये राहो में
मुकेशचा आवाज असा काही खुलतो या गाण्यात की वाटतं या आवाजात दुःख व्यक्त करणारी गाणी कशी शोभतील? एका सच्च्या पार्श्वगायकाचं यश याहून निराळं काय?
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं (दिल ही तो है) - १९६३ सालचा हा चित्रपट त्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या मुस्लिम वातावरणावर आधारित होता. राज कपूर, नूतन, प्राण मुख्य भूमिकांमध्ये, रोशनचं संगीत, साहिरच्या लेखणीतून उतरलेली गीतं - खरं तर चित्रपट लोकप्रिय आणि स्मरणिय होण्यासारखं बरंच काही होतं. पण चित्रपटापेक्षा त्यातली गाणीच जास्त गाजली. साहजिकच आहे! मुळात, गीत-संगीताची बाजू भरभक्कम होतीच; जोडीला लता, आशा, मुकेश, मन्ना डे यांसारखे नावाजलेले गायक... त्यामुळे 'निगाहें मिलाने को जी चाहता है', 'लागा चुनरी में दाग', 'भूले से मुहोब्बत कर बैठे', 'चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना', 'तुम्हारी मस्त नज़र गर इधर नहीं होती' आणि 'तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं' यांसारखी एकाहून एक सरस गाणी आजही चोखंदळ श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. (जाता-जाता सहज आठवलेली एक गोष्ट म्हणजे पुढे थोडे-फार संगीत-दिग्दर्शन स्वतंत्रपणे करणारे सोनिक-अोमी या चित्रपटात रोशनचे सहाय्यक होते.)
नायिका जमीला हिचा आवडता गायक चाँद, पण तिने प्रत्यक्ष कधी त्याला पाहिलेले नाही. मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना एका युवकाशी तिची टक्कर होते. तिचा राग तर तिच्या चाफेकळीसारख्या नाकावर फणकारा होऊन सदाचाच मुक्कामाला. एका रुप-गुण-ऐश्वर्यवतीच्या मागे लागणाऱ्यांची काय कमी? त्यामुळे त्या टक्कर झालेल्या युवकालाही त्यातलाच एक समजून ती नुसती वैतागून जाते पण तिला काय माहीत की त्या फणकाऱ्यानेही तो घायाळ झालाय? जणू त्यांची मंज़िल एकच असल्यासारखे दोघे पाठोपाठ वाढदिवसाच्या समारंभात पोहोचतात. त्याला बघून तिचा पारा आणखीच चढतो आणि तिला तिथे बघून तो जास्तच घायाळ होतो. मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती काही शेर ऐकवते आणि मग मैत्रिणीचा भाऊ मैफिलीसाठी खास बोलावलेल्या प्रसिद्ध गायक चाँद याला गाण्यासाठी आमंत्रित करतो. ती उत्सुकतेने पहायला लागते की आपला आवडता गायक एकदाचा आपल्याला दिसणार तर काय! ज्याच्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लालेलाल झालेला तोच नेमका चाँद निघावा! बरं, त्यानी गाणं तरी काय निवडावं?
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी अौर को चाहोगी तो मुश्किल होगी
पुढे जाऊन तो असंही म्हणतो -
तुम हंसी हो, तुम्हे सब प्यार भी करते होंगे
मैं जो मरता हूँ तो क्या, अौर भी मरत होंगे
सब की आँखों में इसी शौक़ का तूफ़ाँ होगा
सब के सीने में यहीं दर्द उभरते होंगे
मेरे ग़म में ना कराहो,
मेरे ग़म में ना कराहो तो कोई बात नहीं
तो कोई बात नहीं
अौर के ग़म में कराहोगी तो मुश्किल होगी
प्रथम-दर्शनी प्रेमात पडलेल्या, अगदी पार बुडालेल्या नायकाची मनोवस्था मुकेशनी फारच गोडपणे गायली आहे. त्यामुळे नूतनच काय - अशी प्रेमळ धमकी दिल्यावर आपलीही अवस्था 'निगाहें मिलाने को जी चाहता है' अशी झाली नाही तरच नवल. ही अशी सुंदर प्रेमगीतं, प्रेमाचा हक्क सांगणारी गाणीही किती छान वाटतात मुकेशच्या आवाजात! कल्याण रागात बांधलेलं हे गाणं ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अतिशय शांत पण संयमित स्वर, तशी बऱ्यापैकी मोठी कडवी, पडद्यावरच्या राज कपूरच्या भूमिकेचा बाज - हे सगळं लक्षात घेतलं तर जाणवतं की गाणं गायला तितकं सोपं नाही; मधुनच पेरलेली लयीची, समेची गंमत गाण्याचा गोडवा आणखीच वाढवते - आणि हे सगळं सांभाळून लय, सम, ताल कुठेही न ढळू देता, गाण्यातले भाव हरवणार नाहीत याची काळजी घेऊन गाणं अाज चाळीस वर्षांनंतरही आपल्या अोठांवर खेळते यात मुकेशच्या गायकीचा वाटा फार मोठा आहे.
जिस गली में तेरा घर ना हो बालमा (कटी पतंग) - कटी पतंग फार पुर्वी कधी तरी पाहिला होता. तेव्हा त्यातला कथेचा भाग समजण्याची अक्कल नव्हती, पण तरी गाणी मात्र आवडली होती. नंतर चित्रपट परत पहायचा योग यायच्या आधी गुलशन नंदांची मूळ कादंबरी वाचायचा योग आधी आला. तोवर थोडी फार समज आली असावी कारण पुस्तक वाचल्या-वाचल्या चित्रपट पहायची अोढ लागल्याचं आजही स्पष्टपणे आठवतंय. राजेश खन्ना सुपर-हिरो असण्याच्या काळातला हा चित्रपट. साहजिकच, चित्रपटात हिरोला झुकतं माप मिळणं सहज-शक्य होतं, शिवाय त्याची भूमिकाही सतत प्रेक्षकांची सहानुभूती मिळत राहिल अशी, पण तरी आता चित्रपट पाहताना त्यातली आशा पारेखची मधू/ पूनमही तितकीच लक्षात राहते. विवाह-मंडपातून पळून आपल्या प्रियकराकडे गेलेली मधू ते मरताना आपल्या मैत्रिणीला दिलेल्या वचनासाठी लग्न न होताच विधवा झालेली, एका बाळाचं आईपण स्विकारुन आणि लग्नाला विरोध असलेल्या, कधी न पाहिलेल्या सासरी निघालेली पूनम हा स्त्रीचा प्रेयसी, मुलगी, मैत्रिण, सून, आई या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यातला प्रवास पडद्यावर फारच छान आणि हृद्यपणे दाखवला आहे. मैत्रिणीच्या सासरी तिची जागा घेऊन राहताना तिची भेट होते ती नेमकी त्या कुटुंबाचा स्नेही असलेल्या आणि तिच्याशी लग्न ठरलेल्या कमलशी. त्या दोघांची कधी भेट न झाल्याने त्याने तिला अोळखायचं काहीच कारण नसतं. या एकाकी, दुःखी, विधवा पूनमच्या तो प्रेमात पडतो. इतका की -
जिस गली में तेरा घर न हो बालमा,
उस गली में हमें से हमे तो गुजरना नहीं
जो ड़गर ते द्वारे से जाती न हो,
उस ड़गर पर हमें पांव रखना नहीं
कथा-कादंबऱ्यांतून स्त्रीच्या प्रेमाच्या शक्तीचं, तिच्या आपल्या प्रियकरावरच्या/ पतीवरच्या श्रद्धेचं, भक्तीचं वर्णन, उदात्तीकरण आपण पुष्कळ वेळा वाचतो आणि त्याचवेळी पुरुषाच्या भ्रमरवृत्तीचंही. पण इथे गीतकार आनंद बक्षींनी एका पुरुषाच्या ठिकाणीही तेच प्रेम, तीच एकात्मता दाखवुन प्रेमाचं अत्युच्च टोक पुरुषही गाठू शकतो हे दाखवून अतिशय उत्तम समतोल साधला आहे. संगीतकार राहुल देव बर्मनची कारकीर्द शिखर गाठण्याच्या काळात मुकेश दुर्दैवाने या दुनियेतही नव्हते. त्यामुळे त्याच्या संगीतरचनेला मुकेशचा स्वर लाभण्याच्या संधी तश्या फारश्या आल्या नाही. या चित्रपटातही राजेश खन्नाच्या तोंडी असलेली इतर सगळी गाणी किशोर कुमारनी म्हटली. चित्रपटामधलं एकूण एक गाणं चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण हे असं मनाच्या आत-आत उतरणारं गाणं गायला मात्र मुकेशचाच स्वर निवडला गेला आणि तो निर्णय किती योग्य होता, हे गाणं ऐकताना अगदी पहिल्या सुरापासूनच लक्षात येतं. या रचनेला न्याय देण्यासाठी लागणारी गळ्याची जात आणि गाण्याची समज केवळ मुकेशलाच लाभली होती.
ज़िंदगी में कई रंग-रलिया सहीं,
हर तरफ़ मुस्कुराती ये कलिया सहीं
खुबसुरत बहारों की गलिया सहीं
जिस चमन में तेरे पग में काँटें चुभेँ
उस चमन से हमें फूल चुनना नहीं
गीत-संगीत-सुर यांची त्रिवेणी किती जादू करते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि गाणं अधिक उंची गाठतं ते माझ्या मते मुकेशच्या आर्त, शब्द-सुरांची जाणीव असलेल्या आवाजामुळे.
जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे (सफ़र) - एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांना नियतीच्या एका इषाऱ्यानिशी वेगळ्या वाटेने चालणं भाग पडतं - ते ही केवळ त्याच्या इच्छेखातर. त्याला कॅन्सर झाल्याचं कळल्यावर तो खचतो, पण ती मात्र तरीही खंबीर असते, आपल्या निर्णयावर ठसम राहते, जितकी पावलं चालायची ती दोघांनी हातात हात घेऊनच. पण त्याला मात्र तिचं हे रोजचं मरण मान्य नाही; आपल्या विधीलिखिताशी तिने स्वतःचं नशीब बांधण्यापेक्षा तिने आपलं आयुष्य जगावं, फुलवावं. दोघांच्याही मनात खरं तर एकच इच्छा आहे - दुसऱ्याचं आयुष्य होता-होईतो आपल्यामुळे चांगलं जावं - पण कधी-कधी या दोन चांगल्या इच्छा एकमेकांना छेद देतात त्या या अश्या! शेवटी तिला त्याच्या इच्छेखातर, त्याचे उरलेले दिवस त्याला जे हवंय ते द्यावं यासाठी दुसऱ्याशी लग्न करणं भाग पडतं. मेडिकल कॉलेजचा खर्च एकट्या भावावर पडू नये म्हणून ती एका श्रीमंत घराण्यातल्या मुलाची शिकवणी घेत असते. त्याचा मोठा भाऊ खरं तर पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलेला. शेवटी कुणाशी तरी लग्न करायचंच तर त्याच्याशी केलं तर काय फरक पडतो या भावनेने ती लग्न करते आणि नवऱ्याचं आख्खं आयुष्य जणू उजळुन निघतं!
जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे
देते ना आप साथ तो मर जाते हम कभी के
पूरे हुए हैं आप से, अरमान ज़िंदगी के
हम ज़िंदगी को आपकी सौगात कहेंगे
१९७० चा हा चित्रपट. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ही पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय जोडी. पण चित्रपटात हे गाणं मात्र आहे तिच्या नवऱ्याच्या भूमिकेतील फिरोज़ खानवर चित्रित केलेलं. फिरोज़ खानच्या चित्रपटातील भुमिकेशी हे गाणं अत्यंत सुसंगत आहे. याचं श्रेय गीतकात इंदीवर यांना. कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताबद्दल वेगळं काय सांगणार? इतक्या गंभीर चित्रपटातलं प्रत्येक गाणं लोकप्रिय करण्याची करामत ते करु शकतात यातच सगळं आलं. हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्ण कारकीर्द करुनही कुठल्याही व्यसनापासून, वाईट सवयींपासून - इतकंच कशाला तर कुठल्याही वादंगापासून दूर राहिलेले लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. या गुर्जर बंधूंवरचे संस्कार इतके पक्के होते की त्यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. हे सगळं टाळूनही मोठी आणि दर्जेदार कारकीर्द कशी करावी याचं आदर्श उदाहरण आह ही संगीतकार द्वयी.
मुकेशच्या आवाजाचं मला राहून-राहून आश्चर्य वाटतं. हाच का तो आवाज, 'मेरे टुटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे' म्हणून आपल्या असफल प्रेमाची फरियाद आपल्यापुढे मांडतो? मग त्याच आवाजात 'तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे' यातलं प्रेमाचं समर्पण, तादात्म्य कसं आपल्याला पटतं? बरं, आवाज फार वेगळा लावलाय असंही नाही आणि नुसती शब्द-सुरांची जादूही नाही - ती आहेच, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतं, अगदी थेट आपल्या हृदयात; ते मुकेशच्या आवाजातच.
कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे (पूरब अौर पश्चिम) - १९७० सालचंच, इंदीवर यांनी लिहीलेलं आणि कल्याणजी-आनंदजींनीच संगीत दिलेलं हे गाणं. गाण्याचा गाभाही तसाच - आत्यंतिक प्रेम आणि त्यासाठी काहीही करायची तयारी. इथे फरक इतकाच, की त्याला कळलंय आपलं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे; पण तिला मात्र त्याची जाणिवच नाही. ती रुपगर्विता, पाश्चात्य संस्कारात वाढलेली - तिला याचं साधंभोळं पण जीव अोतून केलेलं प्रेम मुळी समजतच नाही. त्याला याची कल्पना आहे आणि तिला ते कळेपर्यंत थांबण्याचा संयमही त्याच्याजवळ आहे. तिला जरी आज आपल्या रुपाच्या, श्रीमंतीच्या भ्रमामुळे उद्याची कल्पना करवत नसली तरी त्याला समजतंय की आज जे तिच्या अवती-भवती रुंजी घालताहेत, ते उद्या यौवनाचा भर अोसरल्यावर, रुपाची झळाळी कमी झाल्यावर तिच्याजवळपासही फिरकणार नाहीत.
अभी तुमको मेरी ज़रुरत नहीं, बहुत चाहनेवाले मिल जायेंगे
अभी रुप का एक सागर हो तुम, कँवल जितने चाहोगे खिल जायेंगे
दर्पन तुम्हें जब ड़राने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे
मेरा सर झुका है, झुका ही रहेगा, तुम्हारे लिये
कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तब तुम मेरे पास आना प्रिये,
मेरा दर खुला है, खुला ही रहेगा, तुम्हारे लिये
'जंगली' चित्रपटामधली सायरा बानू रुपगर्विता म्हणून सहज पटते, पण तिथे ती अस्सल भारतीय संस्कारात वाढलेली, मुग्ध युवती आहे. इथे मात्र विदेशी अंश दाखवण्यासाठी विग घातलेली, तंग, अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेली, सहजगत्या सिगरेट पेटवणारी सायरा बानू रुपगर्विताही वाटत नाही आणि विदेशी म्हणून शोभतही नाही. इतकं सुंदर गाणं मुकेशला परत एकदा मनोज कुमारसाठी गायला लागलं. थोडक्यात, हे फक्त ऐकण्याचं आणि भाग्यवान असलात तर अनुभवण्याचं गाणं आहे. मुकेशच्या आवाजाच्या जादूने थोडा काळ का होईना हा अनुभव ऐकणारा घेतोच.
प्रेमाची किती विविध रुपं असतात! अगदी एकतर्फी प्रेमापासून ते असफल प्रेमापर्यंत... पण दोन जीव जेव्हा एक होतात किंवा प्रेम जेव्हा समर्पणाचं रुप घेतो तेव्हा ते परमोच्च बिंदु गाठतं. केवळ आवाजातून ही भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं महाकठीण! काही भाग्यवंतांनाच ही किमया साधते. सुदैवाने मुकेशला ते सहज जमतं आणि वर लिहीलेली आणि अशीच इतर काही गाणी चिरंतन होतात. जोपर्यंत प्रेम आहे, जोवर आपल्यासारखे रसिक आहेत, तोवर या गाण्यांची आठवण काही कारणाने किंवा कधी कारणाशिवायही येतच राहणार. मृत्यू होऊन जवळपास सदतीस वर्षं होऊनही रसिकांच्या मनात मुकेशची जागा कोणालाच घेता आलेली नाही - अगदी बराचसा तसाच आवाज असलेल्या मुकेशच्या मुलाला - नितीन मुकेशलाही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा