कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ एप्रिल, २०१२

इतिहास

माणूस इतिहास का वाचतो ?
पूर्वजांच्या चुका टाळण्यासाठी !
पण नाही !  
कारण, आजही,
काळाची इतकी पाने उलटल्यावर,
आणि रोज इतिहासात भर टाकल्यावरही,
माणूस चुका करतो -
केवळ नव्याच नाही; तर जुन्याही.

मग माणूस इतिहास का वाचतो ?
आपल्या चुकांना आधार शोधण्यासाठी -
'श्रेष्ठ' पूर्वजांच्या चुकांचा…

पण शेवटी हे चूक - बरोबर व्यक्तिसापेक्षच
आणि जे कालनिरपेक्ष असत नाही,
ते अंतीम सत्यही असत नाही.
कारण बदलत्या काळाबरोबर,
बदलत्या संस्कृतीबरोबर,
चूक - बरोबरच्या व्याख्या बदलतात.
काळ मात्र वाहतच असतो…
आणि म्हणूनच,
पहिल्यानंतर दुसरे महायुद्ध होते
आणि तिसऱ्याची जमवाजमव सुरू होते.
यासाठी मात्र इतिहासाची पाने
परत परत चाळावी लागतील.
तरीही या चुकीला आधार मिळणार नाही…
होय, ही निःसंशय चूकच !
कारण या चुकीनंतर
उरतील ना माणसे,
ना उरेल आपल्यासाठी काळ.
आणि म्हणूनच ही चूक
व्यक्तीसापेक्ष असणार नाही,
तर असेल कालनिरपेक्ष अंतीम चूक !

माणूस इतिहासातून खरंच काही शिकतो का ?

शनिवार, ३१ मार्च, २०१२

इसापनिती

भेटला जर का इसाप मला
तर मी विचारेन त्याला
एवढी सगळी माणसे सोडुन
का ठरवलेस मला लबाड?

मी तर राजी काकडीला
द्राक्षेसुद्धा आंबट मला
माणूस मात्र मिळवू पाहतो
एका रात्रीत मोठे घबाड....

सोमवार, २६ मार्च, २०१२

देव

एकदा स्वप्नात देव आला
जागेपणी आमची भेट होण्याची तशी शक्यता नाहीच
खरं तर मी अोळखलंच नाही,
तेव्हा त्यानीच आपली अोळख करुन दिली
थोडं अवघडुन मी म्हटलं, सॉरी हं, मी अोळखलं नाही
आपली कधी भेटही नाही झाली आणि परिचयही नाही
तो नुसताच हसला
घरी आलेल्या पाहुण्याला म्हणावं तसं म्हटलं,
बसा की, मी पाणी घेऊन येते
पाणी घेऊन गेले तर तो इकडे-तिकडे बघत होता - उभ्याउभ्याच
विचारलं, काय झालं?
म्हणाला, भेट झाली नाही, परिचय नाही म्हणालीस,
पण स्वयंपाकघरातच छोटंसं देवघर केलंयस,
गणपती-देवीच्या मूर्ती-वॉल हॅंगिंग-घड्याळंही दिसताहेत.

एक क्षण मी गडबडलेच,
मग सावरुन म्हटलं
घर म्हणून असावं या समजुतीनी घरच्यांनी दिलंय
मोठ्यांचा अनमान करायचा नाही या संस्कारामुळे ठेवलंय सगळं
कधी वाटलं तर पूजा करतेही,
पण खरं तर मन नसतं त्यात

वाटलं थोड्याश्या परिचयावर आपण जरा जास्तच आगाऊपणा केला का?
पण त्याच्या चेहऱ्यावर तरी काही जाणवलं नाही
कारण अगदी सहजपणे म्हणाला,
मग मन कुठे रमतं तुझं?
म्हटलं पुर्वी कामात,
आता पुस्तकं वाचण्यात, गाणी ऐकण्यात, कधी गुणगुण्यात…
आवडीचा सिनेमा बघण्यात
अगदी आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधीतरी स्वयंपाक करण्यात सुद्धा!

तर विचारलंन्, काय वाचतेस?
म्हटलं काहीही! गोष्टी, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, तत्वज्ञान, कविता - सगळं काही!
म्हणाला त्यात कुठेच मी नाही भेटलो?
म्हटलं खरं सांगायचं तर तुझी अोळखच नव्हती कधी झाली - कसं कळणार तू त्यात भेटलास का?

त्यावर म्हणाला, तुझा आयुष्याचा प्रवास मी अगदी जवळुन पाहिलाय
कारण प्रत्येक क्षणी मी होतो तुझ्याबरोबर…
त्यामुळे तू जे-जे अनुभवलंस ते सगळं मीही अनुभवलंय तुझ्याबरोबर.
खूप वेळा वाटलं तुला तिथून उचलावं
पण तुझ्या हट्टी आणि दृढनिश्चयी स्वभावामुळे तुला पटेलसं वाटेना.
माझ्या चेहऱ्यावर त्याला काहीतरी दिसलं असावं
कारण म्हणाला, का? अशी अविश्वासानी का बघतेस?
मी म्हटलं, खरं सांगू?
पण मला तुझी आठवण कधी झालीच नाही.
कारण मी कधी कुणाचं वाईट केल्याचं आठवत तरी नाही,
अगदी विचारानीही.
त्यामुळे आयुष्याची भीति कधी नाही वाटली.
संकटांना घाबरायला कधी कोणी शिकवलंच नाही,
त्यांच्याशी झगडुन पुढे जाण्यात जी मजा येते ती तुला हाक मारुन कशी येईल?
शिवाय आता माझ्या हातांत दुसरे दोन हात…

मी भरभरुन बोलतच राहिले आणि अचानक लक्षात आलं
त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं…
मी एकदम थांबले, म्हटलं, काय झालं? माझं काही चुकलं का?
मला म्हणाला, मध्यंतरी काही वर्षं तुझ्याबरोबर नव्हतो मी
कारण तुला माझी गरज नव्हती
पण आता वाटलं की कदाचित आता तुला माझी मदत होईल
पुढची वाट अवघड आहे, अनिश्चित आहे तर माझी साथ होईल.
पण तू होतीस तशीच आहेस, ठाम, कणखर पण पवित्र
शिवाय तू म्हणालीस तसे तुझ्या हातांत त्याचे दोन हात आहेत
आणि तुझ्या मनात तो भरून राहिलाय
तेव्हा तुझी काळजी करण्याची मला अजुनही गरज नाही.
तू आहेस तशीच बरी आहेस.

पटलं ना? मी देव स्वप्नात आला असं का म्हटलं?
कारण खरंच आमची अोळख नाही…