रविवार, ५ मार्च, २०२३

नवी पहाट - भाग ५

- ५ नवी आशा -

"सुभाष, सॉरी, मगाशी मी जरा जास्तच कडक शव्दांत बोललो. But believe me, तुम्हांला दोघांना दुखवायचा हेतू नव्हता. तर विप्लविच्या वागण्यात जो बदल गेल्या दोन महिन्यांत झालाय त्याची आणखी काही तर्कसंगती लागते का मला बघायचं होतं. विप्लवि आता नऊ वर्षांची होईल ना? म्हणजे तिच्या वयाच्या मानाने तिची पाळी खूपच लवकर आली. साधारणपणे आईची पाळी ज्या वयात सुरु होते त्याच्या जवळपास मुलीचीही सुरु होते. म्हणून मी जरा खोदून विचारत होतो. आता मला थोडा अंदाज यायला लागलाय. मला एक सांगा, स्त्री-पुरुष संबंधांबद्दल विप्लविला काही माहिती?"

"तिची मासिक पाळी इतक्या लहान वयात सुरु होईल हे मलाही थोडं अनपेक्षित होतं. त्यामुळे दुर्दैवाने त्याआधी तिला याबद्दल मी काहीच बोलले नव्हते. त्यामुळे पिरियड्स सुरु झाले तेव्हा ती फारच घाबरली. अचानक रक्त पाहून ती तर रडायलाच लागली! नशीब तो शनिवार होता, त्यामुळे शाळेला सुट्टी होती. ती रडायला लागल्यावर अर्थातच बाबांकडे गेली! डॉक्टर, आत्ता-आत्तापर्यंत ही मुलगी काही ठेच वगैरे लागली तरी तिच्या तोंडून 'आई गं' च्या ऐवजी 'बाबा' यायचं! पण तिनी जेव्हा रक्त येतंय वगैरे सांगायला सुरुवात केली तेव्हा ह्यांच्या लक्षात आलं की आत्ता तिला गरज 'बाबां'पेक्षा 'आई'चीच आहे. त्यांनी कसंबसं तिला समजावलं आणि मलाही तिला काय होतंय ते सांगितलं. माझ्या पोटात तर मोठ्ठा गोळा आला. इतक्या लहान वयात हे मासिक उपचार तिच्या मागे लागले - कसं जपू मी माझं कोवळं पिल्लू आता?

पण प्रश्न माझ्या भीतीचा नव्हता - आधी तिला जवळ घेऊन तिला मासिक पाळी, त्या काळात पाळायची स्वच्छता हे सगळं सांगायचं होतं; मुख्य म्हणजे तिला काहीही 'झालेलं' नाही हा धीर तिला द्यायचा होता. ते सगळं केलं. तिनी असंख्य प्रश्न विचारले. माझ्या परीने मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी तिच्या शाळेत जाते मधून मधून तेव्हा चौकशी करते, पण तिच्या शाळेत याबद्दलची माहिती मुलं-मुली पाचवीत गेली की देतात. त्यामुळे मीच तिला पाळीचं मुख्य कारण, वगैरेबद्दल सांगितलं. आत्तापर्यंत तिला फक्त private parts, good touch, bad touch, परक्या पुरुषांना आपल्याला स्पर्श करु द्यायचा नाही, वगैरे ठराविक गोष्टी तेवढ्या शाळेत शिकवल्या होत्या. फक्त मी आणि आजीने तिला पुरुष म्हणजे तिचे बाबा, दोन्ही आजोबा, प्रसादकाका, अजितदादा आणि आमचे ड्रायव्हर अशोककाका हे सोडून, एवढं शिकवलं होतं. आमच्या घरातल्या पुरुषांबद्दल तेवढा विश्वास आहे आम्हांला. अशोककाका तर सुभाष आणि स्वप्ना लहान होते तेव्हापासून आमच्याकडे आहेत. घरातलं कोणीच त्यांना परक्यासारखं वागवत नाही आणि त्यांचाही विपूवर भारी जीव आहे. आणि सुभाषसाठी विपू आणि विपूसाठी बाबा म्हणजे अजिबात वेगळी न करता येणारी जोडगोळी आहे… होती." शेवटचं 'होती' म्हणताना वसुचे डोळे पुन्हा भरुन आले.

"बरं मला सांगा, तिची मासिक पाळी जेव्हा सुरु झाली, तेव्हा तुम्ही तिच्या शाळेत कळवलं असेल ना?"

"हो, अर्थातच! कारण अचानक शाळेत असताना पिरियड्स सुरु झाले तर ती गोंधळून जाऊ नये म्हणून तिच्या शिक्षकांच्या कानावर घालणं गरजेचं होतं. शिवाय खेळाच्या तासाला तिने जर खेळायचे नाही सांगितले तर त्यांना कारण माहीत असलेले बरे."

"हं… मला वाटतं मला एकदा विप्लविला भेटता आलं तर फार बरं होईल."

"नाही, डॉक्टर, ते तर अजिबात शक्य नाही होणार! गैरसमज करुन घेऊ नका, पण तिला इथे आणलं तर तुम्हांला पाहून तिला परत panic attack येईल."

"थांब, वसु, मला एक कल्पना सुचतेय. डॉक्टर, मी जरा विचित्र सुचवतोय, पण तुम्ही आमच्या घरी..."

"हो, जरूर" सुभाषचं वाक्य पूर्ण व्यायच्या आतच डॉक्टर म्हणाले. "मला वसुंधराताईंचं पटतंय. तिला इथे आणून उत्तेजित करण्याने काहीच साधणार नाही. त्यापेक्षा घरच्या, तिच्या विश्वासाच्या वातावरणात तिला भेटणं जास्त योग्य होईल. या शनिवारी किंवा रविवारीच आलं तर चालेल?"

"हो, हो… अगदी कधीही चालेल!"

"असं करु, मग मी उद्याच दुपारी चारच्या सुमारास येतो. आणखी एक, मी येणार आहे आणि खरा कोण आहे याची तिला अजिबात कल्पना द्यायची नाही. परक्या पुरुषाला पाहिल्यावर, भेटताना ती कशी रिअॅक्ट होते ते पाहायचंय मला."

"पण हे कसं जमवणार, डॉक्टर?"

"सुभाष, डॉक्टर - असं करता येईल का? तुम्ही आमच्या बाबांपेक्षा लहान असाल बहुधा, पण तिच्या ते एवढं लक्षात येईल असं नाही, कारण तुमच्याही केसांची तिच्या आजोबांसारखीच चांदी झाली आहे."

"आता इतके वर्षं मानसोपचारतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करुन मुळात डोक्यावर केस आहेत हेच आश्चर्य आहे असं माझी बायको म्हणते… सॉरी, तुम्ही काहीतरी सुचवत होतात. उगाच काहीतरी विनोद करत बसलो मी…"

"माझ्या मनात आलं, की तुम्ही बाबांचे मित्र म्हणून घरी आलात तर? म्हणजे तुम्ही घरी कसे येणार हा प्रश्नही राहणार नाही आणि तुम्हांला विपूला घरच्या वातावरणात पाहता येईल."

"उत्तम कल्पना आहे. फक्त एक करा, आई-बाबांना कल्पना देऊन ठेवा - सॉरी, वहिनी आणि श्रीरंगना कल्पना देऊन ठेवा… मला आत्तापासून डोक्यात ठेवायला पाहिजे!"

"डॉक्टर, मग तुम्हाला आम्हांलाही नावानेच हाक मारावी लागेल हे ही डोक्यात ठेवा बरं! मी सांगतो बाबांना. मग उद्या दुपारी चार वाजता येताय ना, काका? कसंही करुन माझ्या विपूला बरं करा हो!" बोलता-बोलता पुन्हा सुभाषचा आवाज भरुन आला!

वातावरण पुन्हा तंग व्हायला लागलं होतं. निघताना दोघे मनावर ताण घेऊन जायला नकोत म्हणून डॉक्टर म्हणाले "अरे, हो, माझी फी?"

"जाताना बाहेर रिसेपशनिस्टकडे देऊ ना?"

"वा, असं कसं? काम मी करणार आणि फी रिसेपशनिस्टला?"

सुभाष आता मात्र गोंधळला… तो आपला सवयीने जाताना रिसेपशनिस्टकडे फी देणार होता. स्पेशालिस्ट स्वतः कधीच पैशाचा व्यवहार करत बसत नाहीत हे एव्हाना त्याला माहीत झालं होतं. अमेरिकेत असताना प्रश्नच नसायचा - सगळा कारभार इन्शुरन्समार्फत असायचा.

वसुच्या एकदम काय मनात आलं, तिने पट्कन पुढे होऊन डॉक्टरांना नमस्कार केला.

लगेच डॉक्टर म्हणाले, "चला सुनबाईला तरी चांगलं वळण आहे हो! पण ही तर निम्मीच फी झाली! निम्मीही नाही खरं तर… पहिल्यांदा भेटताय, जोडीने नको करायला नमस्कार म्हाताऱ्याला?"

तेव्हा कुठे सुभाषच्या लक्षात आलं डॉक्टर काय म्हणत होते ते! तोही पुढे झाला आणि नमस्कारासाठी वाकला. वसुने पुन्हा एकदा त्याच्याबरोबर नमस्कार केला.

"आता कसं! आत्तापर्यंत केलात तसाच सुखाने संसार करा! अशी एकमेकांची साथ देणारी जोडपी तुमच्याही पीढीत कमीच दिसतात हल्ली… माझ्या पेशंट्सवरुन सांगतो ना! तेव्हा तुमच्यातलं हे विश्वासाचं, मैत्रीचं, प्रेमाचं नातं असंच टिकून राहू दे! राहता राहिला प्रश्न विप्लविचा - तो आता तुम्ही माझ्यावर सोडून मोकळे व्हा कसे! उद्या येतोच आहे मी…"

तिथून दोघे बाहेर पडले तेव्हा दोघांनाही विश्वास वाटत होता की आपण योग्य निर्णय घेतला. सुदैवाने बाबांनी माहिती काढून डॉक्टरही अगदी छान सुचवले होते. आता घरी जाऊन आई-बाबांना कधी एकदा हे सांगतो असं झालं होतं त्यांना. प्रश्न होता तो फक्त विप्लविचा. घरी जाऊन पाहतात तो आई-बाबा बाहेरच्या खोलीत सोफ्यावर वाटच पहात होते. विपूही होती पण तिला टॉम अँड जेरी लावून दिलं होतं, त्यामुळे ती त्यात गुंगली होती. विपू तिथे आहे म्हटल्यावर काही सांगणं शक्य नव्हतं, पण आश्चर्य म्हणजे आज-काल बाबांच्या वाऱ्यालाही उभी न राहणारी विपू बाबांना पाहून चक्क उठली आणि सुभाषला पुर्वीसारखीच घट्ट मिठी मारुन म्हणाली, "बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आणि आईला घेऊन गेलात फक्त… तुमच्या विपूला नाही नेलंत ना? मी रागावलेय आता तुमच्यावर!"

"अरे, पण आम्ही निघालो तेव्हा तुला हाक मारली की! असं कसं मी बाहेर जाईन माझ्या विपूला न नेता?"

"खरंच? खरंच, आई?"

"अग, पिल्लू, बाबा उगाच काहीतरी सांगतात का कधी तुला? तुला हाक मारली तरी तू तुझ्या खोलीच्या बाहेरही आली नाहीस म्हणून आजीने येऊन पाहिलं तर तू अभ्यास करत होतीस. वीकएंडचा सगळा होमवर्क पूर्ण करुन टाकला वाटतं? आणि तुझं जिग-सॉ कधी पूर्ण होणार? तुला सांगत होते दोन हजार पिसेस् असलेलं नको घेऊ करायला, वेळ लागला की कंटाळून जाशील… त्यापेक्षा हजार…"

"आई, मला हजार पिसेस् च्या जिग-सॉ चा कंटाळा आलाय! मजाच येत नाही त्यात… केव्हाच पूर्ण होतात. पण बरी आठवण करुन दिलीस, मी ते पूर्ण करते. बाबा, पण मला उद्या किंवा रविवारी बाहेर न्यायचं, प्रॉमिस?"

"नक्की! एकदम पिंकी प्रॉमिस!"

विपूला एकेक पायरी गाळत वर पोचलीसुद्धा आणि गेली आपल्या खोलीत जिग-सॉ पूर्ण करायला. ते करत असताना ती इतकी एकाग्र व्हायची की आजूबाजूला काय चाललंय, तिला अजिबात पत्ता नसायचा. फक्त तिला तिच्या खोलीचं दार बंद लागायचं.

इकडे सुभाष या सगळ्या ताणामुळे जागच्या जागी कोसळायच्या बेतात होता! तोच वसुने सावरलं त्याला, बाबाही उठून आले. दोघांनी मिळून त्याला सोफ्यावर बसवलं. तोवर आई दोघांसाठी पाणी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, "वसु, तू बैस इथेच. आत्ताच येते आहेस. मी चहाचं आधण ठेवलंय, आलेच चहा घेऊन सगळ्यांसाठी."

पाणी पिऊन सुभाष थोडा सावरला होता. "वसु, आपण कशाकरता गेलो होतो डॉक्टरांकडे? ही तर आपली नेहमीची विपू होती…"

"सुभाष, विप्लवि तिचा गृहपाठ करुन आली आणि तुम्ही दोघेही घरात नाही म्हटल्यावर परत तिचा मूड गेला होता. पण काल रात्रीसारखा प्रसंग पुन्हा नको, म्हणून हिने पट्कन टॉम अँड जेरी लावून दिलं तिला आणि हॉट चॉकलेट करुन दिलं. हळुहळु ती शांत व्हायला लागली आणि थोड्याच वेळात टॉम आणि जेरीच्या खेळात गुंगुन गेली. बहुधा त्यामुळेच तुम्ही परत आलात तोवर मधलं काहीच डोक्यात नसावं तिच्या आणि म्हणून ती परत तुझी विपू झाली. पण हे असंच टिकेल अशी वेडी आशा मात्र करु नकोस. तुम्ही गेलात तेच बरोबर होतं. थांब, ही आली चहा घेऊन की मग एकदमच सांगा दोघांना."

"बाबा, मी तोवर पट्कन साडी बदलून, हात-पाय धुऊन येऊ?" असं म्हणून वसु खरोखरीच पट्कन साडी बदलून, हाय-पाय धुऊन आणि तोंडावर गार पाण्याचे शिपकारे मारुन आली. आल्यावरचं विपूचं वागणं पाहून तीही चक्रावली होती. त्यामुळे तोंडावर गार पाणी मारल्यावर जरा जागं झाल्यासारखं वाटलं तिला! बाहेर जाताना नेसलेल्या साडीची घडी घालून ती बाहेर आली तोवर आई येतंच होत्या चहा आणि चिवडा घेऊन.

सुभाष आणि वसुनी डॉक्टरांकडे झालेलं सगळं बोलणं आई-बाबांना सांगितलं. विप्लविच्या जन्माचं रहस्यही डॉक्टरांना सांगावं लागलं कळल्यावर त्या सगळ्या प्रकरणाचीच आठवण येऊन आईँच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या उठल्या आणि वसुच्या शेजारी जाऊन तिच्या पाठीवरुन मायेनी हात फिरवू लागल्या. "वसु, हे सगळं परत उगाळायला लागलं नसतं तर बरं झालं असतं गं! सुभाष, तुला तरी कळायला नको, वसुसमोर सगळं परत सांगितलंस ते? बिचारी मोठ्या मुश्किलीनी सावरली होती त्यातनं. त्यात नेमका गेले दोन महिने विप्लविचा त्रास डोक्याला. तू निदान ऑफिसमध्ये जातोस तेवढी तरी सुटका मिळते तिला. पण हिला आहे का काही सुटका? आईपण मोठं कठीण असतं बाबा… तुम्हां पुरुषांना नाही कळायचं ते." आईंनी डोळ्याला पदर लावला.

"अग, आई, मला तरी काय कल्पना डॉक्टर इतक्या मागे जाऊन सगळी चौकशी करतील?"

"बरं सुभाष, डॉक्टर उद्याच घरी येणार आहेत त्याबद्दल विचार करा जरा…"

"बाबा, सुदैवाने डॉक्टरांना तुमची कीर्ति चांगली माहिती आहे. त्यामुळे तसा बोलायला प्रश्न पडू नये. आमचं बोलणं झालंय की त्यांनी तुम्हांला दोघांना डॉ. जोग आणि मिसेस जोग न म्हणता श्रीरंग आणि वहिनी म्हणायचं आणि मला आणि वसुलाही नावानेच हाक मारायची."

"मला काय वाटतं," वसु बोलू लागली, "मी विपूला घेऊन ते यायच्या आधी बाहेर जाईन आणि ते आले की थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. म्हणजे डॉक्टरांना बाबांना काही डॉक्टरी प्रश्न विचारायचे असले तर ते ही होऊन जाईल आणि आम्ही बाहेरुन घरी आलो की अचानक घरात कधी न पाहिलेला पुरुष पाहून विपू कशी रिअॅक्ट करते ते ही डॉक्टरांना प्रत्यक्ष पाहता येईल. कशी वाटते कल्पना?"

"वसु, तुझी कल्पना उत्तम आहे! मला वाटतं तुम्ही इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता मानसोपचारतज्ञाची मदत जास्त वेळ वाया न घालवता लगेच घेता आहात, हे फार बरं झालं. विपूचं लहान वय बघता जितक्या लवकर उपचार होतील तितक्या लवकर ती या सगळ्यांतून बाहेरही पडेल आणि मुख्य म्हणजे तिच्या मनावर याचा कायमचा ठसा उमटू नये म्हणून आपण काळजी कशी घ्यायची ते ही डॉ. जोश्यांना विचारु. बरं, उद्याचं कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे ना? आणि सुमती, मुख्य म्हणजे तू अजिबात दिवसभर काही दडपण घेऊन वावरायचं नाही. ते दुपारी चार वाजता येणार आहेत, तेव्हा तोपर्यंतचा दिवस नेहमीप्रमाणेच चालू दे सगळं. वसु, तू केव्हा बाहेर पडणार आहेस?"

"वसु, मी काय म्हणते - मुद्दाम असं प्लान करुन बाहेर जायच्या ऐवजी मी तुला सकाळी काही गोष्टी आणायची यादी दिली तर?"

"ते फार बरं होईल, आई! फक्त प्रश्न राहील तो विपूला बाहेर यायला कसं तयार करायचं त्याचा… पण ते जमवते मी कसं तरी."

"अरे, तुम्ही सासवा-सुना फारच तयारीच्या निघालात की! सुमती, नाही म्हणजे, मला खरंच तुझीच जरा काळजी वाटत होती, कारण तू पट्कन टेन्शन घेतेस."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा