कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ मार्च, २०२३

नवी पहाट - भाग १

साहित्याचा आणि माझा परिचय खरं तर वाचण्यापुरता मर्यादित. त्यामुळे साहित्य-प्रकार, त्यांच्या व्याख्या, शाखा, समीक्षा - या सगळ्यांशी रुढार्थाने कधी संबंध आला नाही. उदाहरणार्थ, 'नाटक' या प्रकाराची बांधणी कशी करायची? म्हणजे त्यात किती अंक असावेत, प्रत्येक अंकात किती प्रसंग असावेत याचे काही बंधन आहे का?, ते रंगभूमीवर सादर होताना किती काळ असावा? या तांत्रिक गोष्टी कधी शिकायला मिळाल्या नाहीत. कवितांत जसे हायकू, चारोळी, सुनीत ते महाकाव्य इतका मोठा आलेख आहे तसाच तो कथांतही आहे. क्षणकथा, रुढार्थाने वाचक जिला कथा म्हणतो ती कथा, दीर्घकथा, कादंबरी - या सगळ्यांत फरक केवळ त्यांच्या लांबीचा नाही. केवळ लेखकाने एखादी कथा पन्नास पृष्ठे भरतील एवढी मोठी लिहिली म्हणजे ती दीर्घकथा होत नाही. किंवा केवळ पान-दीड पानात लिहिली तर ती क्षणकथा होत नाही. थोडक्यात साहित्य-निर्मितीचेही आपले असे तंत्र आहे.

जेव्हा लिखाणात लुडबुड सुरू केली तेव्हा केवळ मनात आलेले कागदावर उतरवणे एवढाच मर्यादित आवाढा होता. पण लिहित गेले तशी चुकत-माकत, कधी गरजेपोटी, कधी एखादे वेगळे तंत्र वापरुन बघण्यासाठी तर कधी जे लिहित होते त्याची गरज म्हणून थोडं फार या तांत्रिक अंगाचे वाचनही करत गेले.

ही कथा लिहिली ती एक समस्या डोक्यात होती ती कथेचं रुप घेऊन आली म्हणून. पण मागे बघून विचार करता आता ती नुसती लांबीने मोठी कथा नाही तर माझ्यासाठी ती एक दीर्घकथा आहे. रोज एक भाग इथे लिहायचा असा विचार आहे. संपूर्ण कथा लिहून झाली की मला ती दीर्घकथा का वाटते याचे कारण देण्याचा प्रयत्न करीन. तुमचेही मत सांगा.




नवी पहाट 
- १ नव्या वादळाची चाहूल -

डॉ. जोशींची अपॉईंटमेंट घेतली खरी, पण वसुंधरा मात्र तेव्हापासून आणखीच हळवी झाली होती. रात्री स्वयंपाकघरातलं सगळं आवरुन झाल्यावर ती झोपायला जायला वळली. सहज की काळजीने हे तिलाही सांगता आलं नसतं, पण नजर नकळत विप्लविच्या खोलीकडे वळली. खोलीत दिवा दिसला म्हणून वर बघायला गेली तर तिचं पिल्लू वाचता-वाचता टेबलवर डोकं टेकून तसंच झोपलं होतं. तिला तसं झोपलेलं पाहून वसुच्या डोळयांत नकळत पाणी आलं. 'किती निरागस दिसतेय! पलंगावर, सोफ्यावर आडवं पडून वाचायचं नाही ही सुभाषने घालून दिलेली शिस्त इतकं सगळं होत असतानाही पाळते आहे!' हलक्या हाताने तिचे पुढे झेपावलेले केस मागे सारुन ती हळूच म्हणाली, "शोन्या, झोपायचं नाही का? वाचता-वाचता अशी झोपलीस तर मान अवघडेल ना…" सुदैवाने विप्लवि इतकी झोपेत होती की निमूटपणे उठली आणि पलंगावर आडवी झाली. "दात घासले का?" हा ओठांवर आलेला प्रश्न वसुंधराने गिळून टाकला. न वाद घालता झोपली हेच काय कमी होतं! तिनी झोपलेल्या विप्लविच्या अंगावर तिची आवडीची आजीच्या साडीची गोधडी घातली. हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून, खोलीतला दिवा बंद करुन ती झोपायला आपल्या खोलीत गेली.

तिला वाटले सुभाष एव्हाना झोपला असेल. पण तो ही पुस्तक डोळ्यांसमोर धरून शुन्यात कुठेतरी नजर लावून बसला होता. त्याच्याकडे बघताना वसुला जाणवलं, त्याचे केस जरा जास्तच पांढरे दिसू लागले होते. तसे तर वयाच्या मानाने लवकरच पांढरे व्हायला लागले होते; पण ती वंशपरंपरागत मिळालेली देणगी होती. आता मात्र जास्त वेगाने पांढरे होण्याचे कारण तो वागण्या-बोलण्यातून जाणवू देत नसला तरी विप्लविची काळजी हेच होतं हे तिला मनोमन ठाऊक होतं.

"आज काय बाप-लेक दोघांनी पुस्तक समोर धरुन दुसरेच काहीतरी विचार करायचे असं ठरवलंय का? तुझी लाडकी लेक अशीच टेबलवर पुस्तक वाचता-वाचता त्यावर डोकं ठेवून कधी निजली तिलाही माहीत नसेल. तिच्या खोलीत दिवा दिसला म्हणून बघायला गेले तर बाईसाहेब तश्याच अवघडून झोपलेल्या! हळूच जागं केलं आणि पलंगावर झोपायला सांगितलं तर चक्क वाद न घालता झोपली!…" वसु बोलता बोलता थांबली कारण तिने पाहिलं तर सुभाषचं अजुनही लक्ष नव्हतं! म्हणजे ती खोलीत आली, कपडे बदलता-बदलता एकीकडे बोलत होती - त्याला काही पत्ताच नव्हता! पलंगावर बसून तिनी सुभाषच्या हातातलं पुस्तक काढलं आणि त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढायला लागली तेव्हा कुठे त्याची तंद्री भंग पावली. "अरे, वसु, आज तुझं लवकर आवरलं!"

"माझं नेहमीच्याच वेळेला आवरलं, पण तू मात्र तुझी झोपायची वेळ उलटून गेली तरी जागा आहेस. अजुन उद्याचा दिवस ऑफिस आहे… अकरा वाजून गेले, अजुन तू जागा?"   

सुभाष काहीच बोलला नाही; तसाच बसून राहिला होता. फक्त वाचताना लावलेला चष्मा तेवढा काढून ठेवला.

"विपूचा विचार करतो आहेस ना? डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतल्यापासून तू असा हरवल्यासारखा झाला आहेस. का काळजी करतोस असं नाही म्हणणार मी, कारण काळजी तर माझ्याही डोक्यात सतत असते. पण अरे, तुला ऑफिसला जायचं असतं. तुझ्या डोक्याला दिवसभर कामाचे नाना व्याप. अशी सारखी काळजी करुन कसं चालेल? मला काही आता सकाळी उठून ऑफिस गाठायचं नाहिये! त्यामुळे आई-बाबांबरोबर गप्पा, कामं यात कसा वेळ जातो कळतही नाही! शिवाय आपलं पिल्लूही मोठं होतंय, त्यामुळे तिच्या मित्र-मैत्रिणी कोण, ती टि.व्ही.वर काय बघते, ऑनलाईन असते तेव्हा काय करते, होमवर्क होतोय ना, जेवण-खाण - एक ना दोन, किती गोष्टी असतात! स्वप्ना तिकडे अमेरिकेत राहून, दोघे नोकरी करुन दोन-दोन मुलं सांभाळते! कसं जमवते कुणास ठाऊक! मला झेपलंच नसतं!"

"त्याला कारण ती तुझ्यासारखी चिंतातूर जंतू नाहिये!"

"चला - बहिणीची बाजू घेण्याच्या निमित्ताने तरी बोललास आणि मुख्य म्हणजे आत्ता मी बोलत असताना चक्क तुझं लक्ष होतं माझ्याकडे!"

"वसु, मला फार काळजी वाटतेय गं विपूची… आज-काल माझ्याशी नीट बोलतच नाही. कधी कधी तर मी पाठीवर, खांद्यावर सहज हात ठेवला तर किंचाळते! मलाच भीति वाटते मग तिच्याजवळ जायची किंवा बोलायची. आपली विपू कुठे हरवली, वसु?" सुभाषने नकळत वसुंधराच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिनी पाहिलं तर शेवटचं वाक्य बोलता-बोलता तो चक्क रडायला लागला होता. तसा पहिल्यापासूनच तो विपूबाबत हळवा होता; कदाचित लग्नाला बरीच वर्षं झाली, मूल होण्याची सगळी आशा सोडलेली असताना अचानक विप्लवि त्यांच्या आयुष्यात आली म्हणून असेल, कदाचित सगळेच वडिल मुलीच्या बाबतीत जास्तच भावूक असतात म्हणून असेल - कारण काहीही असलं तरी गेल्या दोन महिन्यांतल्या विपूच्या वागण्यातल्या बदलामुळे तो भांबावला होता हे तिला रोज दिसतंच होतं, पण आत्ता त्याने जे सांगितलं त्यावरुन परिस्थिती जरा जास्त गंभीर होती हे नक्की.

सुभाषच्या केसांतून हात फिरवता-फिरवता ती कधी त्याला थोपटायला लागली तिलाही कळले नाही. विपूच्या आधी दोघांत काही दोष नसताना मूल होत नाही म्हणून जे नैराश्य दोघांना आणि त्यांच्या प्रेमाला, त्यांच्यातल्या संवादाला ग्रासू पहात होतं तेव्हाची आठवण झाली तिला. मग विप्लवि आली आणि सगळंच एकदम बदललं! सुभाष तर विपूमध्ये इतका गुंतला की त्याला बाबा-मोडमधून बाहेर काढणे जिकिरीचं व्हायचं कधी-कधी! पण वसुंधराला बाप-लेकांतला हा जिव्हाळा, हे इतकं घट्ट नातं फार आवडायचं. अगदी तान्ही असल्यापासून, आई-बाबा ओळखता यायला लागल्यापासूनच, विपूला जरा जरी बरे नसले तरी तिला बाबा हवा असायचा आणि सुभाषही कसे मॅनेज करायचा कुणास ठाऊक, पण त्याने एकदाही 'आजचा दिवस काढून घे ना, वसु, खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी उद्यापासून थांबेन विपूजवळ" असं म्हटलं नाही!

वसुंधराची बॉंडिंग लीव्ह, तिची जमा झालेली सुट्टी, थोडी विदाऊट पे सुट्टी असं सगळं करुन आता कामावर हजर व्हायलाच पाहिजे, विप्लविला डे-केअरमध्ये ठेवायचं या कल्पनेनीच तिला रडायला यायला लागलं. शेवटी बरेच दिवस डोक्यात असलेले बोलूनच टाकावे म्हणून तिने सुभाषजवळ विषय काढला, "सुभाष, आपण परत जाऊया ना! मला इथे नाही विपूला वाढवायचं… आणि खरं सांगू? आपण आत्ता गेलो तरंच परत जाण्यात अर्थ आहे."

"म्हणजे?"

"अरे, सुदैवाने तिला दोन्हीकडचे आजी-आजोबा आहेत अजुन! आपण इथे राहून त्यांना तिचा आणि तिला त्यांचा सहवास कसा आणि किती मिळणार? म्हणूनच मला परत गेल्यावर मुळी नोकरी करायचीच नाही… केली एवढी बास झाली. आता मला आपल्या दोघांच्या आई-बाबांचं बघणं, विपूला वाढवणं - पुन्हा एकदा लहान होऊन तिच्याबरोबर खेळणं, मस्ती करणं, हेच करायचंय. तिचा एकही माईलस्टोन मला मिस् करायचा नाहिये."

"वसु - किती दिवसांनी एवढं हळवं झालेलं बघतोय तुला! काय झालं राणी?"

"अरे, जे सुख आपल्या नशीबात नाही असं आपण गृहीत धरलं होतं ते आता पदरी आल्यावर मला भरभरुन अनुभवायचंय, पुन्हा एकदा आपल्या मुलीबरोबर आपलं बालपण जगायचंय…"

"हं… तू म्हणते आहेस ते सगळं पटतंय मला. फक्त प्रश्न नोकरीचा आहे. आता चाळीशी उलटून गेल्यावर नव्याने सगळं बस्तान बसवायचं, इथलं सगळं मोडून - नाही म्हटलं तरी थोडं कठीण वाटणारंच ना! लग्नाला जेमतेम वर्ष होत नाही तो आपण इथे आलो! आपण जातो खरं भारतात, पण दर खेपेला ओळखीच्या खुणा हळुहळु कमी-कमी झालेल्या दिसतात. आणि आपल्या डोक्यात असलेला आपण सोडतानाचा भारत, तिथली माणसं, दुकानं - इतकंच कशाला वस्तुंचे भावसुद्धा - आता आपल्या कल्पनेच्या पलिकडचं आहे सगळं. जमेल आपल्याला जुळवून घ्यायला नव्यानी?"

"सुभाष, या सगळ्या गोष्टी तर आपण इथे आलो तेव्हाही खऱ्या होत्याच की! सगळं नवीन होतं, शिवाय सांगायलाही कोणी ओळखीचं नव्हतं जवळ…"

"हो, पण आपण तेव्हा पंधरा वर्षांनी तरुण होतो, उराशी काही स्वप्न होतं."

"आताही आपल्या उराशी स्वप्न असणारच आहे की! आपल्या मुलीला आपल्या देशात लहानाचं मोठं करायचं, आपल्या आई-बाबांची म्हातारपणची काठी व्हायचं. एकदा काही तरी ध्येय आपल्यासमोर असलं, आपण का परत जातोय याचा नीट आणि पूर्ण विचार करुन गेलो तर बाकीचे प्रश्नही सुटतीलच."

शेवटी, वसुंधराने सुभाषचं मन वळवलंच. स्वप्ना आणि प्रसादचा इथेच राहण्याचा विचार दिसत होता. त्यामुळे सुभाषला वसुचं म्हणणं पटायला जास्त जड गेलं नाही. सुदैवाने सुभाषची ह्यूस्टन ऑफिसमधली जनरल मॅनेजरची पोस्ट बी.पी.च्या मुंबईच्या ऑफिसमध्येही कायम राहिली, त्यामुळे त्याचा उरला-सुरला विरोधही संपला. सगळं काही इतक्या पटापटा झालं की "आम्ही परत जायचा विचार करतो आहोत" असं स्वप्ना-प्रसादला सांगून आठ-दहा दिवस होत नाहीत तोच सगळं आवरंतही आलं! निघायच्या आधी त्यांना भेटायला तिघेही शिकागोला गेले. सकाळी पोहोचून संध्याकाळी भारतात येणारं विमान गाठायचं असं ठरवून; पण स्वप्नाने मुळी सोडलंच नाही त्यांना. हसत-खेळत दोन दिवस कसे गेले, कळलंही नाही! विमानतळावर पोहोचल्यावर चेक-इन करुन झालं आणि आता मात्र खरंच निरोप घ्यायची वेळ आली. सगळ्यांनाच जड जात होतं. पण इलाज नव्हता.

आठवणींत हरवलेली वसुंधरा एकदम भानावर आली ती बेडरुमच्या दाराशी कोणीतरी रडत असल्याचा भास झाला म्हणून. तिनी सुभाषला हळूच हलवलं तर त्याला केव्हातरी झोप लागली असावी. त्यामुळे हलकेच सुभाषचं डोकं मांडीवरुन खाली ठेवलं, आणि हळूच उठून बेडरुमचं दार उघडलं - तर भिंतीला टेकून विप्लवि हमसाहमशी रडत होती.

नवी पहाट - भाग २

- २ नवा मार्ग -

एक क्षण वसुला कळेचना. पण लगेच स्वतःला सावरुन तिनी वेडरुमचं दार ओढून घेतलं आणि विप्लविजवळ खालीच बसली. “काय झालं, शोन्या? स्वप्नं पडलं का माझ्या बाळाला?" बोलता-बोलता तिनी हळूच विपूला आपल्या कुशीत ओढून घेतलं. तशी विपूही तिला घट्ट बिलगली. वसुनी पाहिलं तर विपू चक्क थरथर कापत होती! वसुच्या तर जीवाचा थारच सुटला तिला असं बघून! विपू जणू तिच्या पोटात शिरायचा प्रयत्न करत होती. कशाने इतकी घाबरली ही? बरं काही बोलायलाही तयार नाही. वसुला इतकं हतबल कधी वाटलं नव्हतं! सुभाषला उठवावं म्हणून तिनी एकदा हळूच विपूला उभे करायचा प्रयत्न केला तर तिनी आणखीच घट्ट धरलं वसुला. "विपू, बाळा, काय झालं तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल मला? स्वप्नं पडलं का? जरा ऊठ ना राजा, आपण बाबांना सांगुया, म्हणजे ते बाहेर गुरख्याला विचारुन येतील कोणी आसपास दिसलं का घराच्या."

ती बोलत होती आणि विपू जोरजोरात मान हलवून नकार देत होती. आणि अचानक किंचाळली, "नको, बाबांना नको सांगू, गुरखा नको."

वसु हादरलीच विपूचं किंचाळणं आणि ती जे म्हणाली ते ऐकून. कसंबसं आपलं मन ताब्यात ठेवून ती म्हणाली, "अरेच्चा! एका मुलीचं बाबाशी भांडण झालंय वाटतं! तरीच बरं का बाबा पण झोपताना रडत होता!" ती हे बोलत होती तेवढ्यात बेडरुमचं दार उघडून सुभाष बाहेर आलाच. तशी विपू आणखी आईच्याजवळ सरकली. "खरंच रागवलंय वाट्टं बाबांवर कोणीतरी! बाबा - आज विपू आईच्या पार्टीत बरं का…" सुभाषनी खुणेनीच तिला काय झालं म्हणून विचारलं. वसुच्या डोक्यात एक कल्पना आली. तिनी फोनची खूण करुन सुभाषला ओठांनीच "स्वप्ना" असं सांगितलं. तशी सुभाष लक्षात येऊन म्हणाला, "बरं बाबा, आज आमच्यावर कोणीतरी रुसलंय तर मी जातो मग झोपायला." असे म्हणून तो पुन्हा बेडरुममध्ये शिरला, आणि दार लावून घेतलं. पण आत्ता पाहिलेला प्रकार पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कसाबसा त्याने स्वप्नाला फोन लावला, तिच्या मोबाईलवरच केला. खरं तर त्याला ड्राईव्ह करत असताना फोन घ्यायला किंवा करायलाही आवडत नसे. त्यामुळे फोन लावायच्या आधी आपसूक त्याची नजर घड्याळाकडे गेली - तर पहाटेचा जेमतेम दीड वाजत होता, म्हणजे स्वप्नाकडे आत्ता दुपारचे दोन वाजले असतील. तो असा ऑफिसच्या वेळात कधीच फोन करत नसे त्यामुळे बहुधा तिच्या लक्षात येईलच काहीतरी गंभीर प्रकार असावा. त्याप्रमाणे दुसऱ्या रिंगला तिने फोन उचलला. "दादा, आत्ता या वेळेला फोन? काय झालं? सगळे ठीक आहात ना? आई-बाबा?"

"हो, आई-बाबा ठीक आहेत, अगदी मजेत आहेत. पण विपू..."

"काय झालं विपूला? दादा, अरे सांग ना!"

"अग, विपू झोपेतून कशामुळे तरी उठली आणि खूपच घाबरली आहे. वसुला इतकं घट्ट धरलंय तिनी आणि…"

"दादा, आणि काय? नीट बोल रे, वसुने सायकिअॅट्रिस्टचं कळवल्यापासून माझा जीव असा टांगणीला लागलाय इकडे! मी काय करु सांग. तिकडे येऊ का थोडे दिवस? वसुला थोडा आधार आणि मदतही. आई-बाबाही चिंतेत असतील ना?"

"हो गं! मी आत्ता फोन अश्यासाठी केला की विपूचा तुझ्यावर जरा जास्तच जीव आहे आणि आत्ता वसु स्वतः खूप घाबरली आहे, त्यामुळे तिच्याच्याने काही विपू शांत होत नाहिये. तेव्हा तिनेच सुचवलं की तुला शक्य झालं तर एक पाच मिनीटं फोन करुन बोलतेस विपूशी? घरच्या नंबरवर कर. आणि हो, आपलं आत्ता काही बोलणं झालंय हे प्लीज तिला कळू देऊ नकोस."

"दादा, करते, लग्गेच करते फोन. आणि हो, विपूला काही कळू देणार नाही, काळजी करु नकोस. पण तू झालास का थोडा शांत?"

"हो, मी आहे थोडा बरा आता. आत्ता तुझ्याशी बोललं आणि खरंच खूप धीर आला! मी असा अचानक फोन केला तुला - तू मीटिंगमध्ये आहेस का, काही महत्त्वाच्या कामात अडकलेली असशील का - कसला विचारच नाही आला डोक्यात!"

"अरे, दादा - असं काय? एकतर मी आत्ता तसं काही महत्त्वाचं काम करत नाहिये. डिसेंबर सुरू आहे. विसरलास? हॉलिडे सीझन… सगळी महत्त्वाची कामं आता पुढच्या वर्षी! आणि तसंही तू इतका काळजीत असताना मी कामात आहे का याचा विचार कसला करतोस? तू ठेव फोन, म्हणजे मी करते. घरच्या फोनवर करते. चांगल्या तीन-चार रिंग वाजू देत आणि मग उचल बाहेर जाऊन. कारण वसुला तर विपू सोडेल फोन घ्यायला असं वाटत नाही."

"ठीक आहे, ठेवतो."

सुभाषनी फोन ठेवला आणि पुन्हा फोन वाजायची वाट पाहू लागला. प्रत्येक क्षण त्याला युगासारखा वाटत होता. शेवटी एकदाची रिंग वाजू लागली. त्याने कान देऊन बाहेर काय चाललंय याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला; काहीतरी बोलणे सुरु होते, वसुचा आवाज येत होता समजावत असल्यासारखा आणि विपूचा जास्त जोरात रडण्याचा. शेवटी तिसरी रिंग होता-होता तो उठला आणि बेडरुमचे दार उघडून बाहेर गेला; "वसु, फोन वाजतोय केव्हाचा! उचलत का नाहियेस? मी नेमका बाथरुममध्ये होतो…"

"अहो, मी उठायचा प्रयत्न करतेय पण ही मला उठू देईल तर शपथ! आणि तुम्ही बेडरुममध्ये का नाही घेतलात फोन? असा अवेळी म्हणजे तुमचाच कामाचा असणार!"

"बघ, मी कसा वेंधळा आहे ते! घाईने बाथरुममधून बाहेर आलो रिंग ऐकून, पण बेडरुममध्येच फोन घेता आला असता हे लक्षातच नाही आलं. थांब जरा, आधी फोन उचलू दे. हॅलो… कोण? स्वप्ना तू? आत्ता यावेळी? का गं? सगळं ठीक आहे ना? नाही यावेळी कधी फोन करत नाहीस ना तू म्हणून विचारलं."
……

"आई-बाबा ना? हो, मजेत आहेत."
……

"नाही, नाही - काही होत नाहिये त्यांना. आणि काय गं! तू काय हा जाब विचारायला आत्ता ऑफिसमधून फोन केलास? काम दिसत नाहिये सध्या! बरोबर, हॉलिडे सीझन ना… करा, चैन करुन घ्या. जानेवारी उजाडला की सगळं उट्टं भरुन काढतील."
……

"काय? माझ्याशी या फालतू गप्पा मारायला फोन नाही केलास? गधडे, मोठ्या भावाशी दोन शब्द बोलणं म्हणजे फालतू गप्पा काय? ठीक आहे, इकडे येशील ना सुट्टीसाठी, तेव्हा बघून घेईन. आत्ता काय आपल्या प्रिय मैत्रिणीशी बोलायला फोन केलात मग आपण?"
……

"नाही? तिच्याशीही नाही? मग काय आता आईला उठवू झोपेतून?"
……

"नको? अग बये - एक तर अपरात्री फोन करुन झोपेतून उठवलंस आणि आता कोडी कसली घालते आहेस? कुणाला देऊ फोन सांग लवकर. मला मरणाची झोप येतेय. उद्या ऑफिस आहे आणि आमच्याकडे हॉलिडे सीझन नाहिये."
……

"कोणाशी? विप्लवि? विपूशी बोलायला आत्ता अपरात्री फोन केलास तू? आणि तिला उठवू आत्ता? बाई गं! पाया पडतो मी तुझ्या! उद्या शाळा आहे, झोपलिये ती केव्हाच. वीकएंडला करतो ना फोन तुला…”.

"बाबा, मला बोलायचंय आत्याशी..."

"पाहिलंस, एकविसावं शतक लागलं तरी पोरं आई-बापांना खोटं पाडायचं काही थांबत नाहीत. बोल बाई तुझ्या भाचीशी!" सुभाष एवढं बोलून थांबला खरा, पण आता रिसिव्हर विपूच्या हातात द्यावा की खाली ठेवावा याने एक क्षण विचारात पडला; तेवढ्यात विपूनेच त्याचा प्रश्न सोडवला. तिनी जवळ-जवळ ओढूनच घेतला त्याच्या हातातून रिसिव्हर. "आत्या! तू आत्ता कसा फोन केलास? अजितदादा आणि नेहा कसे आहेत? आपण शनिवारी स्काईप करुया?"

वसु आणि सुभाष पहातच राहिले! आत्ता मिनीटभरापुर्वी थरथर कापत वसुला चिकटून रडणारी मुलगी हीच का?

"काय! स्नो? या वर्षीचा पहिला स्नो ना? कित्ती मस्त दिसत असेल! ए आत्या, शुटींग कर ना आणि खूऽऽप फोटो काढ आणि अजितदादाला स्नोमॅन करायला सांग ना आणि त्याचेपण फोटो पाठव! कित्ती मज्जा! मला ना आत्ता विमानात बसून तिकडे यावंसं वाटतंय! सॉल्लिड छान वाटतंय पहिला स्नो झाल्यावर तू लग्गेच फोन करुन सांगितलंस ते! आत्या, मला तू ना खूप आवडतेस. कधी येणार तू इकडे? लवकर ये ना! काका कसे आहेत? तुम्हांला सगळ्यांना बिग हग. खरं तर अजून खूप गप्पा मारायच्यात पण उद्या शाळा आहे आणि मला ना खूप झोप येतेय. आईला देऊ? नको? असं कसं? तुम्ही तर फास्ट फ्रेंड्स ना? वॉव! कित्ती मज्जा! तू फक्त माझ्याशी बोलायला फोन केलास? आय लव्ह यू, आत्या! मी जाऊ झोपायला नाहीतर शाळेला उशीर होईल. गुड नाईट, आत्या!"

"बाबा, आत्याकडे पहिल्यांदा स्नो झाला! आई, आत्या आज तुझ्याशीपण बोलायचं नाही म्हणाली. असं कसं? तुम्ही तर केवढ्या फास्ट फ्रेंड्स!"

"अग, पण पहिल्या स्नोचं ऐकून जास्त मजा कुणाला आली? तुला ना? मग? आत्याला माहितिये ते, म्हणून तर तिनी मुद्दाम तुला फोन केला. चला, झोपायचं ना आता? उद्या शाळा आहे माझ्या बबडूची"

मोठ्ठी जांभई देता-देता विपू म्हणाली, "हो, मला जाम झोप येतेय. गुड नाईट, बाबा. गुड नाईट, आई."

"थांब, मी येते तुझ्याबरोबर. आत्या काय म्हणाली ते सांग मला, म्हणजे स्नोमॅनबद्दल बोलता-बोलता मस्त झोप लागेल तुला." असं म्हणून वसु विप्लविला घेऊन तिच्या खोलीत गेली.

सुभाष बेडरूमकडे जायला वळला आणि सहज लक्ष गेलं तर आई-बाबांच्या खोलीतला दिवा लागलेला दिसला त्याला. म्हणून त्याने हळूच टकटक केलं, "आई…"

"ये रे, आत ये, आम्ही जागेच आहोत मगापासून."

सुभाष दार उघडून आत गेला आणि मागे दार परत लावून घेतलं. पाहिलं तर आई आणि बाबा, दोघेही उठून बसले होते. त्यांच्याकडे पाहताक्षणी सुभाषनी ताडलं की ते बराच वेळ जागे असावेत कारण दोघांच्याही चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्टपणे लिहिलेली होती. सुभाषनी थोडक्यात काय झालं ते सांगितलं. त्यानी पाहिलं, बाबा विचारात पडले होते. आई म्हणाली, "स्वप्नाचा फोन कसा आला नेमका?" सुभाषनी सांगितलं की वसुनीच त्याला सुचवलं होतं स्वप्नाला फोन करायला. "बरं झालं बाबा, तिला पटकन सुचलं ते! किती सोन्यासारखी पोर रे! हेवा करावा अशी गुणी पोर. हे अचानक काय झालंय कुणास ठाऊक! माझा तर जीव तुटतो; आत्ता-आत्तापर्यंत आई असून वसुपेक्षा ती तुला चिकटलेली असायची. अचानक काय झालं कुणास ठाऊक! कधीकधी वाटतं जन्मभर तर्कशास्त्र शिकवलं नसतं तर निदान कुणाची दृष्ट लागली असं म्हणून दुसऱ्यावर ढकलून तरी देता आलं असतं!"

शेवटी बाबा म्हणाले, "सुमती, आता जाताहेत ना डॉक्टरांकडे घेऊन तिला! मग आपण आणखी चिंता करुन काय होणार आहे? सुभाष, तू जा बरं झोपायला. उद्या तुला ऑफिस आहे. आणि आता विप्लवि सावरली आहे ना? नको काळजी करूस. तुमची अपॉईंटमेंट उद्याचीच आहे ना? बरं झालं. लवकर उलगडेल सारं, आणि परत पोर होईल हो पुर्वीसारखी. जा, शांतपणे झोप. वसु येईलच विप्लविला झोपवून. तिची बिचारीची झोप मात्र झालेली दिसत नाहिये अजिबात. तू असं कर, तिला सांग उद्या जरा उशीरा उठायला. तसंही तुम्हांला दुपारी डॉक्टरकडे जायचं आहे, मग तू घरून काम करणार आहेस की लवकर येणार आहेस?"

"आधी विचार करत होतो लवकर परत यायचा, पण आता वाटतंय घरूनच काम करेन. फार काही महत्त्वाच्या मीटिंग नाहीत उद्या शुक्रवार असल्यामुळे."

"उत्तम! मग असं करु सुमतीबाई, तुम्ही सकाळचा चहा कराल का उद्याचा दिवस? स्वयंपाकाच्या बाई आल्या की बाकीचे सगळे करुन घ्या त्यांच्याकडून. म्हणजे सुनबाईची जरा झोप होईल. आणि आता तू ही जा रे, अजिबात काळजी करु नकोस. शांतपणे झोप. सगळं व्यवस्थित होईल."

"ठीक आहे. तुम्ही दोघंही झोपा आता. तुमचीही झोपमोड झाली आहे."

"आमची काळजी नको करुस बरं तू! झोपतो आम्हीही. झोपा हो, तुम्ही. सकाळी उठून चहा करणार आहात ना? मग झोपा आता शांतपणे तुम्हीपण."

सुभाष आई-बाबांच्या खोलीतून बाहेर पडला आणि आपल्या बेडरुमकडे वळला तर जिन्यावरुन उतरणारी वसु दिसली त्याला. म्हणजे विपू झोपलेली दिसतेय एकदाची! पण गेल्या दोन महिन्यांत वसु मात्र स्वतःच आजारी असल्यासारखी दिसायला लागली होती. छान मोठ्या आणि तेजस्वी डोळ्यांतलं तेज कुठे हरवलं होतं? त्याऐवजी  डोळ्यांखाली मोठ्ठी काळी वर्तुळं आली होती. दोघे जवळपास एकदमच बेडरूममध्ये शिरले. दार लावल्या-लावल्या त्यानी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनी पाहिलं.

"झोपली एकदाची! काही प्रयत्न न करताच झोपली. आत्या, बर्फ, स्नोमॅन याबद्दल बोलता-बोलता वाक्यही अर्धवट राहिलं इतकी गाढ झोपली. मी पांघरुण घातलं, थोडी रेंगाळले आणि परत मागे वळून दार उघडलं, परत लावलं तरी पत्ताही नाही बाईसाहेबांना! मगाशी मात्र माझा नुसता थरकाप उडाला होता. नशीब, स्वप्ना फोन करु शकली ते!"

"त्यापेक्षा, मला तुझं कौतुक वाटतंय त्या सगळ्या गोंधळातही तुला सुचलं त्याचं. आईही तेच म्हणत होती."

"म्हणजे? तू आई-बाबांना उठवलंस आत्ता? नाही, तू कसा उठवशील? तेच उठले असतील."

"हो, त्यांच्या खोलीतला दिवा दिसला म्हणून मग मी गेलो. त्यांना सांगितलं थोडक्यात. बाबांनी तुझ्यासाठी निरोप दिलाय - म्हणाले की उद्या सकाळी उशीरा उठायला सांग, म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याआधी थोडी विश्रांती तरी होईल."

"अरे, पण त्यांचा चहा, खाणं, तुझा डबा. नाही रे, सकाळी उशीरा उठून हे सगळं धावपळीत करायचं - नको, आपला रोजचा गजर आहे तो राहू दे."

"अग, सकाळी त्यांचा चहा आई करणार आहे उद्या. बाई आल्या की ब्रेकफास्टचं बघतील, आणि मी उद्या घरून काम करतो."

"सुभाष…"

"काय झालं?"

"नाही, काही नाही. सहज मनात आलं, अशी माणसं किती जणांना मिळतात? चल, झोपू! फार दमवलं आज पोरीनी."

इकडे आई-बाबांच्या खोलीत साधारण तसाच संवाद सुरु होता.

"सुमती, झोप आता. सकाळी चहासाठी उठणार आहेस ना? आणि वसु खाली आली त्याअर्थी विप्लवि शांतपणे झोपली असली पाहिजे. तेव्हा आता नको काळजी करूस."

"असं कसं म्हणवतं हो तुम्हांला? माझी तशी तुमचीपण नातच आहे ना ती? काळजी करू नको म्हणे!"

"अग, काळजी मलाही वाटते. पण त्यानी काही साधतं का? त्यापेक्षा तिला सुरक्षित कश्याने वाटेल ते करायचं, ती आनंदी राहील हे बघायचं. बाकी डॉक्टरी उपचार वसु आणि सुभाष करताहेतच ना? आपणही काळजी करत राहिलो तर पोरांनी कसा धीर धरायचा?"

"पटतंय हो तुमचं! पण माझाही आईचाच जीव आहे. त्यामुळे त्या दोघांसाठी जीव तुटतो."

दोघे आडवे झाले खरे, पण झोप काही येईना. तशीही वयानुरुप झोप कमीच झाली होती. पण आजच्या प्रकाराने होती नव्हती ती झोपही उडाली होती.

नवी पहाट - भाग ३

- ३ नवे प्रश्न -

दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळेस वसुंधरा आणि सुभाष डॉ. जोशींच्या क्लिनिकमध्ये हजर झाले. वेटिंग रुममध्ये दोघेही चुळबुळतच बसले होते. दुसरे एखादे डॉक्टर असते तर गोष्ट वेगळी होती, पण सायकिअॅट्रिस्टकडे जायची वेळ येतेय कशाला? त्यामुळे काय, कसं, किती बोलायचं दोघेही मनात विचार करत होते, तेवढ्यात रिसेपशनिस्टनी हाक मारली "Mr. and Mrs. Jog? Dr. Joshi is ready for you."

वसुने नर्व्हस होऊन सुभाषचा हात घट्ट धरला. सुभाषने तिच्या हातावर आपला हात ठेवला. तेवढ्या त्याच्या स्पर्शानेही तिला धीर आल्यासारखं वाटलं! तो उठला आणि तिचा हातात घेतलेला हात धरुन तिलाही उठवलं. "चल, आलोय ना आता इथे… मग पूर्ण विश्वासानी आत जायचं, आपली विपू नक्की पहिल्यासारखी होणार आहे हेच डोक्यात ठेऊन जायचं, बरोबर ना?" तिनी मान हलवली, पण सुभाषचा हात काही सोडायला तयार नव्हती. दोघे डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये शिरले.

आतलं वातावरण पाहून वसुला पहिला धक्का बसला. कुठेतरी इंग्रजी सिनेमात पाहिलेलं, पुस्तकात वाचून डोक्यात तयार झालेलं जे चित्र होतं त्याला ताबडतोब छेद गेला. आत छान प्रसन्न वातावरण होते. मुख्य म्हणजे तो डोक्यात घट्ट बसलेला जवळपास आडवे होता येईल असा सोफा वगैरे अजिबात नव्हता. खिडक्यांवर खरं तर अगदी गडद अंधार होईल असे पडदे होते, पण तरी खोलीत सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पसरल्यासारखे वाटत होते. एका व्हेसमध्ये छान फुलं होती. एकूणच आत शिरताच वसु नकळत सैलावली. सुभाषच्या हाताला घट्ट धरलेला तिचा हात कधी सुटला ते तिलाही कळले नाही. एका गुबगुबीत खुर्चीत डोक्यावरच्या केसांची चांदी झालेले एक गृहस्थ बसले होते - म्हणजे ते मानसोपचारतज्ञ तर सोडाच, पण डॉक्टर असतील असंसुद्धा एरवी वाटलं नसतं. पण त्यांच्या समोर एक फाईल होती, हातात पॅड होतं आणि हल्ली क्वचितच दिसणारं फाऊंटन पेन होतं, त्याअर्थी तेच डॉ. जोशी असावेत. त्यांचं ऑफिस जसं प्रसन्न पण नीटनेटकं होतं, तसेच स्वतः डॉक्टरही दिसत होते. ते पाहून वसुच्या मनात पहिला विचार आला तोच मुळी "आपण अगदी योग्य निर्णय घेतला आणि योग्य डॉक्टरकडे आलोय. विपूला हे नक्की पहिल्यासारखं करतील!"

"मिस्टर आणि मिसेस जोग? बसा, बसा."

"नमस्कार डॉक्टर, मी सुभाष जोग आणि ही माझी पत्नी वसुंधरा. आम्हांला एकुलती एक मुलगी आहे, विप्लवि. तिच्या बाबतीत आम्हांला तुमची मदत हवी आहे."

"जरुर. पण त्याबद्दल बोलायला सुरुवात करण्यापुर्वी मला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा. तुमचं दोघांचं शिक्षण, नोकऱ्या, घरी कोण-कोण असतं, तुम्हांला दोघांना भावंडं? मुख्य म्हणजे तुमचे दोघांचे संबंध कसे आहेत… तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्ही मुलीबद्दल बोलायला आलात आणि मी तुमच्याबद्दल का प्रश्न विचारतो आहे. पण तुमच्या मुलीला - काय नाव म्हणालात तिचं? विप्लवि ना? - काय होतंय हे समजायला ही सगळी माहिती मला मदतच करेल."

"हो, सांगतो ना. मी केमिकल इंजिनियर आहे, बी.पी. मध्ये इथे जनरल मॅनेजर आहे. वसुंधरा आम्ही अमेरिकेत असेपर्यंत - खरे तर विप्लवि आमच्या आयुष्यात येईपर्यंत नोकरी करत होती. ती ही इंजिनियर आहे. नासामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होती. वसु एकुलती एक आहे पण मला एक धाकटी बहिण आहे, स्वप्ना. ती आणि वसु कॉलेजमध्ये असताना एकाच वर्गात होत्या आणि अगदी जवळच्या मैत्रिणीही. त्यामुळे वसुचं घरी येणं-जाणं असायचं. मला तिचा साधा, निगर्वी स्वभाव, तिच्यावर असलेले संस्कार हे सगळं फार आवडलं. स्वप्नामुळे माझीही वसुशी मैत्री झाली आणि घरी माझ्या लग्नाबद्दल बोलणी सुरु झाल्यावर पहिल्यांदा माझ्या मनात वसुंधराच आली. मी आई-बाबांशी मोकळेपणानी बोललो. त्यांनाही वसु, तिचे आई-वडिल माहिती होते. तिच्यात नकार द्यावा असं काहीच नव्हतं, त्यामुळे काहीही अडचण न येता, कोणी विरोध न करता अगदी खेळीमेळीने लग्न झालं आमचं. लग्नानंतर वर्षभरात माझ्या ऑफिसने मला अमेरिकेत पाठवायचं ठरवलं. खरं तर केमिकल इंजिनियरसाठी ही गोष्ट अगदीच विरळा. पण बी.पी. चं मोठं ऑफिस ह्यूस्टनला आहे. खरं तर वसुच्या नोकरीचा विचार करुन मी नकोच म्हणणार होतो, पण वसुनेच मागे लागुन मला ती बदली घ्यायला लावली. अर्थात तोवर आई-बाबा, दोघांचीही नोकरी सुरु होती; स्वप्नाही नोकरी करत होती, त्यामुळे तसे सगळे स्वतंत्र होते. माझी आई कॉलेजमध्ये तर्कशास्त्र शिकवायची, बाबा डॉक्टर होते - म्हणजे, त्यांनी प्रॅक्टीस नाही केली कधी, पण ते टाटामध्ये कॅन्सरवर रीसर्च करायचे. आता वयाप्रमाणे ताण झेपेनासा झाला तेव्हा आम्हीच मागे लागून त्यांना काम बंद करायला लावलं. आईही रिटायर झाली. स्वप्ना अमेरिकेत असते, शिकागोला. आम्ही ह्यूस्टनला असतानाच ती आणि तिचा नवरा प्रसाद, दोघे शिकागोला आले."

"बरं, आता मला विप्लविबद्दल सांगा थोडं."

"वसु, तू सांगतेस? तुला सोपं जाईल आणि आल्यापासून मी एकटाच बोलतोय. चालेल ना डॉक्टर?"

"हो, हो - खरं तर आवडेल. कारण मिसेस जोग बऱ्याच दडपणाखाली दिसताहेत. लेकीच्या काळजीने असेल. पण निदान तिच्या जन्माबद्दल, तिच्या लहानपणाबद्दल बोलताना तरी थोडा ताण हलका होईल त्यांच्या मनावरचा!"

वसुने हळुच एक तीव्र कटाक्ष नवऱ्याकडे टाकला आणि बोलायला सुरुवात केली. "विप्लवि आमची एकुलती एक मुलगी. लग्नाला सात-आठ वर्षं झाली तरी दुर्दैवाने आम्हांला मूल होईना. दोघांचीही पूर्ण तपासणी करुन झाली. कोणातच दोष नाही. तरी ओव्ह्युलेशनसाठी ट्रीटमेंट घेऊन पाहिली, त्यालाही यश येईना. मधल्या काळात मला नासामध्ये नोकरी लागली होती, आम्ही दोघांनीही हो-नाही करता-करता अमेरिकेचं नागरिकत्वही घेतलं होतं. शेवटी IVF ची एक सायकल केली. त्याने दिवस राहिले, पण मला अगदी पूर्ण झोपून रहायला सांगितले होते. सुरुवातीला दोन-तीन महिने आम्ही केलं कसं तरी मॅनेज, पण मग शेवटी आईला बोलवून घेतले. एक दिवस ती नेमकी आंघोळीला गेली होती आणि मी बाथरुमला जायलाच हवं म्हणून उठले. परत येऊन जेमतेम पलंगावर टेकते तो अचानक पोटात कळा यायला लागल्या - इतक्या की वरचा श्वास वर आणि खालचा खाली! सुभाषला फोन करणंही शक्य नव्हतं मला. तेवढ्यात आई आंघोळ झाल्यावर स्वयंपाकाला लागण्यापुर्वी मला काही हवे आहे का बघायला आली तर मी पोट दुखून कळवळतेय आणि पलंगावरुन रक्ताचे ओघळ खाली वहायला लागले होते. आजही ते आठवलं तरी अंगावर काटा येतो…" बोलता बोलता वसु इतक्या वर्षांनीही बोलायची थांबून मूकपणे रडायला लागली. ते पाहून सुभाषनी हळूच तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तो पुढे सांगायला लागला.

"ते सगळं पाहून आईंना तर आधी काय करायचं तेच सुचेना. शेवटी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी 911 ला फोन केला आणि पाठोपाठ मला. मी घरी पोहोचेतोवर वसुला अॅम्ब्युलन्समध्ये चढवायची तयारी करत होते. 911 ला फोन केल्यामुळे तिथल्या पद्धतीप्रमाणे पोलीस, फायर ब्रिगेडचे लोकही आले होते. फायर ब्रिगेडचे लोक निघतच होते. पण पोलिसांनी मला बरेच प्रश्न विचारले - तुमचे दोघांचे संबंध कसे आहेत, तुमच्या बायकोला कसला मानसिक, शारीरिक त्रास नाही ना? होणाऱ्या मुलाच्या बाबतीत तुमच्यात काही विसंवाद आहे का? मी इतका वैतागलो होतो; इथे वसुची अवस्था काय, आत्ता तिला माझी गरज खूप आहे, खरं तर आम्हांला दोघांनाही एकमेकांच्या मानसिक आधाराची खूप गरज होती आणि पोलिस काहीतरी भलतेच प्रश्न विचारत होते! तरी बरं मी घरातही नव्हतो! शेवटी एकदाची त्यांची खात्री पटली असावी बहुधा.

वसु महिनाभर हॉस्पिटलमध्ये होती. आई होत्याच, पण हे कळल्यावर माझेही आई-बाबा आले. त्यामुळे एकट्या आईंवर सगळं पडलं नाही. वसु यायच्याआधी मी आमची बेडरुम खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर नेली होती. सगळ्या घराला रंग लावला, कारपेट बदललं, दोन्ही आयांनी मिळुन घराचे पडदे बदल, बसायची रचना बदल - त्यांना जे सुचेल ते करत राहिल्या. जणू वसु घरी येण्याआधी घरातल्या आधीच्या सगळ्या खुणा पुसुन टाकायच्या होत्या त्यांना. तरी वसु घरी आल्यावर पहिले काही दिवस फारच जड गेले आम्हांला सगळ्यांनाच. पण आश्चर्य म्हणजे सगळ्यांत आधी सावरली वसु! म्हणजे निदान पुर्वीसारखं वागा-बोलायला तरी सुरुवात केलीन् तिनी. त्यामुळे हळुहळु सगळेच नॉर्मल व्हायला लागले, निदान तिच्यासमोर तरी.

एकदा बाबा आणि मी, मागच्या अंगणात झोपाळ्यावर बसून बोलत होतो. संध्याकाळ नुकतीच होऊ लागली होती. पण हवेतली गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. अश्यावेळी बाहेरची आणि मनातली घुसमट कमीच होत नाही कशानी… बाबांनी विचारलं की पुढचा काही विचार केलाय का… मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे काही झालं त्यानंतर या सगळ्यांतून वसुने पुन्हा जावे असे मला अजिबात वाटत नाही. ते म्हणाले, 'अरे, मला कळतंय सगळं. मी गायनॅकॉलॉजिस्ट नसलो तरी डॉक्टर आहेच की! पण फक्त जो काही निर्णय घ्यायचा तो तू एकटा घेऊ नकोस. वसुच्या मनाचाही विचार कर. मुळात बायकांना मुलांची ओढ जास्तच असते आणि त्यासाठी त्या काय-काय सहन करायला तयार होतात याची आपल्याला - पुरुषांना कल्पनाही यायची नाही! पण तुझ्या आईचं आणि माझं मत तुझ्या कानावर घालायचं होतं. वसुच्या जीवापेक्षा आम्हांला नातवंड प्रिय नाही. तेव्हा तिचा जीव धोक्यात घालून काही करु नका. तुम्ही दोघं सुखानी रहावं एवढी एकच आमची इच्छा आहे.'

वसु तोवर सावरली होती. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. "सुभाषनी जेव्हा त्याच्या बाबांचा निरोप मला दिला तेव्हा मला अगदी भरुन आलं! माझी तब्येत सुधारून मी पुन्हा नोकरीला जायला लागल्यावर आई परतली, पण जाताना तिच्या डोळ्यांना काही खळ नव्हता. थोड्याच दिवसांत सुभाषचे आई-बाबाही परतले. आणि काय आश्चर्य! इतके प्रयत्न करुन जे होत नाही ते एका फटक्यात व्हावं तशी काहीही कॉम्प्लिकेशन्स न होता विप्लवि आमच्या आयुष्यात आली! माझी सुट्टी संपून विपूला डे-केअरमध्ये ठेवायचं या कल्पनेनी मात्र माझं अवसान गळलं. कारण आम्ही राहात होतो ते ह्यूस्टन तसं मेक्सिकोच्या खूपच जवळ. साहजिकच शहरात मेक्सिकन वस्ती भरपूर. त्यांतले किती लीगल कोणास ठाऊक. त्यात त्यांच्या गॅंग्ज, ड्रग्ज वगैरेंचा उच्छाद. त्यामुळे भारतात कायमचं परतायचा विचार माझ्या डोक्यात जोर धरु लागला. शिवाय आमचे आई-बाबाही म्हातारे व्हायला लागले होते. इकडे परत आलो असतो की आम्हांला त्यांचं करता आलं असतं, विपूला आजी-आजोबांचा सहवास मिळाला असता आणि मुख्य म्हणजे इतक्या नवलाईने मिळालेलं आईपण मला पुरेपूर अनुभवायचं होतं. विपूचं मोठं होणं आपल्या डोळ्यांसमोर व्हावं अशी फार इच्छा होती. तिकडे अमेरिकेत राहिलो असतो तर सवयीने म्हणा, एक लाईफ-स्टाईल मेंटेन करायची म्हणून म्हणा किंवा विपूला काही कमी पडू नये म्हणून म्हणा - कारणं म्हटली तर सगळी खरीच होती; पण माझी नोकरी सुरुच राहिली असती आणि त्यात माझं आईपण मात्र हरवलं असतं! इथे परत आल्यावर मला नोकरी करायची गरज नव्हती, त्यामुळे माझ्या दृष्टीने सगळा गोष्टी जमेच्याच कॉलममध्ये होत्या. त्यातून विपूचा सगळाच कारभार घाईघाईचा होता! जेमतेम सात-आठ महिन्याची होत नाही तो धडपडत का होईना चालायलाही लागली."

"अर्थात सगळ्या संसारात बायकाच जिंकतात तेच झालं! विपू वर्षाची व्हायच्या आत आम्ही अमेरिका सोडून कायमचे परत आलोही होतो! सुदैवाने माझ्या ऑफिसने माझी मुंबई ऑफिसमध्ये माझ्या तिकडच्याच पदावर बदली केली नाहीतर स्त्री-हट्टापुढे चाळिशीत बेकार म्हणून मला परत यायला लागलं असतं."

"अहो - आपण इथे विपूबद्दल बोलायला आलोय ना? तुम्ही भलतंच काय बोलत बसलात?"

हसत-हसत शेवटी डॉक्टर मध्ये पडले, "वसुंधराताई, काळजी करु नका. घरोघरी मातीच्याच चुली असतात. तुम्हांला वाटत असेल की मी मानसोपचारतज्ञ आहे, पण ते शहाणपण फक्त इथे. घरी गेलो की मी कशातलंही काहीही न कळणारा नवरा असतो! काय सुभाषराव, बरोबर ना?"

वसु गोरीमोरी झाली ही चेष्टा ऐकून. ते पाहून डॉक्टर म्हणाले, "बरं, तुमची सध्यातरी पुरेशी माहिती मिळाली असं वाटतंय. आता तुमच्या लेकीबद्दल सांगा."

लेकीबद्दल सांगा ऐकताक्षणी संभाषणाची सूत्रं सुभाषनी घेतलीच आपल्याकडे! "डॉक्टर, भयंकर गोड मुलगी आहे विप्लवि! हुषार तर आहेच, पण सांगितलेलं सगळं ऐकते. वसुचं बोलणं ऐकून तुम्हाला कल्पना आलीच असेल की तिचा सगळाच कारभार किती शिस्तीचा असेल त्याची, पण विपूची कधीही तक्रार नसते त्याबद्दल. आता तसं म्हटलं तर मी, स्वप्ना, वसु - आम्ही तिघंही आमच्या काळात तसे हुषारातच गणले जायचो. पण निदान मला बाबांच्या आणि स्वप्नाला आईच्या शिस्तीचा भयंकर वैताग यायचा! पण विपू मुळी माझ्याजवळ कधी तक्रार घेऊन आलीच नाही. तिच्या शाळेत आम्ही जातो तेव्हाही फक्त कौतुकच ऐकायला मिळतं." बोलता-बोलता नकळत सुस्कारा सोडत सुभाष म्हणाला, "कुठे हरवली माझी ही विपू? जवळपास दोन महीने झाले असतील तिला माझ्याशी बोलून! एका घरात राहतो आम्ही, पण मला पाहिलं की पळूनच जाते. मी घरी येण्याची वाट पहात बसणारी माझी विपू आता मला पाहिलं की घाबरुन शक्यतो लपून बसते. अगदीच जमलं नाही, तर आईच्या पदराला, हाताला घट्ट धरुन न बोलता, थरथर कापत उभी असते. काल रात्री तर आमच्या दोघांच्या जीवाने थार सोडला होता." असं म्हणून सुभाषने आदल्या रात्री घडलेली घटना सांगितली.

ते ऐकून डॉक्टर थोडे विचारात पडल्यासारखे झाले. ते म्हणाले "तुमच्याकडे विप्लविचा एखादा फोटो आणि लहानपणापासूनचे तिचे रिपोर्टस् आहेत?" सुभाष सगळं घेऊनच आला होता. विप्लविचे लहानपणापासूनचे सगळे क्षण, मूड्स अगदी हौसेने टिपले होते. सुभाष म्हणाला तशी विप्लवि खरंच खूप गोड होती आणि पाहताक्षणी तिच्या चेहऱ्यावरचं बुद्धीमत्तेचं तेज लक्षात येण्यासारखं होतं. डॉक्टरांच्या आणखी एक लक्षात आलं - विप्लवि देखणी नक्कीच होती, पण तिचं देखणेपण वसुच्या गोडव्यापेक्षा किंवा सुभाषच्या रुबाबदारपणापेक्षा वेगळं होतं. अर्थात, त्यावरुन काही निष्कर्ष निघत नाही, पण फक्त जाणवलेली गोष्ट डॉक्टरांनी मनातल्या मनात नोंद करुन ठेवली इतकंच. तिचे रिपोर्टस् पाहिले. सगळे माईलस्टोन्स रेंजमध्ये - खरं तर बरेचसे वेळेच्या आधीच गाठले होते तिने. शिवाय गेल्या आठ वर्षांत तसा काही मोठा आजारही झालेला दिसत नव्हता. एकूण खरंच हेवा करावा अशी मुलगी दिसत होती; पण मग काल रात्रीचा प्रसंग? विचार करता-करता सहज विचारावं तसं ते म्हणाले, "विप्लवि तुम्ही म्हणता तशी खरंच गोड दिसते आहे अगदी आणि हुषारही! शिवाय लहानपणापासूनच प्रगतीचे सगळे ठोकताळे वेळेत - खरं तर बरेचसे वेळेच्या आधीच गाठलेले दिसताहेत. अर्थात, तुमच्या आलंच असेल ते लक्षात."

आल्यापासूनचे दोघांचे बोलणे ऐकून एकूणच दोघेही नुसते सुशिक्षित नाहीत, तर प्रत्येक गोष्ट करताना विचार करुनच करायची इतकं भान हे दोघे दाखवत होते; त्याचा काही भाग जरी सगळ्या पालकांनी हे भान दाखवलं तरी तरुण पीढीचे बरेच प्रश्न आटोक्यात राहतील! वहावत जाणारे आपले विचार काबूत आणत डॉक्टर म्हणाले, "दोन महिन्यांपुर्वी काही घडलं का? घरात? सुभाष, तुमच्या ऑफिसमधलं कोणी घरी किंवा एकूणच घरी कोणी नवीन आलं होतं का? तिनी काही भीतीदायक सिनेमा पाहिला, पुस्तक वाचलं, असं काही? सुभाष आणि वसुंधराताई, गैरसमज करुन घेऊ नका, पण विप्लविसमोर तुमच्यात काही वाद वगैरे?"

वसुंधरा म्हणाली, "डॉक्टर, तुम्ही म्हणता तसं काही झालं नाही, पण दोन महिन्यापुर्वी ध्यानी-मनी नसताना विप्लविची मासिक पाळी सुरु झाली! एवढंच काय ते वेगळं असं झालं. पण तिचं सगळंच लवकर असतं तसं हे ही असेल, म्हणून मी खरं तर जास्त विचार केला नव्हता. फक्त तिच्या डॉकटरांकडून तिची प्रकृती तपासून घेतली. म्हणजे, आजोबा आहेत डॉक्टर, पण तेच म्हणाले की अश्या वेळी मुलीला पुरुषाशी, तेही आजोबांशी बोलणं कदाचित जड जाईल, त्यापेक्षा तू तिच्याच डॉक्टरना दाखव."

"वसुंधराताई, तुम्हाला विप्लविच्या वागण्यातला हा बदल गेले दोन महिने जाणवतोय असं तुम्ही म्हणालात, बरोबर आहे?"

"हो"

"--- आणि तुम्ही मला आत्ताच हे ही सांगितलंत की दोन महिन्यापूर्वीच तिची मासिक पाळी सुरु झाली, बरोबर आहे?"

"होय डॉक्टर."
                    
"या बदलाचा अर्थ लावायला तिची आणखी काही माहिती लागेल. मला सांगा, तिची डिलीव्हरी कशी झाली होती? त्या वेळी काही त्रास झाला होता का तुम्हाला? विशेषतः तुमचा आधीचा अनुभव लक्षात घेता डॉक्टरांनी जे वैद्यकीय काळजी म्हणून उपचार केले असतील, त्याची काही नोंद आहे का तुमच्याकडे ? "

डॉक्टरांचा प्रश्न ऐकून वसुंधराचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. तिनी मदतीसाठी सुभाषकडे पाहिलं. त्यांची आपापसात काहीतरी नेत्रपल्लवी झाली.

"त्या वेळी काहीच घडलं नव्हतं डॉक्टर! एकदम नॉर्मल डिलीव्हरी झाली होती."

"खरं सांगताय हे?" डॉक्टरांचा प्रश्न थेट होता. त्यांचा स्वर सांगत होता, त्यांचा वसुंधराताईंच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

"असं का विचारताय डॉक्टर? अगदी विप्लविच्या जन्माच्या आधीचा प्रसंगही सांगितला तुम्हाला, काहीही न वगळता!"

"बरोबर आहे सुभाष, पण विप्लविचा जन्म ज्या अनुभवानंतर झाला, त्याचे खरे तर केवढे अप्रुपाने वर्णन यायला हवे होते. शिवाय त्या प्रसंगानंतर डॉक्टरांनी केवढीतरी काळजी घेतली असेल. त्याबद्दल तुम्ही दोघे काहीच बोलला नाहीत. अमेरिकेत डिलीव्हरीच्या वेळेस वडिलांना लेबर रुममध्ये जायला मिळतं आणि बहुतेक वडिल जातातही! अगदी बाळाचा जन्मल्याक्षणापासून फोटो काढायची पद्धत आहे ना तिथे? पण तरी मगाशी बोलताना वसुंधराताईंनी 'इतके प्रयत्न करुन जे होत नाही ते एका फटक्यात व्हावं तशी काहीही कॉम्प्लिकेशन्स न होता विप्लवि आमच्या आयुष्यात आली!' अशी एका वाक्यात इतक्या महत्त्वाच्या घटनेची बोळवण केली. तुम्ही जे विप्लविचे फोटो दाखवलेत, त्यात दोन-चार दिवसांची असावी इतक्या लहान विप्लविचे फोटो आहेत, पण जन्माचे नाहीत, इतकंच काय पण वसुंधराताईंचाही गर्भारपणातला एकही फोटो नाही की तुमच्या बोलण्यात त्याबद्दल काही उल्लेख नाही! शिवाय विप्लवि तुमच्यापैकी कोणावरच गेलेली नाही"

नवी पहाट - भाग ४

- ४ नवं स्वप्न -

"डॉक्टर, तुम्ही कोड्यात का बोलताहात? तुम्हांला काय सुचवायचे आहे? विप्लवि आमची मुलगी नाही? तुम्ही तिचा जन्माचा दाखलाही पाहिलात! तिच्यावर आमचीच नावं आहेत ना? केवळ ती व्हायच्या आधीचे माझे फोटो नसले किंवा जन्मानंतरचे तिचे फोटो नसले तर काय झालं? मी तर म्हणेन की जरी मी तिला प्रत्यक्ष जन्म दिला नसला तरी दोन दिवसांची असल्यापासून सांभाळलंय मी तिला. ती आमचीच मुलगी आहे आणि कायम राहील. केवळ जन्म दिला म्हणजेच आई होतं का? सुभाषनी आमचा आधीचा अनुभव सांगितला तुम्हाला. त्यानंतरही मी परत IVF ट्राय करायला तयार होते, पण सुभाषनी स्पष्ट नकार दिला. पहिल्या अनुभवानी तो इतका हादरला होता की पुन्हा त्या सगळ्या दिव्याला सामोरं जायची - मुख्य म्हणजे मला जायला लावायची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्यापेक्षा मूल नसलेलं पण आम्ही एकमेकांबरोबर असलेलं आयुष्य त्याला परवडण्यासारखं होतं." अनावर होऊन बांध फुटल्यासारखी वसु बोलायला लागली आणि रडायला लागली. सुभाषला काही ते सहन होईना. त्याने एका हाताने वसुचे डोळे पुसले, तिला पाणी दिले आणि ती थोडी शांत झाल्यावर तो बोलायला लागला.

"डॉक्टर, वसुंधरा म्हणाली त्यातला शब्दन् शब्द खरा आहे. विप्लवि खरोखरीच ध्यानीमनी नसताना आमच्या आयुष्यात आली. ह्यूस्टनला आमच्या सोसायटीच्या शेजारीच चर्च होतं. खूप जुनं चर्च. वसुला का कोणास ठाऊक तिथे जायला कायमच आवडायचं - शनिवारची दुपारची फेरी तर ठरल्यासारखीच झाली होती! चर्च अगदी साधं होतं. दगडी बांधकाम, त्यामुळे ह्यूस्टनच्या उन्हाळ्यात दुपारी फारच छान वाटायचं. शिवाय खूप जुनं असल्यामुळे त्याच्या खिडक्या खूप सुंदर होत्या, रंगीत काचांचं डिझाईन अश्या जुन्या चर्चमध्ये असतं तसं तिथेही होतं. तसा आमचा दोघांचा कोणत्याच एका धर्मावर - किंवा त्यातल्या पाळल्या जाणाऱ्या रुढी-परंपरा यांवर विश्वास नाही. सुदैवाने त्या चर्चचे फादरही खूप समंजस होते. बरंच जग फिरलेले होते. मुख्य म्हणजे आमच्यावर कधी त्यांनी त्यांचा धर्म किंवा त्याची शिकवण यातलं काही लादायचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांना आपल्या धर्माबद्दल फारच कुतूहल होतं - विशेषतः एकाच धर्मात सगुण आणि निर्गुण भक्ती, एक देव ते तेहेतीस कोटी देव आणि निरीश्वरवादही - या सगळ्या गोष्टी एकाच देशात अनेक सहस्त्रकं, अनेक परकी आक्रमणं यानंतरही टिकून राहतात, हे त्यांना फारच आश्चर्याचं वाटायचं. त्यामुळे ते वसुशी खूप वेळा बोलत बसायचे. कधी मी तिच्याबरोबर असलो तर माझ्याशीही अगदी प्रेमाने आणि आदराने वागायचे. वसुच्या तब्येतीबद्दल कळल्यावर त्यांना फार वाईट वाटलं.

काही महिन्यांनंतरचीच गोष्ट असेल. संध्याकाळी, तसं म्हटलं अवेळच झाली होती - आमचं दार वाजलं. सोसायटीच्या बाहेर गेटहाऊस असल्यामुळे भलतं-सलतं कोणी असण्याची शक्यता नव्हती, पण कोणी येणं अपेक्षितही नव्हतं. त्यामुळे मी दार उघडायच्या आधी शेजारच्या काचेतून पाहिलं तर फादर उभे होते आणि त्यांच्या हातात काहीतरी गाठोडं दिसत होतं. पाऊस नुसता धो-धो कोसळत होता, त्यामुळे मी चटकन दार उघडलं आणि त्यांना आत बोलवलं. माझे आभार मानून ते आत आले आणि म्हणाले, "Mr. Jog, I am so sorry for not calling ahead. पण ध्यानीमनी नसताना मी भलत्याच संकटात सापडलो आहे. काय करावं, कोणाकडे जावं याचा विचार करत असताना अचानक मला तुमची आठवण झाली. पण आत्ता माझं येणं सोयीचं नसलं तर मी नंतर येईन."

"फादर, खरं तर उरलेली संध्याकाळ आता कशी घालवावी याचाच विचार करत होतो आम्ही. तेव्हा तुमच्या येण्यानी आमची काही अडचण होत नाहिये. शिवाय वसुची तब्येत ठीक नव्हती तेव्हा कित्येक दुपार तुम्ही तिला मानसिक आधार दिलाय. त्याबद्दल आम्ही दोघेही तुमचे कायमचे ऋणी आहोत! तुम्हांला तर माहीतच आहे, भारतात मित्राकडे जाताना वेळ ठरवून वगैरे जायची गरज नसते. Oh, I am so sorry, you are dripping from head to toe and you seem to be carrying something precious. You can leave it here. Vasu…"

"आले… Oh, Father! It's so nice to see you. पण आत्ता या भयानक पावसात तुम्ही बाहेर काय करताहात? किती भिजला आहात! So, before we talk, why don't you dry yourself? There are fresh towels in the guest bathroom. I know it is probably not the right thing to say, but since you are only wearing your collar, if it's okay, please change into dry clothes. सुभाषचे कपडे तुम्हांला थोडे मोठे होतील पण निदान सध्यापुरते तरी त्याचे कोरडे कपडे घालाल?"

"You are always so kind, my dear! I absolutely don't mind changing into something dryer."

"सुभाष, त्यांना गेस्ट रुम दाखवशील? मी तुझ्या कपड्यांची एक नवी पेअर घेऊन येते."

"चालेल. फादर, आपण बसलोय तोवर तुमचे कपडे पटकन धुवून टाकू का मशिनमध्ये?"

"सुभाष, तुम्ही हे चांगुलपणाने म्हणताय हे कळतंय मला, but you will have to excuse me. I am bound by my oath to do all my chores. पण माझ्या कपड्यांपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं एक काम करण्यासाठी आलोय मी. And this precious parcel you said I could leave in the living room, well, you will see why I can't…"

हे सगळं बोलणं होईतो त्या पूर्ण गुंडाळलेल्या पार्सलमध्ये हालचाल व्हायला लागली आणि अगदीच बारीक आवाज यायला लागला. जास्त सस्पेन्स न वाढवता फादरनी तिथेच लिव्हींग रुमच्या टेबलवर ते गुंडाळं ठेवलं आणि उघडायला सुरुवात केली. त्यांनी ते उघडता-उघडताच जे काही दिसलं त्यानी आम्ही दोघं अवाक झालो! कारण त्यांनी छातीशी धरुन आणलेल्या त्या गुंडाळ्यात एक नुकतंच जन्माला आलेलं बाळ होतं! पण फादरनी इतक्या पावसात ते आमच्याकडे का आणलं असेल? मी विचार करत असतानाच वसु पटकन पुढे झाली आणि बाळाला उचलून घेतलं. बहुधा अपुऱ्या दिवसांचं असावं कारण रडण्याइतकाही जीव दिसत नव्हता त्याच्यात - जेमतेम कुईकुई आवाज येत होता. तो आवाज ऐकून वसुनी बाळाला आपल्या छातीशी धरलं आणि फादरना विचारलं, "Father, what a pleasant surprise! But she seems to be cold and probably hungry… Do you know if she has any intolerances?"

"निदान दुधाची तरी नाही अॅलर्जी. पण खरं सांगायचं म्हणजे हे माझ्या आत्तापर्यंत डोक्यातच आलं नव्हतं! दोनच दिवसांची असावी कारण काल सकाळी बागेला पाणी घालत होतो तेव्हा चर्चच्या पायरीवर एका गाठोड्यात दिसली. बहुधा रात्रीत कुणीतरी ठेऊन गेलं असावं. I have been feeding her skim milk and she seems to be handling it well."

"Great! So I will take care of this angel while you dry yourself and change and we can talk then. And why don't we sit in the family room instead of here? We have the fireplace on, so it should be a little cozy there. आणि हो सुभाष, मी तुझे कपडे आणून देते म्हटलं खरं, पण तेव्हा मला या गोडुलीबद्दल माहीत नव्हतं. प्लीज, बेडखाली, तुझ्या बाजूला प्लास्टीकच्या कंटेनरमध्ये तुझे सगळे नवे कपडे आहेत; त्यातले फादरना बरे वाटतील ते देशील?" असं म्हणून वसु त्या गाठोड्याला घेऊन किचनमध्ये गेली सुद्धा! मी फादरना गेस्ट रुमकडे घेऊन गेलो. वसु म्हणाली तसे फादरना माझे कपडे थोडे मोठेच होत होते, पण गरम पाण्याने हात-तोंड धुतल्यावर, ओले झालेले कपडे काढून अंग कोरडे करुन दुसरे कपडे घातल्यावर त्यांना बरीच हुषारी आली होती. आम्ही खाली येता-येता लँडिंगवरच फादर अचानक थांबले; मी पाहिलं तर त्यांच्या डोळ्यांना धारा लागलेल्या. मी काही बोलणार तोच त्यांनी तोंडावर बोट ठेवून मला गप्प केलं आणि हळूच खाली यायला सांगितलं आणि फॅमिली रुमकडे बोट केलं. जे दृश्य पाहिलं ते पाहून मी ही अवाक झालो!

सोफ्यावर चक्क मांडी घालून वसु बसली होती आणि बोंडल्यानी हळुहळु बाळाला दूध पाजत होती. वसु जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या आईने आठवणीने सगळी बाळलेणी आणली होती. पण नंतर सगळंच उलटं-पालटं झालं आणि जाताना कोणाचीच मनःस्थिती नव्हती ते बाहेर काढायची. वसु बाळाला दूध पाजताना एकीकडे काहीतरी बोलतही होती! आईपणाचं इतकं सुंदर चित्र मी कधी पाहिलंच नव्हतं! इतकं की पुढे जाऊन ते चित्र विस्कटायलाही मला नको वाटत होतं! न राहवून मी खिशातून माझा फोन काढला आणि पटकन वसुचा फोटो काढला. तोच विप्लविचा पहिला फोटो. कितीही मनात नसलं तरी लँडिंगवर किती वेळ उभे राहणार होतो आम्ही? शेवटी आम्ही खोलीत आलो. वसुला आधी पत्ताच नव्हता, जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा मात्र तिची धांदल उडाली, म्हणजे बोंडलं खाली ठेवायचं की बाळाला सोफ्यावर ठेवायचं याच गोंधळात पडली होती. शेवटी फादरच म्हणाले, "Mrs. Jog, please, don't let us disturb you. What you are doing is so precious and sweet!" वसुंधराने मग मलाच सांगितले फादरसाठी कॉफी करायला. फादरना बहुतेक अंदाज आला असावा, निदान कॉफी हा शब्द तरी नक्कीच कळला असावा. त्यामुळे ते म्हणाले, "प्लीज, गैरसमज करुन घेऊ नका, पण वय वाढतंय तशी आधीच झोप कमी व्हयला लागली आहे आणि आत्ता कॉफी घेतली तर मग अजिबातच झोप लागणार नाही. Mr. Jog, if it's not too much trouble, do you think you can manage to make your Indian tea? या अश्या पावसाळी रात्री फार छान वाटतो तुमचा चहा! When I used to visit India in my younger days, that was one of the main attractions for me."

तेव्हा तेवढी एक गोष्टच मला नीट येत होती. हल्ली तर त्याचीही सवय राहिलेली नाही! त्यामुळे मी सगळ्यांसाठीच चहा करायला घेतला. पावसाळी थंडी होती म्हणून छानपैकी आलं घालुन केलेला चहा, थोडी बिस्कीटं असं घेऊन मी बाहेर गेलो. तोवर बाळाचे दूध पिऊन झाले होते आणि वसु तिला खांद्यावर घेऊन डोळे मिटून काहीतरी गुणगुणत होती. रिक्लायनरमध्ये बसल्या बसल्या बहुधा फादरचाही डोळा लागला असावा. शेवटी माझी चाहूल लागताच वसुचीही तंद्री भंगली आणि फादरही नीट उठून बसले. "Mrs. Jog, when I decided to bring the baby here, I just had a thought in my mind, but now I am quite certain that is the best thought I have had in my entire life." मी चहाचे कप सगळ्यांच्या हातात देत असताना वसुकडे प्रश्नार्थक नजरेनी पाहिलं, पण तिलाही काही पत्ता दिसला नाही. तेव्हा मी फादरना विचारलं, "Father, is there something we can do? बाळाची व्यवस्था लागेपर्यंत वसु आणि मी बाळाची काळजी घेऊ शकतो तुमची हरकत नसेल तर. I am sure you will need to inform Social Services and then they will try to find the parents or a foster home. But it might take a while."

"Well, Mr. Jog, there was a small note tucked under the baby's arm written in broken English that just said that the mother couldn't take care of the baby and hence she was leaving it in the care of the Lord. काल आणि आज जवळपास पूर्ण दिवस मी ह्या बाळाचाच विचार करतोय. मला योग्य मार्ग दाखवावा म्हणून करुणा भाकतोय. यातून काय मार्ग काढावा विचार करुन मेंदू शिणला. पण का कोणास ठाऊक दर वेळेस बाळाला पाहिलं की मला तुम्हां दोघांची आठवण येत होती. शेवटी ठरवलं की बाळाला घेऊन इकडे यावं आणि तुमच्याशी बोलावं. If you could take the baby in, I think that would be wonderful for everyone!"

"फादर, हा एवढा मोठा निर्णय आम्ही असा आत्ताच नाही घेऊ शकणार. तुम्ही समजू शकाल, आम्हीच मुळात या गोष्टीवर विचार केलेला नाही; शिवाय आम्ही जरी बाळाची काळजी घ्यायचा निर्णय घेतला तरी आम्हांला कायदेशीररित्या दत्तक घ्यायला आवडेल. बाळ तर ख्रिश्चन दिसतंय. या बाबतीत नुसता धर्मच नाही तर राजकारणही अडचणीचं ठरु शकतं."

"हो, तुम्ही म्हणालात ते सगळं दुर्दैवाने खरं आहे. पण निदान कागदोपत्री तरी दत्तक घ्यायला काही अडचण येऊ नये कारण तुम्हीही अमेरिकन नागरीक आहात. बाकी चर्च, इथलं राजकारण या बाबतीत मी काही मार्ग काढू शकेन. पण एवढा मोठा निर्णय घ्यायला तुम्हांला वेळ हवा, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमच्या निर्णयाची मी वाट पाहीन, तोवर हे बाळ देवाचं समजून मी जपेन." एवढं बोलून फादर जाण्यासाठी उठले आणि बाळाला घ्यायला त्यांनी वसुंधरापुढे हात केले, तर ती बाळाला घेऊन चक्क मागे सरकली. शेवटी कशीबशी तिची समजूत घालून तिला बाळाला फादरकडे द्यायला सांगितले. पण तिने बाळाला देताना इतके काकुळतीने माझ्याकडे पाहिले की माझ्या मनात कालवाकालव झाली. मला वाटतं तिचा निर्णय केव्हाच झालेला होता. फादर बाळाला घेऊन निघाले तरी पाऊस पडतच होता, तेव्हा मी गाडी बाहेर काढली आणि फादरना आणि बाळाला चर्चमध्ये सोडून आलो. घरी परत आलो तर वसु बेडरुममध्ये येरझाऱ्या घालत होती. खूप अस्वस्थ दिसत होती. मी पोहोचल्याक्षणी तिनी लगेच बाळाचा विषय काढला. मी तिला समजावायचा खूप प्रयत्न केला. तिला एवढेही सांगितले की एका ख्रिश्चन बाळाला हिंदू घरात दत्तक देताना कायद्याच्या नाही तरी ख्रिश्चन लॉबीच्या बऱ्याच कटकटी होऊ शकतात. पण काही तासांपुर्वीपर्यंत बाळाचा विषय आपल्यापुरता संपला असे समजणारी वसु तास-दीड तासात पार बदलून गेली होती! खरं सांगायचं तर वसुच का, मी ही बदललो होतो. वसुला त्या बाळाला घेऊन बसलेलं चित्र माझ्या डोळ्यांसमोरुन काही केल्या हलत नव्हतं. खरं म्हणजे मी त्या बाळाला घेतलंही नव्हतं, पण तरी माझंही मन मला सांगत होतं की तुमच्या आयुष्यातली कमतरता पूर्ण करण्याची ही सुवर्णसंधी सोडू नको.

पुढचं सगळं अपेक्षेपेक्षा फारच भराभर झालं! घरी फोन करायच्या आधी आम्ही स्वप्नाशी बोललो. ती आणि प्रसाद दोघांचंही एकच मत - वाट कशाची बघताय? तरी दोन दिवस आम्ही दोघांनी सुट्टी घेतली आणि घरी बसून शक्य तेवढा त्रयस्थपणे विचार केला. पण एक धर्माचा प्रश्न सोडला तर आमच्या बाजूने तरी काहीच प्रश्न नव्हता. मग दोघांच्याही घरी बोललो. ते तर चौघे इतके खूष झाले! सुदैवाने आमचं अमेरिकन नागरीकत्व आणि गेली कितीतरी वर्षं एकाच शहरात राहणं, एकाच ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर आणि चांगल्या पगाराची नोकरी या सगळ्या गोष्टी उपयोगाला आल्या. बाळ दत्तक घ्यायच्या कायदेशीर बाबी पूर्ण होत आल्या. आम्ही फादरशी बोललो. त्यांना विचारलं की बाळाला ख्रिश्चन म्हणूनच वाढवलं पाहिजे अशी त्यांची अट / अपेक्षा होती का. पण फादरनी तर आम्हांला मोठाच आश्चर्याचा धक्का दिला! ते म्हणाले की बाळाच्या आईने बाळाला देवाच्या चरणी सोडलं होतं आणि ते बाळाला घेऊन आले तेव्हा वसु ज्या प्रेमाने बाळाला घेऊन बसली होती ते चित्र आणि मेरीने बाल-जिझसला घेतेलेले चित्र यात फरक काय याचा त्या दिवसापासून आजतागायत त्यांना निर्णय घेता आलेला नाही! कोणाचं मूल, मी का घेऊन आलो याचा काहीही विचार न करता वसु त्या क्षणापासूनच त्या बाळाची आई होती. अश्या नात्याला हिंदु / ख्रिश्चन अशी लेबलं लावायची तरी कशी? शिवाय वसुशी इतक्या चर्चा त्यांच्या झाल्या आहेत की बाळाला हिंदू म्हणून वाढवलं तरी काही हरकत नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि गावातील इतर ख्रिश्चन लोकांना काय सांगायचं त्याबद्दल ते बघून घेतील. अश्या तऱ्हेने विप्लवि आमच्या जीवनात आली. तिचं नाव काय ठेवायचं याचा आम्ही विचार करत होतो तेव्हा एका कोषात वसुला 'विप्लावणे म्हणजे प्रगट होणे' अश्या अर्थाचं क्रियापद मिळालं. ध्यानीमनी नसताना अचानक आमच्या आयुष्यात आलेल्या बाळासाठी मग तेच आम्हांला आवडलं. तिचं बारसं मोठं दणक्यात साजरं केलं. आम्ही कायदेशीररित्या दत्तक घेतल्यामुळे विपू आमची मुलगी असल्याचा आमच्या नावाचा जन्मदाखलाही आम्हाला मिळाला. तर अशी सगळी हकीकत आहे. आम्ही विपूला घेऊन कायमचे इथे परत आलो कारण विपूला आपल्या देशात, आपल्या माणसांत वाढवायचं होतं वसुंधराला. सांगा आता, काय चुकलं आम्ही म्हणालो विपू आमचीच मुलगी आहे असं तर?"

नवी पहाट - भाग ५

- ५ नवी आशा -

"सुभाष, सॉरी, मगाशी मी जरा जास्तच कडक शव्दांत बोललो. But believe me, तुम्हांला दोघांना दुखवायचा हेतू नव्हता. तर विप्लविच्या वागण्यात जो बदल गेल्या दोन महिन्यांत झालाय त्याची आणखी काही तर्कसंगती लागते का मला बघायचं होतं. विप्लवि आता नऊ वर्षांची होईल ना? म्हणजे तिच्या वयाच्या मानाने तिची पाळी खूपच लवकर आली. साधारणपणे आईची पाळी ज्या वयात सुरु होते त्याच्या जवळपास मुलीचीही सुरु होते. म्हणून मी जरा खोदून विचारत होतो. आता मला थोडा अंदाज यायला लागलाय. मला एक सांगा, स्त्री-पुरुष संबंधांबद्दल विप्लविला काही माहिती?"

"तिची मासिक पाळी इतक्या लहान वयात सुरु होईल हे मलाही थोडं अनपेक्षित होतं. त्यामुळे दुर्दैवाने त्याआधी तिला याबद्दल मी काहीच बोलले नव्हते. त्यामुळे पिरियड्स सुरु झाले तेव्हा ती फारच घाबरली. अचानक रक्त पाहून ती तर रडायलाच लागली! नशीब तो शनिवार होता, त्यामुळे शाळेला सुट्टी होती. ती रडायला लागल्यावर अर्थातच बाबांकडे गेली! डॉक्टर, आत्ता-आत्तापर्यंत ही मुलगी काही ठेच वगैरे लागली तरी तिच्या तोंडून 'आई गं' च्या ऐवजी 'बाबा' यायचं! पण तिनी जेव्हा रक्त येतंय वगैरे सांगायला सुरुवात केली तेव्हा ह्यांच्या लक्षात आलं की आत्ता तिला गरज 'बाबां'पेक्षा 'आई'चीच आहे. त्यांनी कसंबसं तिला समजावलं आणि मलाही तिला काय होतंय ते सांगितलं. माझ्या पोटात तर मोठ्ठा गोळा आला. इतक्या लहान वयात हे मासिक उपचार तिच्या मागे लागले - कसं जपू मी माझं कोवळं पिल्लू आता?

पण प्रश्न माझ्या भीतीचा नव्हता - आधी तिला जवळ घेऊन तिला मासिक पाळी, त्या काळात पाळायची स्वच्छता हे सगळं सांगायचं होतं; मुख्य म्हणजे तिला काहीही 'झालेलं' नाही हा धीर तिला द्यायचा होता. ते सगळं केलं. तिनी असंख्य प्रश्न विचारले. माझ्या परीने मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी तिच्या शाळेत जाते मधून मधून तेव्हा चौकशी करते, पण तिच्या शाळेत याबद्दलची माहिती मुलं-मुली पाचवीत गेली की देतात. त्यामुळे मीच तिला पाळीचं मुख्य कारण, वगैरेबद्दल सांगितलं. आत्तापर्यंत तिला फक्त private parts, good touch, bad touch, परक्या पुरुषांना आपल्याला स्पर्श करु द्यायचा नाही, वगैरे ठराविक गोष्टी तेवढ्या शाळेत शिकवल्या होत्या. फक्त मी आणि आजीने तिला पुरुष म्हणजे तिचे बाबा, दोन्ही आजोबा, प्रसादकाका, अजितदादा आणि आमचे ड्रायव्हर अशोककाका हे सोडून, एवढं शिकवलं होतं. आमच्या घरातल्या पुरुषांबद्दल तेवढा विश्वास आहे आम्हांला. अशोककाका तर सुभाष आणि स्वप्ना लहान होते तेव्हापासून आमच्याकडे आहेत. घरातलं कोणीच त्यांना परक्यासारखं वागवत नाही आणि त्यांचाही विपूवर भारी जीव आहे. आणि सुभाषसाठी विपू आणि विपूसाठी बाबा म्हणजे अजिबात वेगळी न करता येणारी जोडगोळी आहे… होती." शेवटचं 'होती' म्हणताना वसुचे डोळे पुन्हा भरुन आले.

"बरं मला सांगा, तिची मासिक पाळी जेव्हा सुरु झाली, तेव्हा तुम्ही तिच्या शाळेत कळवलं असेल ना?"

"हो, अर्थातच! कारण अचानक शाळेत असताना पिरियड्स सुरु झाले तर ती गोंधळून जाऊ नये म्हणून तिच्या शिक्षकांच्या कानावर घालणं गरजेचं होतं. शिवाय खेळाच्या तासाला तिने जर खेळायचे नाही सांगितले तर त्यांना कारण माहीत असलेले बरे."

"हं… मला वाटतं मला एकदा विप्लविला भेटता आलं तर फार बरं होईल."

"नाही, डॉक्टर, ते तर अजिबात शक्य नाही होणार! गैरसमज करुन घेऊ नका, पण तिला इथे आणलं तर तुम्हांला पाहून तिला परत panic attack येईल."

"थांब, वसु, मला एक कल्पना सुचतेय. डॉक्टर, मी जरा विचित्र सुचवतोय, पण तुम्ही आमच्या घरी..."

"हो, जरूर" सुभाषचं वाक्य पूर्ण व्यायच्या आतच डॉक्टर म्हणाले. "मला वसुंधराताईंचं पटतंय. तिला इथे आणून उत्तेजित करण्याने काहीच साधणार नाही. त्यापेक्षा घरच्या, तिच्या विश्वासाच्या वातावरणात तिला भेटणं जास्त योग्य होईल. या शनिवारी किंवा रविवारीच आलं तर चालेल?"

"हो, हो… अगदी कधीही चालेल!"

"असं करु, मग मी उद्याच दुपारी चारच्या सुमारास येतो. आणखी एक, मी येणार आहे आणि खरा कोण आहे याची तिला अजिबात कल्पना द्यायची नाही. परक्या पुरुषाला पाहिल्यावर, भेटताना ती कशी रिअॅक्ट होते ते पाहायचंय मला."

"पण हे कसं जमवणार, डॉक्टर?"

"सुभाष, डॉक्टर - असं करता येईल का? तुम्ही आमच्या बाबांपेक्षा लहान असाल बहुधा, पण तिच्या ते एवढं लक्षात येईल असं नाही, कारण तुमच्याही केसांची तिच्या आजोबांसारखीच चांदी झाली आहे."

"आता इतके वर्षं मानसोपचारतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करुन मुळात डोक्यावर केस आहेत हेच आश्चर्य आहे असं माझी बायको म्हणते… सॉरी, तुम्ही काहीतरी सुचवत होतात. उगाच काहीतरी विनोद करत बसलो मी…"

"माझ्या मनात आलं, की तुम्ही बाबांचे मित्र म्हणून घरी आलात तर? म्हणजे तुम्ही घरी कसे येणार हा प्रश्नही राहणार नाही आणि तुम्हांला विपूला घरच्या वातावरणात पाहता येईल."

"उत्तम कल्पना आहे. फक्त एक करा, आई-बाबांना कल्पना देऊन ठेवा - सॉरी, वहिनी आणि श्रीरंगना कल्पना देऊन ठेवा… मला आत्तापासून डोक्यात ठेवायला पाहिजे!"

"डॉक्टर, मग तुम्हाला आम्हांलाही नावानेच हाक मारावी लागेल हे ही डोक्यात ठेवा बरं! मी सांगतो बाबांना. मग उद्या दुपारी चार वाजता येताय ना, काका? कसंही करुन माझ्या विपूला बरं करा हो!" बोलता-बोलता पुन्हा सुभाषचा आवाज भरुन आला!

वातावरण पुन्हा तंग व्हायला लागलं होतं. निघताना दोघे मनावर ताण घेऊन जायला नकोत म्हणून डॉक्टर म्हणाले "अरे, हो, माझी फी?"

"जाताना बाहेर रिसेपशनिस्टकडे देऊ ना?"

"वा, असं कसं? काम मी करणार आणि फी रिसेपशनिस्टला?"

सुभाष आता मात्र गोंधळला… तो आपला सवयीने जाताना रिसेपशनिस्टकडे फी देणार होता. स्पेशालिस्ट स्वतः कधीच पैशाचा व्यवहार करत बसत नाहीत हे एव्हाना त्याला माहीत झालं होतं. अमेरिकेत असताना प्रश्नच नसायचा - सगळा कारभार इन्शुरन्समार्फत असायचा.

वसुच्या एकदम काय मनात आलं, तिने पट्कन पुढे होऊन डॉक्टरांना नमस्कार केला.

लगेच डॉक्टर म्हणाले, "चला सुनबाईला तरी चांगलं वळण आहे हो! पण ही तर निम्मीच फी झाली! निम्मीही नाही खरं तर… पहिल्यांदा भेटताय, जोडीने नको करायला नमस्कार म्हाताऱ्याला?"

तेव्हा कुठे सुभाषच्या लक्षात आलं डॉक्टर काय म्हणत होते ते! तोही पुढे झाला आणि नमस्कारासाठी वाकला. वसुने पुन्हा एकदा त्याच्याबरोबर नमस्कार केला.

"आता कसं! आत्तापर्यंत केलात तसाच सुखाने संसार करा! अशी एकमेकांची साथ देणारी जोडपी तुमच्याही पीढीत कमीच दिसतात हल्ली… माझ्या पेशंट्सवरुन सांगतो ना! तेव्हा तुमच्यातलं हे विश्वासाचं, मैत्रीचं, प्रेमाचं नातं असंच टिकून राहू दे! राहता राहिला प्रश्न विप्लविचा - तो आता तुम्ही माझ्यावर सोडून मोकळे व्हा कसे! उद्या येतोच आहे मी…"

तिथून दोघे बाहेर पडले तेव्हा दोघांनाही विश्वास वाटत होता की आपण योग्य निर्णय घेतला. सुदैवाने बाबांनी माहिती काढून डॉक्टरही अगदी छान सुचवले होते. आता घरी जाऊन आई-बाबांना कधी एकदा हे सांगतो असं झालं होतं त्यांना. प्रश्न होता तो फक्त विप्लविचा. घरी जाऊन पाहतात तो आई-बाबा बाहेरच्या खोलीत सोफ्यावर वाटच पहात होते. विपूही होती पण तिला टॉम अँड जेरी लावून दिलं होतं, त्यामुळे ती त्यात गुंगली होती. विपू तिथे आहे म्हटल्यावर काही सांगणं शक्य नव्हतं, पण आश्चर्य म्हणजे आज-काल बाबांच्या वाऱ्यालाही उभी न राहणारी विपू बाबांना पाहून चक्क उठली आणि सुभाषला पुर्वीसारखीच घट्ट मिठी मारुन म्हणाली, "बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आणि आईला घेऊन गेलात फक्त… तुमच्या विपूला नाही नेलंत ना? मी रागावलेय आता तुमच्यावर!"

"अरे, पण आम्ही निघालो तेव्हा तुला हाक मारली की! असं कसं मी बाहेर जाईन माझ्या विपूला न नेता?"

"खरंच? खरंच, आई?"

"अग, पिल्लू, बाबा उगाच काहीतरी सांगतात का कधी तुला? तुला हाक मारली तरी तू तुझ्या खोलीच्या बाहेरही आली नाहीस म्हणून आजीने येऊन पाहिलं तर तू अभ्यास करत होतीस. वीकएंडचा सगळा होमवर्क पूर्ण करुन टाकला वाटतं? आणि तुझं जिग-सॉ कधी पूर्ण होणार? तुला सांगत होते दोन हजार पिसेस् असलेलं नको घेऊ करायला, वेळ लागला की कंटाळून जाशील… त्यापेक्षा हजार…"

"आई, मला हजार पिसेस् च्या जिग-सॉ चा कंटाळा आलाय! मजाच येत नाही त्यात… केव्हाच पूर्ण होतात. पण बरी आठवण करुन दिलीस, मी ते पूर्ण करते. बाबा, पण मला उद्या किंवा रविवारी बाहेर न्यायचं, प्रॉमिस?"

"नक्की! एकदम पिंकी प्रॉमिस!"

विपूला एकेक पायरी गाळत वर पोचलीसुद्धा आणि गेली आपल्या खोलीत जिग-सॉ पूर्ण करायला. ते करत असताना ती इतकी एकाग्र व्हायची की आजूबाजूला काय चाललंय, तिला अजिबात पत्ता नसायचा. फक्त तिला तिच्या खोलीचं दार बंद लागायचं.

इकडे सुभाष या सगळ्या ताणामुळे जागच्या जागी कोसळायच्या बेतात होता! तोच वसुने सावरलं त्याला, बाबाही उठून आले. दोघांनी मिळून त्याला सोफ्यावर बसवलं. तोवर आई दोघांसाठी पाणी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, "वसु, तू बैस इथेच. आत्ताच येते आहेस. मी चहाचं आधण ठेवलंय, आलेच चहा घेऊन सगळ्यांसाठी."

पाणी पिऊन सुभाष थोडा सावरला होता. "वसु, आपण कशाकरता गेलो होतो डॉक्टरांकडे? ही तर आपली नेहमीची विपू होती…"

"सुभाष, विप्लवि तिचा गृहपाठ करुन आली आणि तुम्ही दोघेही घरात नाही म्हटल्यावर परत तिचा मूड गेला होता. पण काल रात्रीसारखा प्रसंग पुन्हा नको, म्हणून हिने पट्कन टॉम अँड जेरी लावून दिलं तिला आणि हॉट चॉकलेट करुन दिलं. हळुहळु ती शांत व्हायला लागली आणि थोड्याच वेळात टॉम आणि जेरीच्या खेळात गुंगुन गेली. बहुधा त्यामुळेच तुम्ही परत आलात तोवर मधलं काहीच डोक्यात नसावं तिच्या आणि म्हणून ती परत तुझी विपू झाली. पण हे असंच टिकेल अशी वेडी आशा मात्र करु नकोस. तुम्ही गेलात तेच बरोबर होतं. थांब, ही आली चहा घेऊन की मग एकदमच सांगा दोघांना."

"बाबा, मी तोवर पट्कन साडी बदलून, हात-पाय धुऊन येऊ?" असं म्हणून वसु खरोखरीच पट्कन साडी बदलून, हाय-पाय धुऊन आणि तोंडावर गार पाण्याचे शिपकारे मारुन आली. आल्यावरचं विपूचं वागणं पाहून तीही चक्रावली होती. त्यामुळे तोंडावर गार पाणी मारल्यावर जरा जागं झाल्यासारखं वाटलं तिला! बाहेर जाताना नेसलेल्या साडीची घडी घालून ती बाहेर आली तोवर आई येतंच होत्या चहा आणि चिवडा घेऊन.

सुभाष आणि वसुनी डॉक्टरांकडे झालेलं सगळं बोलणं आई-बाबांना सांगितलं. विप्लविच्या जन्माचं रहस्यही डॉक्टरांना सांगावं लागलं कळल्यावर त्या सगळ्या प्रकरणाचीच आठवण येऊन आईँच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या उठल्या आणि वसुच्या शेजारी जाऊन तिच्या पाठीवरुन मायेनी हात फिरवू लागल्या. "वसु, हे सगळं परत उगाळायला लागलं नसतं तर बरं झालं असतं गं! सुभाष, तुला तरी कळायला नको, वसुसमोर सगळं परत सांगितलंस ते? बिचारी मोठ्या मुश्किलीनी सावरली होती त्यातनं. त्यात नेमका गेले दोन महिने विप्लविचा त्रास डोक्याला. तू निदान ऑफिसमध्ये जातोस तेवढी तरी सुटका मिळते तिला. पण हिला आहे का काही सुटका? आईपण मोठं कठीण असतं बाबा… तुम्हां पुरुषांना नाही कळायचं ते." आईंनी डोळ्याला पदर लावला.

"अग, आई, मला तरी काय कल्पना डॉक्टर इतक्या मागे जाऊन सगळी चौकशी करतील?"

"बरं सुभाष, डॉक्टर उद्याच घरी येणार आहेत त्याबद्दल विचार करा जरा…"

"बाबा, सुदैवाने डॉक्टरांना तुमची कीर्ति चांगली माहिती आहे. त्यामुळे तसा बोलायला प्रश्न पडू नये. आमचं बोलणं झालंय की त्यांनी तुम्हांला दोघांना डॉ. जोग आणि मिसेस जोग न म्हणता श्रीरंग आणि वहिनी म्हणायचं आणि मला आणि वसुलाही नावानेच हाक मारायची."

"मला काय वाटतं," वसु बोलू लागली, "मी विपूला घेऊन ते यायच्या आधी बाहेर जाईन आणि ते आले की थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. म्हणजे डॉक्टरांना बाबांना काही डॉक्टरी प्रश्न विचारायचे असले तर ते ही होऊन जाईल आणि आम्ही बाहेरुन घरी आलो की अचानक घरात कधी न पाहिलेला पुरुष पाहून विपू कशी रिअॅक्ट करते ते ही डॉक्टरांना प्रत्यक्ष पाहता येईल. कशी वाटते कल्पना?"

"वसु, तुझी कल्पना उत्तम आहे! मला वाटतं तुम्ही इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता मानसोपचारतज्ञाची मदत जास्त वेळ वाया न घालवता लगेच घेता आहात, हे फार बरं झालं. विपूचं लहान वय बघता जितक्या लवकर उपचार होतील तितक्या लवकर ती या सगळ्यांतून बाहेरही पडेल आणि मुख्य म्हणजे तिच्या मनावर याचा कायमचा ठसा उमटू नये म्हणून आपण काळजी कशी घ्यायची ते ही डॉ. जोश्यांना विचारु. बरं, उद्याचं कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे ना? आणि सुमती, मुख्य म्हणजे तू अजिबात दिवसभर काही दडपण घेऊन वावरायचं नाही. ते दुपारी चार वाजता येणार आहेत, तेव्हा तोपर्यंतचा दिवस नेहमीप्रमाणेच चालू दे सगळं. वसु, तू केव्हा बाहेर पडणार आहेस?"

"वसु, मी काय म्हणते - मुद्दाम असं प्लान करुन बाहेर जायच्या ऐवजी मी तुला सकाळी काही गोष्टी आणायची यादी दिली तर?"

"ते फार बरं होईल, आई! फक्त प्रश्न राहील तो विपूला बाहेर यायला कसं तयार करायचं त्याचा… पण ते जमवते मी कसं तरी."

"अरे, तुम्ही सासवा-सुना फारच तयारीच्या निघालात की! सुमती, नाही म्हणजे, मला खरंच तुझीच जरा काळजी वाटत होती, कारण तू पट्कन टेन्शन घेतेस."

नवी पहाट - भाग ६


- ६ नवा छंद -

अश्या तऱ्हेनी शुक्रवारची संध्याकाळ तरी बरेच दिवसांनी बरी गेली. रात्रीचं आवरुन वसु झोपायला गेली तर सुभाष केव्हाच झोपला होता. नेहमीप्रमाणे डोळ्यांवर चष्मा तसाच. म्हणून तो काढायला आणि हातातलं पुस्तक उचलून ठेवायला ती जवळ गेली. चष्मा काढला आणि पुस्तक समजून काढायला गेली तर तो फोटो जवळ घेऊन झोपला होता - बहुधा फोटो बघता-बघताच झोप लागली असावी… फोटो कुठला असेल याचा तिला न पाहताच अंदाज होता. विपूचा पहिला फोटो होता तो - खरं तर तोवर ती विपूही नव्हती! फादरनी आणलेलं दोन दिवसांचं बाळ होतं. आणि वसु तिला बोंडल्याने दूध पाजत एकीकडे तिच्याशी काहीतरी बोबडं बोलत होती, तेव्हा सुभाषनी फोननी काढलेला फोटो होता. इतक्या वर्षांपुर्वीचे फोन ते! फ्रेम करण्यासाठी म्हणून फोटो मोठा करायला दिला तर किती ग्रेनी दिसत होता… पण सुभाषचा सगळ्यांत आवडता फोटो होता तो, आणि आज तर तो खूष होता, खूप दिवसांनी विपू आज नेहमीसारखी वागली होती त्याच्याशी.

शनिवारचा दिवस उजाडला. सगळेजण आठवणीने नेहमीसारखं वागायचा प्रयत्न करत होते, पण नाही म्हटलं तरी सगळ्यांच्याच मनावर दडपण होतं. जेवणं झाल्यावर वसु एकीकडे सगळी आवराआवर करत होती, आईही तिथेच होत्या. विपू काहीतरी करत बसली होती. तेवढ्यात आई म्हणाल्या, "अग वसु, कांदे-बटाटे आणायला झालेत गं!"

"एवढंच ना? मी थोड्या वेळानी जाते बाहेर. विपूला घेऊन जाते आज. तिचं जिग-सॉ पूर्ण झालं की तिला दुसरं लागेलच. बरोबर ना, पिल्लू?"

"आई - यु आर् द बेस्ट! आणि हो, मला एक छोटासा कॅनव्हास घेऊन देशील?"

"कॅनव्हास? हा छंद कधी लागला?"

"बघ, माझ्याकडे कोणाचं लक्षच नसतं! जाऊ दे, काही नको मला कॅनव्हास-बिनव्हास…" झालं, बाईंचं पुन्हा बिनसलं आणि हात-पाय आपटत गेली निघून आपल्या खोलीत.

"आता गं? येणार का तुझ्याबरोबर? नाही तर सगळं ठरवलेलं बिनसायचं…"

"बघते, होईल थोड्या वेळानी शांत. तीन-साडे तीन पर्यंत बाहेर पडू आम्ही, म्हणजे वेळेत येऊ."

"वसु, तू जा बरं, आवर तुझं! विपूलाही तयार करायचं असेल ना? ती बाहेर यायला तयार झाली म्हणजे मिळवलं नाही तर ठरवलेलं सगळं फुकट जायचं…"

"बरं, मी आधी तिला हलवून येते, मला काय नुसती साडी बदलायची आहे." असं म्हणत वसु वर गेली. नेहमीप्रमाणे विपूच्या खोलीचं दार बंदच होतं. वसुनी सवयीनी नॉक केलं. लहान असतामुळे विपूच्या दारावर नॉक करायची काही गरज नव्हती, पण शिस्त म्हणून ती तरीही ते पाळत आली. आणि आता विपू मोठी होतेय तेव्हा सुभाषलाही हे सांगायला पाहिजे याची मनाशीच नोंद करून ती विपूनी दार उघडण्याची वाट पहात उभी राहिली. दार उघडलं नाही तशी तिनी परत नॉक केलं, "विपू, तू बाहेर येणार होतीस ना माझ्याबरोबर?"

"आई गं, एक मिनिटात उठते, पण तू ये ना आत, नॉक करुन बाहेर का थांबलीस आणि मला कॅनव्हास?"

दार उघडून आत जाता-जाता वसु म्हणाली, "सोन्या, मी काय सांगते नेहमी? दार बंद असलं तर नॉक केल्याशिवाय एकदम आत जायचं नाही, हो ना? मग मी पण पाळायला नको का तो नियम? चला, आवरा लवकर! नाहीतर मग कॅनव्हास आणायला वेळच नाही मिळणार... बाबा रागवताहेत खाली!"

"आई, एकच मिनिट, चित्रावर माझी सही करतेय, ती झाली की उठते. मी काय घालू? जीन्स चालतील? मग तू काढून ठेव ना जीन्स आणि एखादा टॉप…"

वसुनी तिच्यासाठी कपडे काढले, तोवर विपू उठून तोंडावर पाणी मारायला गेली होती. ती येईपर्यंत वसुनी सहज तिची चित्रकलेची वही बघायला घेतली आणि दंगच झाली! आत्ता नुकतंच पूर्ण केलें चित्र रंग ओले होते म्हणून ते पान उघडंच होतं. खरं तर वसुला अॅबस्ट्रॅक्ट चित्र आवडत नसत आणि समजतही नसत; पण हे चित्र अॅबस्ट्रॅक्ट असुनही समजत होतं. विपूच्या मनातला सगळा गोंधळ जणू त्या कागदावर उतरला होता. तिनी मनातल्या मनात आणखी एक नोंद केली - विपूची सगळी चित्रं बघायची आणि जमलं तर ती डॉक्टरांनाही दाखवायची.

वसु आणि विपू बाहेर पडून जेमतेम अर्धा-पाऊण तास झाला असेल तोच बेल वाजली. बरोबर चारच्या ठोक्याला डॉ. जोशी दारात उभे होते. सुभाषने त्यांना आत यायला सांगितले आणि बसवून म्हणाला, "खूप बरं झालं तुम्ही आलात ते! खरं म्हणजे तुमचा शनिवार-रविवार तेवढाच मोकळा असतो. त्यात तुम्ही आलात, तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहिये मला! विपूला घेऊन वसु बाहेर गेली आहे. मी आई-बाबांना बोलवतो." असं म्हणून सुभाष आई-बाबांना बोलवायला गेला. बाबा त्याच्याबरोबरच आले. आईही आली पाठोपाठ पाणी घेऊन.

"डॉक्टर, हे माझे बाबा, डॉ. जोग आणि ही माझी आई. तर्कशास्त्राची प्रोफेसर होती, पण फक्त कॉलेजपुरती. आई आणि आजी म्हणून तिनी तर्कशास्त्राचा वापर केल्याचं मला तरी आठवत नाही!"

"सुभाष, अरे, डॉक्टरांसमोर तरी…"

"वहिनी, काळजी करु नका… आई या जमातीचं तर्कशास्त्र वेगळं असतं, मला चांगलं ठाऊक आहे. हा सुभाष जरी काही म्हणाला तरी तुमची कीर्ति मी ऐकून आहे."

सुभाषला एकदम हायसं वाटलं, डॉक्टरांच्या सगळं लक्षात होतं हे पाहून. पण बाबा अजून गप्प होते. तेवढ्यात डॉक्टरच म्हणाले, "डॉ. जोग, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने खूप मोठे आहात, पण सुभाषने सांगून ठेवलंय की मी तुम्हांला नावाने हाक मारायची कारण मी इथे तुमचा मित्र म्हणून आलोय. खरं तर मला ही एकच गोष्ट तेवढी जड जाणार आहे."

"अरे, प्रकाश, तुझ्या डोक्यावरची चांदी पाहिली की विपूला संशयही येणार नाही की तू माझा मित्र नाहीस. आणि मी संशोधनातून आणि डॉक्टरकीतून आता निवृत्त झालोय, तेव्हा तू त्याचं दडपण घेऊ नकोस."

"थँक्स्, श्रीरंग! खरंच, आजच्या दिवसांत इतकं मिळून-मिसळून राहणारं कुटुंब पाहिलं की एक मानसोपचारतज्ञ म्हणून मला फार बरं वाटतं! माझ्याकडे येणारे बरेचसे पेशंट एवढ्या-तेवढ्या कारणाने 'आयुष्यात रसच वाटत नाही' वगैरे भाषा बोलणारेच. त्यामुळे काल सुरुवातीला मी जरा सुभाष आणि वसुंधराशीही थोडा कडकपणेच बोललो. एकुलती एक मुलगी, ती ही कितीतरी मनस्ताप भोगून झाल्यावर लाभलेली - त्यामुळे मलाही सुरुवातीला ते जरा जास्तच काळजी करताहेत की काय असं वाटलं होतं. पण पूर्ण हकीकत ऐकल्यावर मात्र मग मला वाटलं की तुमचं हसतं-खेळतं कुटुंब सावरायला हवं लवकर…"

नवी पहाट - भाग ७

- ७ नवी ओळख -

तेवढ्यात वसु आणि विपू आल्याच. विपू आली तीच बाहेरुन ओरडत, "आजी, आईनी मला नुसतं जिगसॉ नाही, चांगले सहा कॅनव्हास घेऊन दिले! पण मला खूप भूक…" बोलता बोलता विपू सगळे बसले होते तिथे पोहोचली आणि तिथे बाबा, आजी, आजोबा आणि दुसरा एक आजोबांसारखाच माणूस बसलेला पाहून तिनी सगळ्यांकडे पाठ फिरवली आणि वसुच्या कमरेला घट्ट मिठी मारली. वसुनी पाहिलं, ती थरथर कापत होती. ती चरकलीच त्या रात्रीच्या आठवणीने, तोवर सगळं घर हादरलं विपूच्या किंचाळण्याने, "आई गं, मला धरायला राक्षस आलाय ना? तो मला घेऊन जाईल. तू लपव ना मला तुझ्या कुशीत."

"सोन्या, ए विपू, माझं शहाणं पिल्लू ना तू? अग, राक्षस नाही काही, तू नीट पाहिलंस का? ते पण आजोबाच आहेत, आपल्या आजोबांचे मित्र आहेत. तुला काय शिकवलंय? ते हसतील बरं; म्हणतील एका मुलीला तिच्या आईने नमस्कार करायला शिकवलंच नाही! आणि हे काय बरं? तुला भूक लागली होती ना? काय हवं माझ्या बाळाला?"

"सांजा" एकीकडे रडता-रडता हळूच वसुच्या कानात सांगितलं विपूनी. वसुला एकदम हायसं वाटलं - वसु जे बोलत होती त्याकडे निदान थोडं तरी लक्ष होतं तिचं! त्यामुळे ती आजीला म्हणाली, "आजी, आज नातीला सांजा हवाय. तुम्ही बसा काकांशी बोलत, मी आलेच."

"वसु, तू असं कर, तू साडी बदलून घे, तुला काही त्याशिवाय चैन पडणार नाही. तोवर मी दूध गरम करते विपूसाठी आणि आज मी करते सांजा. भावजी काही मला नवीन नाहीत, त्यापेक्षा तूच बस."

"बघा बाबा, पाहिलंत? काका आलेत किती दिवसांनी, पण आई आपण गप्पा मारत बसायच्या ऐवजी हिलाच बस म्हणतेय… "

"अहो, असं काय? आई म्हणाल्या तरी मी बसणार आहे का इथे?"

"वसुंधरा, मी याला आत्ता पहिल्यांदा पाहतोय का? लहानपणापासून असाच आहे हा… तेव्हा फक्त तुझ्याऐवजी स्वप्नाचं नाव घ्यायचा." डॉ. जोशी म्हणाले.

वसुनेही नि:श्वास टाकला - डॉक्टरांच्या सगळं नीट लक्षात होतं तर! ती "आलेच" म्हणून विपूला घेऊनच आपल्या खोलीत गेली साडी बदलायला. त्यांच्या खोलीत विपूला फार आवडायचं कारण जणू खोलीभर तिचे फोटो होते - अगदी छोटं बाळ असल्यापासून ते नुकतेच काढलेले. आई, बाबा आणि ती… फार सुरक्षित वाटायचं तिला तिथे. पण आत्ता मात्र तिच्या डोक्यात एकीकडे त्या बाहेर बसलेल्या आजोबांच्या मित्राबद्दल विचार सुरु होते. ती त्यांना ओळखत नव्हती म्हणून तिला भीतीही वाटत होती आणि आजोबांचे मित्र म्हणून ते आजोबांसारखेही वाटत होते. वसु घरातली साडी नेसून, तोंडावर गार पाणी मारुन चेहरा पुसतच बाहेर आली. विपूला बेडच्या टोकाशी बसलेले पाहून म्हणाली, "विपू, चल बाहेर जाऊया. भूक लागली आहे ना? आजी तुला हवा तसा सांजा करतेय तोवर दूध पिऊन घे."

"पण आई, मला नाही बाहेर यायचं. तू मला इथेच दूध आणून दे ना प्लीज…"

"देईन, पण बाहेर का यायचं नाही ते सांग बरं..."

"बाहेर ते कोणीतरी आलेत - मला माहिती नाहीत ते. आणि तूच सांगितलंयस ना की ओळख नसलेल्या माणसांशी बोलायचं नाही?"

"हो, राजा, मी सांगितलंय आणि तसंच करायचंही. पण आपल्या घरी आलेत ना ते? आपण आलो तेव्हा बाबा, आजी, आजोबा - सगळे त्यांच्याशी गप्पा मारत होते की नाही? तुला सांगितलं ना मी मगाशी की ते आजोबांचे मित्र आहेत? म्हणजे ते आपल्या ओळखीचे आहेत की नाही?"

"पण आजोबांचे मित्र आहेत तर मी कसं पाहिलं नाही अजून त्यांना? तू उगीच सांगतेस मला, ते राक्षसच आहेत, मला घेऊन जातील तुझ्यापासून दूर, मला नाही यायचं ना आई बाहेर…"

विपूचं इतकं काकुळतीला येणं आणि त्याच वेळी घाबरणं वसुला हलवून गेलं. कसं तरी स्वतःला सावरुन ती म्हणाली, "विपू, मी कधी तरी तुला उगाच, खोटं काही सांगते का? नाही ना? अग, ते आजोबांचे मित्र आहेत त्यामुळे आजोबांसारखेच डॉक्टर आहेत… पण आपल्या आजोबांपेक्षा लहान आहेत, त्यामुळे अजून ते प्रॅक्टीस करतात, मग कसा बरं वेळ मिळणार त्यांना? शिवाय ते आणि आजोबा फोनवर गप्पा मारतात की. तू पाहिलंस की नाही, मलासुद्धा त्यांनी नावानी हाक मारली, आपल्या आत्याला पण ओळखतात ते, हो ना? मला सांग इतक्या हुषार मुलीला इतकं सगळं पटवावं लागतं का? आणि आज तर मज्जा आहे की! विपूला सांजा हवा म्हणून आजी स्वतः करतेय सांजा. तू मला मदत करतेस तशी आजीला नाही करणार? आणि आपण आलो तेव्हा भूक कोणाला लागली होती बरं?" इतकं समजवल्यावर विपू बाहेर यायला तयार झाली खरी, पण तरी आईचा पदर काही सोडेना.

वसु तिला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तिथे फक्त ती आणि आजी पाहिल्यावर मगच विपूने वसुला सोडलं. वसुनी तिला आजीला मदत करायला सांगितली आणि ती सगळ्यांसाठी सरबत घेऊन बाहेर निघाली. "आई, तू कुठे चाललीस मला सोडून?"

"विपू, आता मात्र मीच रागावेन हो! बाहेर ते आजोबा आलेत त्यांना सरबत घेऊन जातेय आई. तू दूध पी, आणि मला कोथिंबीर निवडून, धुवून दे बरं! ते झालं की ती कात्री घे आणि मिरच्या चिर. पण जपून, मिरच्यांऐवजी गेल्यावेळसारखं बोट नाही कापून घ्यायचं. मिरच्या चिरुन झाल्या, की हात स्वच्छ धुवायचे आणि तूप लाव हाताला, म्हणजे चुकून मिरची लागली असेल तर आग नाही होणार. वसु, तू जा बाहेर सरबत घेऊन." आजीनेच तोंड उघडल्यावर विपू गप्प बसली. ते पाहून वसु गेली बाहेर.

सगळ्यांना सरबत दिलं आणि म्हणाली, "डॉक्टर…" तेवढ्यात आपली चूक लक्षात येऊन तिनी सुधारुन घेतलं, "काका, खूप दिवसांनी आलात! आज शनिवार, निदान आज तरी काकूंना घेऊन आला असतात तर! त्यांना तर शेवटी कधी भेटले होते आठवावंच लागेल.."

"अग, तुला तिचं पाय दुखणं माहितीच आहे. संधिवात अगदी संधी शोधून उफाळून येतो. नाही तर तिच्याही मनात होतं यायचं आज. ती म्हणतंच होती की विप्लविला बघून खूप दिवस झाले."

"हो ना, आता मीच येईन विपूला घेऊन काकूंना भेटायला."

"तुम्ही मायलेकी इतक्या चांदण्यात कुठे बाहेर गेला होतात?"

"अहो, शनिवार-रविवार सकाळची वेळ काहीतरी वेगळं जेवायला करायचं, नंतर कामाच्या मावशींची आराधना! आणि संध्याकाळच्या गर्दीत नको होतं बाहेर पडणं. किती धूर, गर्दी, धक्के… शिवाय आज विपूला न्यायचं होतं, मग तर गर्दीत अजिबात नको वाटतं. बाईंना आणखी एक जिगसॉ हवं होतं आणि आज नवीन मागणी होती - कॅनव्हासची"

"कॅनव्हास? विप्लवि चित्रं कधी काढायला लागली?"

"मलाही आजच लक्षात आलं ती किती सिरीयस आहे त्याबाबतीत ते! खरं तर कॅनव्हास म्हटल्यावर माझीही प्रतिक्रिया अशीच झाली होती. पण बाहेर जायचं म्हणून तिला आठवण करुन द्यायला गेले तर ती चित्रं पूर्ण करुन सहीच करत होती. सहज ते चित्र पाहिलं. खरं तर मला अमूर्त चित्रं आवडत नाहीत आणि समजतही नाहीत. पण विपूनी काढलेलं चित्र पाहून मात्र मी चमकले. जणू तिच्या मनातला सगळा गोंधळ त्या कागदावर उतरवला होता तिने. शिवाय रेषांची सफाई आणि रंगांची जाण समजली मला. तेव्हा मग तिला सहा कॅनव्हास घेतले."

"Interesting! वसुंधरा, विप्लविची सगळी चित्रं पहायला मिळतील मला? मी तिला एक पेशंट म्हणून भेटण्याआधी मला ही चित्रं बघायला मिळाली तर कदाचित तिचा गोंधळ समजायला मला मदत होईल."

"चालेल, मी असं करते, उद्या विपूशी बोलते आणि तुमच्या क्लिनिकमध्ये चित्रं आणून देते रिसेपशनिस्टकडे. तुम्हीच कळवा मग तिला घेऊन कधी येऊ आम्ही ते."

"चालेल…"

तेवढ्यात आईंची हाक आली, "वसु, येतेस प्लेट्स न्यायला?"

वसु उठली आणि आत गेली. पाहिलं तर आई हातात ट्रे घेऊन उभ्याच होत्या. "अग, मी नेतेय बाहेर, पण तू हिला तयार कर बाई. त्यासाठीच बोलावलं मी तुला." असं म्हणून आई बाहेर गेल्याही.

"विपू, चल, अग सांजा खायचा होता ना तुला, मग बाहेर चल की!"

"बाहेर कशाला? मी इकडेच बसून खाते. बाहेर ते आहेत, बाबा आहेत, आजोबा आहेत…"

"हो, आणि आजी आहे आणि विपूची आईपण! चल, उगीच वेडेपणा नाही करायचा. असले सगळे बाहेर म्हणून काय झालं? सगळे आपल्या ओळखीचे तर आहेत!"

"पण मला भीति वाटते लोकांसमोर जायची." विपूच्या डोळ्यांत पाणी तरळायला लागलं होतं. पण वसुने ठरवलं की आज जर आपण कलतं घेतलं, तर ज्या कारणासाठी डॉक्टरांनी एवढी तसदी घेतली होती ते फुकट जाईल.

"विपू ऽऽऽऽ, वसु, बाहेर या! सगळे थांबलेत तुमच्यासाठी खायला" सुभाषची बाहेरुन हाक आली.

"बाप रे!, विपू, आता बाहेर गेलं नाही तर मात्र सगळे रागवतील हं मला. ऐकलंस ना, बाबा काय म्हणाले - सगळे खायला थांबलेत." सुभाषची हाक अगदी ठरवल्यासारखी वेळेवर आली.

शेवटी वसु आणि तिच्यामागे लपून विपू अशी वरात आली एकदाची बाहेर. सगळे खरंच थांबले होते; वसुला अगदी कानकोंडं झालं. डॉ. जोशींचं आल्यापासूनच बारीक लक्ष होतं सगळ्यांकडे, त्यामुळे वसुच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. विप्लविच्या वागण्यामुळे ती उगीचच स्वतःला दोष देत असावी असं काल क्लिनिकमध्येही त्यांना वाटलं. त्यामुळे विप्लविइतकी गरज नसली तरी या प्रकरणामुळे वसुशीही थोडं बोलायला हवं असं त्यांनी ठरवलं. "वसुंधरा, तू कशाला कानकोंडी होतेयस? अग, वाढत्या वयातली मुलं, विशेषतः मुली असल्या की असे क्षणोक्षणी मूड बदलणं काही जगावेगळं नाही. तू आठवून बघ बरं - तू विप्लविएवढी होतीस तेव्हा काय करु, नि काय नको असं होत नव्हतं तुला? रोजचं ओळखीचं जग रोज वेगळंच वाटायला लागतं. माणूस या वयात खऱ्या अर्थी स्वप्नं बघायला सुरुवात करतो. त्यातच नकळत मुली आईच्या जवळ जायला लागतात आणि मुलं वडलांच्या. कारण ते आपल्यासारखेच आहेत याची हळुहळु जाणीव व्हायला लागलेली असते. आपल्याला काय म्हणायचंय हे बाबांपेक्षा आईला जास्त कळेल हे आपोआप मुलीला कळतं. निसर्गनियम आहे तो. काय वहिनी, तुमच्या तर्कशास्त्रात बसतंय का मी काय म्हणतोय ते?"

"खरंय भावजी! कधी ही जाणीव जरा लहान वयातच व्हायला लागली तर बाबांना जरा कठीण जातं हे स्विकारायला… काय सुभाष?"

"आई! तुम्ही सांगा काका, कालपर्यंत सतत आपल्याला चिकटुन असणारी, आपल्याला यायला उशीर झाला तरी एकीकडे पेंगत आपली वाट पाहणारी, आईऐवजी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणारी आपलीच मुलगी अचानक मोठ्या वयाचे पंख लागायला लागले की अशी पार्टी बदलून प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याऐवजी आईकडे जायला लागली तर जड जाणार नाही का? तुम्ही सांगा बरं तुमच्या स्वतःच्या अनुभवावरुन!"

"सुभाष, तू म्हणतो आहेस त्यात थोडं तथ्य आहे. पण सुदैवाने त्याच काळात वडलांवर नोकरीच्या ठिकाणी जास्त-जास्त जबाबदारीची कामं यायला लागतात. शिवाय पुरुष साधारणपणे कमी भावनिक असतात. त्यामुळे आईला असे बदल पचवायला जितकं जड जाऊ शकतं तितकं वडिलांना नाही. श्रीरंग, तू मगापासून गप्पच आहेस!"

"प्रकाश, मी गेले कित्येक दिवस यावरच विचार करतोय. दुर्दैवाने मला यातलं काहीच कळत नाही - म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या… म्हणूनच मी परत मेडिकल जर्नल वाचायला लागलोय. बरीच प्रगती झालेली दिसते या क्षेत्रात! शिवाय, माझ्याबाबतीत म्हणशील तर स्वप्ना माझ्याऐवजी हिच्याकडे कधी जायला लागली ते खरं तर माझ्या लक्षातही आलं नाही! कारण तेव्हा मी संशोधनात अगदी बुडालो होतो. त्यामुळे माझी घरी यायची वेळ ठरलेली नसायची, मी घरी आलो तरी वाचन, लेखन वगैरे सुरुच असायचं. त्यामुळे सुमतीनी एकटीनीच दोन्ही मुलांना मोठं केलं म्हटलंस तरी हरकत नाही."

गप्पा मारता-मारता खाणं झालं, वसुने तोवर चहा आणला. सगळा वेळ विपू आजी आणि आजोबांच्या मध्ये बसून ऐकत होती - डॉक्टरांनी पाहिलं तर येताना ती जेवढी टेन्स होती तेवढी राहिली नव्हती. आणि मुख्य म्हणजे सगळं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती. चहा पिऊन झाल्यावर डॉक्टर उठले. "श्रीरंग, खूप दिवसांनी तुम्हांला सगळ्यांना भेटून बरं बाटलं. मुलं किती भराभर मोठी होतात! विप्लवि मला एवढीशी आठवतेय… एरवी कुठे पाहिलं असतं तर ओळखलंसुद्धा नसतं! बरं, वसुंधरा, तू मगाशी म्हणालीस ना विप्लवि चित्रं चांगली काढते, मग केव्हातरी तिची चित्रं घेऊन तुम्ही दोघी या की! घरी या, नाहीच जमलं तर क्लिनिकवर या. मला आवडतात अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज. बघु तरी या नातीची चित्रं - आवडलं तर बघू, एखादं विकतही घेईन! पण विप्लवि, मी कागदावरचं चित्र नाही हं विकत घेणार. आईने कॅनव्हास आणून दिलेत ना? मग मला आवडेल तसं कॅनव्हासवर काढून द्यायचं, कबूल?" असं म्हणून डॉक्टरांनी हात पुढे केला. बाकीचे सगळे जवळपास श्वास रोखून पाहात होते आता काय होतं ते. पण आश्वर्य म्हणजे आजीच्या पदराला धरुन उभी असलेली विप्लवि पुढे झाली आणि डॉक्टरांच्या हातात हात देऊन म्हणाली, "प्रॉमिस! आणि डॉक्टरआजोबा, सॉरी, मी घरी आल्यावर तुम्हांला नमस्कार नाही केला. आता केला तर चालेल?"

"अरे वा! चालेल म्हणजे काय! धावेल…"

विप्लविने नीट वाकून नमस्कार केला डॉक्टरांना. आणि वसुचं पाहून-पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक, पण नंतर सगळ्यांनाच केलान्! तिचं हे अनपेक्षित वागणं पाहून सगळेच चकित झाले. आशीर्वाद देताना आजीने डोळ्यांना पदर लावला, म्हणाली, "वसु, पोर मोठी झाली गं…"

नवी पहाट - भाग ८

- ८ नवा संघर्ष -

दोन दिवसांनी सकाळीच वसुनी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये फोन करुन त्यांना कधी वेळ आहे ते विचारलं. रिसेपशनिस्टनी मिसेस् जोग बोलताहेत म्हटल्यावर तिला त्याच दिवशी दुपारी यायला सांगितलं.

आता वसुपुढे प्रश्न होता विपूला तयार करायचा… विपू शाळेतून आल्यावर ती म्हणाली, "विपू, परवा ते डॉक्टरआजोबा आले होते ना, त्यांना तुझी चित्र खरंच पहायची आहेत. अग, आज सकाळी त्यांनी तुझ्याशी बोलायला फोन केला तर तू नेमकी शाळेत! आज जाऊया? मी येणार आहे तुझ्याबरोबर…"

एकदम निरुत्साही स्वरात विप्लवि म्हणाली, "तू येणार असलीस तर चालेल. मी आत आले तर चालेल ना? बाहेर कोण-कोण लोक आले असले तर?"

"हो, तू ये की आत! आता तर तू ओळखतेस ना त्यांना? विपू, मला दाखवशील तुझी चित्रं? मला पण बघायचंय माझी लाडकी लेक किती छान चित्रं काढते ते!"

"मी कपडे बदलून येते आणि येताना आणते वह्या. आजी गं, मला भूक लागलीये."

म्हटल्याप्रमाणे कपडे बदलून खाली आली तेव्हा विप्लविने दोन वह्या आणल्या होत्या. वसु चित्रं पहात होती तोवर आजीने विपूच्या आवडीचा तूप-जिऱ्याची फोडणी दिलेला दही-भात तिला शिकवून तिच्याचकडून करुन घेतला. विपूची कटकट चाललीच होती, "मला नाही शिकायचं. मला काहीच नाही करायचं…" पण आजीने काही दाद दिली नाही.

वसु चित्रं पहात होती - सगळीच चित्रं काही अमूर्त नव्हती. सुरुवातीची चित्रं साधी-सरळ, वसुला समजतील अशी चित्रं होती. प्रत्येक चित्राखाली विपूची सही आणि चित्र कधी काढलं त्याची तारीख असं सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे हल्ली-हल्लीच लागलेला छंद होता तर हा! आणि सगळ्या चित्रातून जणू तिनी तिची कहाणी तिला समजली तशी सांगितली होती. आश्चर्य म्हणजे तिचे पहिले पिरियड्स झाले त्यानंतर चित्र हळुहळु अॅबस्ट्रॅक्ट व्हायला लागली होती. जणू मनातला गोंधळ ती कागदावर उतरवत होती. पण पहिल्यांदाच वसुला आधीच्या सरधोपट चित्रांपेक्षा नंतरची अॅबस्ट्रॅक्ट चित्रं जास्त समजत होती. त्याच बरोबर आपल्या मुलीच्या मनातला सगळा कल्लोळ, गोंधळ आणि मदतीसाठी केलेला मूक आक्रोश तिला अस्वस्थ करत होता.

ती अशी अस्वस्थ होऊन बसली होती, तेवढ्यात विप्लवि खाऊन आली. "आई, आपण नको जाऊया… नाहीतर तू एकटी जा."

"आता काय झालं? आत्ता तर म्हणालीस की तू माझ्याबरोबर आत येणार आहेस डॉक्टरआजोबांना भेटायला!"

"हो, पण नको ना! किती माणसं असतात रस्त्यात!"

"अग, पण आपण रस्त्याने चालत थोडी जाणार आहोत? आपण तर गाडीने जाणार की नाही?"

"पण तू कुठे गाडी चालवणारेस!"

"हा काय वेडेपणा? तू अशोककाकाला ओळखत नाहीस का?"

"पण नकोच!"

"बरं बाई, मी गाडी चालवली तर?"

"तू चालवशील गाडी? माझ्यासाठी?" विप्लविच्या स्वरात थोडी शंका डोकावत होती.

"मग! आता काय करायचं? माझ्या लाडक्या लेकीला आज अशोककाकानी गाडी चालवायला नकोय आणि आपण तर डॉक्टरआजोबांना कबूल केलंय चित्र दाखवायला येतो म्हणून…"

"Thank you, Mama! You are the best!"

"चला आता, पुरे झाली नाटकं." असं म्हणून जास्त वेळ न घालवता विपूला घेऊन वसुंधरा गाडीकडे निघाली. एकीकडे ती सुभाषला फोन करुन सांगतच होती की त्या दोघी डॉ. जोशींच्या दवाखान्यात जाताहेत, तेवढ्यात विपूने घाबरुन तिच्या पदराला घट्ट धरलेलं तिला जाणवलं. विपूला एकदम काय झालं तिला कळेचना! तोच अशोक म्हणाला, "आज बेबीताई पण बाहेर चालल्या वाटतं, वहिनी?" एकदम तिच्या लक्षात आलं काय झालं असावं ते! सुभाषशी बोलता-बोलता त्या दोघी गाडीजवळ पोहोचलेल्या तिच्या लक्षातच आलं नव्हतं; आणि त्यांना दोघींना बघून गाडीचं दार उघडून अशोक उभा होता. आता काहीतरी करायलाच हवं होतं, ते ही अशोककाकांना न दुखवता… किती झालं तरी अशोककाका तिला आठवतात तसे त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून होतेच! शेवटी एकदम सुचून ती म्हणली, "अशोककाका, तुमच्या लाडक्या बेबीताईला वाटतं आईला गाडीच चालवता येत नाही! तिनी आज आजीशी चक्क पैजच लावली आहे म्हणा ना! त्यामुळे आज मी दाखवते तुमच्या बेबीताईला की अजून मला गाडी येते चालवता!"

"काहीतरी काय, वहिनी! तुम्हाला येते की चांगली गाडी चालवता… तिकडे अमेरिकेत काय ड्रायव्हर असतात होय? हां, आता आईसाहेबांचा जमाना वेगळा होता. तरी पण त्यांना यायची बरं का गरजेपुरती गाडी चालवता."

"अहो, पण हे तुम्ही म्हणताय! हिला कुठे पटतंय! त्यामुळे आज आम्हीच जरा जाऊन येतो दोघी. एक छोटंसं काम आहे तुमच्याच बेबीताईचं, ते करुन येतो. चालेल ना?"

"असं काय विचारता, वहिनी? जा, दाखवाच बेबीताईना किती छान गाडी चालवता तुम्ही ते! घ्या, चाव्या घ्या गाडीच्या."

गाडीत बसता-बसता वसुंधराला हुश्श झालं! आज अशोककाका विनाकारण दुखावले गेले असते या पोरीपायी. काय करावं हिला? आज डॉक्टरांशी बोलायला मिळेल का? एकीकडे गाडी सुरु केली तरी गाडीबरोबरच डोक्यातही चक्रं सुरुच होती. अचानक तिच्या लक्षात आलं, विपू नेहमीच्या सवयीने मागच्या सीटवर जाऊन बसली होती, ते ही कटकट न करता सीटबेल्ट लावून! पण आता आणखी काही बोलून उगीच थोडक्यासाठी बिनसायला नको, म्हणून ती काही बोलली नाही. ड्रॉईंगच्या दोन्ही वह्या आपल्यापुढे घट्ट धरुन गप्पपणे बाहेर बघत होती विपू. पण आरश्यात बघून वसुला कळत होतं की विपूची नजर फक्त काचेच्या बाहेर वळलेली होती. ती 'बघत' काहीच नव्हती. चेहऱ्यावरचा ताण लपता लपत नव्हता. ती ही या वयाची होती की कधीतरी! पण हे असं कधी झालं नव्हतं तिला. पहिल्यांदाच विप्लवि नक्की कोणाच्या पोटी जन्माला आली ते कळावं असं वाटलं तिला आणि पुढच्याच क्षणी अपराधीही… स्वतःला आपण शिकलेले म्हणवतो, मग जन्म कोणाच्याही पोटी झाला असला तरी दोन दिवसांची असल्यापासून ज्या मुलीला आपण आपली म्हणूनच वाढवलं, ते आपले संस्कार असे सहजी हार मानतील? उलट-सुलट विचारांच्या नादात गाडी डॉ. जोश्यांच्या दवाखान्याशी आली तशी ती एकदम जागी झाली. दोघी गाडीतून बाहेर पडल्या. विपू आपला हात घट्ट धरुनच चालेल हे आताशी तिला सवयीचं व्हायला लागलं होतं. दवाखान्यात शिरता-शिरता विपू एकदम ओरडली, "तू मला फसवून या डॉक्टरांकडे आणलंस… मी नाही येत." हातावरची पकड सैल होतेय असं जाणवल्याक्षणी वसुने पट्कन विप्लविला घट्ट धरलं. "काय झालं, बाळा? आपण तुझी चित्रं दाखवायला आलोय ना डॉक्टरआजोबांकडे? विसरलीस एवढ्यात?"

"नाही, तू खोटं सांगितलंस! ते डॉक्टरआजोबा सायकिअॅट्रिस्ट आहेत म्हणून आलोय ना आपण इथे?"

"विपू, आपल्या आजोबांचे मित्र म्हणजे कसले तरी डॉक्टर असणारच ना? तुलाही माहिती आहे ते डॉक्टर आहेत… मग सायकिअॅट्रिस्ट असले म्हणून काय झालं? आपण इथे तुझी चित्रं दाखवायला आलोय ना?" कशीबशी तिची समजूत काढून, थोडंसं तिच्या मनाविरुद्धच वसु आत शिरली. आत शिरताच रिसेपशनिस्टनी तिला ओळखून डॉ. जोशी तिची वाट बघताहेत म्हणून लगेच आत जायला सांगितलं.

"नमस्कार, काका! तुमची नात तुम्हीच सांभाळा! मला दमवलं आज तिनी… बाहेर तुमच्या नावापुढे सायकिअॅट्रिस्ट लिहिलेलं पाहिलं आणि बाईसाहेबांचं बिनसलं लगेच…"

"बसा दोघी! वसुंधरा, हे घे पाणी. विप्लवि, काय झालं, बाळ?"

आत्तापर्यंत पकडून आणलेल्या कैद्यासारखी, मनाविरुद्ध बसलेली विपू डॉक्टरांनी विचारल्याबरोबर लगेच म्हणाली, "तुम्ही मला तपासणार आहात ना? आईनी मला फसवून आणलं चित्रं दाखवायला."

"अग, आईनी कुठे फसवलं? विसरलीस इतक्यात? मी शनिवारी आलो होतो तेव्हा म्हणालो नव्हतो का, मला तुझी चित्रं पहायची आहेत आणि आवडलं तर तू तुझ्या नव्या कॅनव्हासवर काढून द्यायचं आणि मी ते विकत घेणार? आणि तुला असं का बरं वाटलं की मी तुला तपासणार आहे? तूच म्हणालीस ना, मी सायकिअॅट्रिस्ट आहे? मग बघ बरं तपासायला इथे स्टेथॅस्कोप तरी आहे का?"

"पण सायकिअॅट्रिस्टना स्टेथॅस्कोप कुठे लागतो? ते नुसतेच खूप प्रश्न विचारतात."

"आणि मग काय करतात?" डॉ. जोश्यांना विप्लविला बोलतं ठेवायचं होतं. विशेषतः ती या विषयावर आपणहून बोलणार असली तर उत्तमच!

"मग तो माणूस वेडा असला तर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवतात."

"आणि वेडा नसेल तर?"

विप्लवि गोंधळली. तिच्या छोट्या वयाला यापलिकडची माहिती काही झेपली नव्हती.

"विप्लवि, तुमचे फॅमिली डॉक्टर कोण गं?"

यावर विप्लवि अचानक तिच्या वयाला साजेसं निरागस हसली. "आजोबा. डॉक्टर आहेत ना ते? मग आणखी डॉक्टर कशाला हवेत?" तिच्या चेहऱ्यावर डॉक्टरांना कसं पकडलं हा भाव अगदी स्पष्ट दिसत होता.

"अग, पण तो फॅमिली डॉक्टर कुठे आहे? तो तर मोठ्ठा कॅन्सरवर रिसर्च करणारा डॉक्टर होता. आणि तू तर अजून लहान आहेस, मग तुझे वेगळे डॉक्टर असतील ना!"

"त्या होय! आई मला त्यांच्याकडे वर्षातून एकदा घेऊन जाते. पण एरवी आज्जीच तुळशीचा काढा दे, दुधात हळद धालून दे, असं काहीतरी करते, नाहीतर मग आजोबा देतात औषध."

"पण म्हणजे आजी दर वेळी काही तुळशीचा काढा देत नाही ना? तसंच माझंपण आहे. माझ्याकडे येणारे सगळे पेशंट काही वेडे नसतात. कधी कधी एखाद्या बाईला तिच्या वाईट्ट नवऱ्यानी खूप त्रास दिला असला तर मग नंतर तिला खूप भीति वाटते. मग मी तिच्याशी बोलतो, तुझे आजोबा कसे औषध देतात, तसं औषध देतो. एखाद्या माणसाला आणखी कशाची तरी खूप भीति वाटत असते, त्याला ऑफिसात काम पण करता येत नाही. मग त्याला वेगळं औषध देतो, त्याच्याशी वेगळ्या गप्पा मारतो. तुला माहितिये? कधी-कधी नुसत्या खूप गप्पा मारुन पण भीति कमी होते." डॉ. जोश्यांनी पाहिलं, आल्यावर विप्लवि जेवढी उत्तेजित झाली होती त्यापेक्षा खूप शांत झाली होती आता; मुख्य म्हणजे तिनी वसुंधराचा पदर आणि हात कधी सोडला तिलाही कळलं नव्हतं. "बरं, आता माझी नाही ना भीति वाटत? मग मला चित्रं दाखवणार ना?"

"हो ऽऽऽ! ह्या घ्या वह्या."

"आईनी आणलेल्या कॅनव्हासचं उद्घाटन झालं की नाही?"

"नाही! तुम्हाला चित्र आवडलं तर पहिला कॅनव्हास त्यासाठी वापरणार आहे!"

"अरे वा! म्हणजे मला एकदम स्पेशल चित्र मिळणार तर! विप्लविनी पहिल्यांदा कॅनव्हासवर काढलेलं" एकीकडे डॉक्टर चित्रं बघत होते, पण त्यापेक्षा जास्त लक्ष त्यांचं विप्लविच्या बोलण्याकडे, देहबोलीकडे होतं. तिची नुसती पहिली भीति गेली होती एवढंच नव्हे, तर कुठे तरी तिच्या मनात आपल्याबद्दल विश्वास, एक वेगळं स्थान निर्माण झालंय असं त्यांना वाटत होतं. "वसुंधरा, तू पाहिली असशील ना ही चित्रं? विप्लविला ड्रॉईंगच्या क्लासला पाठवतेस की काय?" इतका वेळ वसुंधरा इतकी शांत बसली होती की ती खोलीत आहे याचाही विसर पडावा. पण ती मुद्दामच गप्प होती. डॉ. जोशी जर विपूचा विश्वास संपादन करु शकले तर काम सोपं होईल याची तिला कल्पना होती. त्यामुळे अचानक डॉक्टर तिच्याशी बोलताहेत हे लक्षात यायला थोडा वेळच लागला.

"नाही हो, काका! हिचा हा छंद तेवढा तिनी लपवून ठेवला होता - बहुधा अलिकडेच लागला असावा." वसुंधरा 'अलिकडे' असं मुद्दामच मोघम बोलली. पण डॉक्टरांच्या लक्षात आलं असावं. कारण त्यांनी परत पहिली चित्रं पहायला सुरुवात केली. "अरे वा, विप्लवि अगदी शिस्तीची आहे की! प्रत्येक चित्रावर नाव, तारीख… विप्लवि, तुझी सुरुवातीची चित्रं वेगळी आहेत, म्हणजे घर, माणसं, दुकान, भाजीवाली बाई - सगळे ओळखता येणारे विषय आहेत. किती सुंदर हात चालतो तुझा! पण ही नंतरच्या चित्रांची स्टाईल एकदम वेगळी आहे… ही स्टाईल कुठे शिकलीस तू?

"शिकले नाही. मला चित्रं काढायला आवडायला लागल्यावर आधी तुम्ही म्हणता ती घराची, माणसांची चित्रं काढली. पण त्याचा कंटाळा आला."

"का बरं? किती सुंदर आहेत! वाटतंच नाही एवढ्या छोट्या मुलीनी काढलेली चित्रं आहेत!"

"हो, पण ती माझी चित्रं नाहियेत."

"म्हणजे?"

"म्हणजे ती नुसती आजूबाजूला जे दिसतं त्याचे फोटो काढल्यासारखी वाटतात. पण त्यात मला काय वाटतं ते नाहिये… म्हणजे मला नीट सांगता येत नाहिये, पण when you write in newspaper, it is what you see happening around you; you write because you want more people to read about it. But if I am a writer, then I won't write just because I want more people to read - I will write what I want to write, I will write what I feel."

"So when you started drawing in different style, that is what you wanted to draw? That is what expresses you?"

"Yes!!! Express - that is what I want to do when I draw…."

"वसुंधरा, भाग्यवान आहेस तू! विप्लविला नुसती कलेची, बुद्धीची देणगी नाही, तर त्याबरोबर कलेची समजही आहे! भल्या-भल्या लोकांकडे ही समज असतेच असं नाही! बरं विप्लवि, मला सांग बरं ह्या चित्रातून तुला काय सांगायचंय?" डॉक्टरांनी नेमकं विप्लविचा पहिला पिरियड झाल्यानंतरचे चित्र निवडलं होतं.

विप्लविने डॉक्टरांच्या हातातून वही घेतली आणि चित्र पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलत गेले…

"काय झालं विप्लवि? बरं वाटत नाहिये का?"

"नको, मी ठीके…"

"मग सांग बरं या चित्राबद्दल… कारण आधीची चित्रं कशी तू म्हणतेस तशी फोटो काढल्यासारखी होती पण या चित्रातून तुला काहीतरी सांगायचंय, हो ना?"

"हे चित्र काढलं ना त्याच्या आधी…" विप्लविने आधारासाठी आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे काकुळतीचे भाव पाहूनच चित्रावरची तारीख न बघताच वसुला अंदाज आला विपूला काय सांगायचं होतं, म्हणून तिनी आधार द्यायला तिला एका हातानी जवळ घेतलं आणि बोलायला सुरुवात केली, "काका, त्या चित्राच्या आधीच…"

डॉक्टरांनी हातानेच तिला थांबवलं. कारण पहिल्या पिरियडच्या अनुभवाबद्दल विप्लविला काय वाटतं हे समजून घेणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं. "बोल, बाळ. तू इतकी हुषार, शहाणी आणि प्रतिभावान आहेस - तूच म्हणालीस की चित्रातून तुला स्वतःला एक्सप्रेस करायला आवडतं. मग शब्दांतून तुला जमेल तसं पण तूच सांग."

विप्लविने अडखळत बोलायला सुरुवात केली. "डॉक्टरआजोबा, हे चित्र काढलं त्याच्या आधी मला बरं नव्हतं. असं कधी झालं नव्हतं आधी, पण मला ना काहीतरी झालं - आईला दाखवलं तर आई म्हणाली की बहुधा पिरियड असेल. ती आधी आजोबांशी बोलली, मग आजीशी. मग तिनी आणि आजीनी मला पिरियड म्हणजे काय, ते कशासाठी असतात, त्यामुळे मुलगी मोठी झाली की आई होऊ शकते, त्यामुळे ते कसं स्पेशल आहे, ते सांगितलं. तेव्हा काळजी काय घ्यायची, स्वच्छता कशी ठेवायची ते पण सांगितलं. आईनी शाळेत येऊन माझ्या टीचरना पण सांगितलं की मला पिरियडमुळे त्रास होत असेल तर पी.टी. आणि खेळाच्या वेळी मला रेस्ट घेऊ दे."

"गुड गर्ल… बघ कसं सगळं नीट सांगितलंस मला!"

"पण डॉक्टरआजोबा, आमच्या क्लासमध्ये मी एकटीच आहे पिरियड सुरु झालेली, त्यामुळे मला बाकीच्या मैत्रिणी चिडवतात. आई आणि आजीनी सांगितलं ना की पिरियड सुरु झाले की मग बाळ होतं - पण मी तर अजुन लहान आहे ना? मग बाळ झालं तर? आणि त्यांनी सांगितलं की आता पुरुषांपासून जरा जपून रहा, अनोळखी पुरुषांशी बोलू नकोस… मला हळुहळु भीति वाटायला लागली. सगळ्या पुरुषांची… अगदी बाबा आणि आजोबा आणि अशोककाकाचीसुद्धा. पण ते तर माझ्यावर प्रेम करतात सगळे, मग आई आणि आजीनी असं का सांगितलं पुरुषांपासून जपून रहा? माझा खूप गोंधळ होतो."

विप्लवि बोलत होती आणि वसु हादरली होती. एका हाताने तिने विप्लविला जवळ घेतलं होतं, ती मिठी नकळत घट्ट झाली आणि दुसऱ्या हाताने पदराचा बोळा गळ्याशी दाटलेला हुंदका दाबायला नकळत तोंडात गेला होता.

"विप्लवी, हे बघ, तू लहान आहेस ना अजून, म्हणून तुला भीति वाटतेय. आई आणि आजीनी काय सांगितलं? पुरुषांपासून जपून रहा, पण त्यात बाबा, आजोबा, अशोककाका येत नाहीत काही हे सांगायला विसरल्या… वसुंधरा, पाहिलंस एक वाक्य नीट बोलली नाहीस तर काय झालं?" डॉक्टर जरी बोलत दटावणीसारखे असले तरी त्यांचा वसुंधराशी बोलताना स्वर मात्र आश्वासक होता. "विप्लवि, आत्ता नाही ना भीति वाटत तुला? मग असं करू? मी या वह्या घरी नेऊन आजीला दाखवू? म्हणजे आम्हांला दोघांना कुठलं चित्र हवं ते ठरवता येईल. आणि आमचं जर भांडण झालं तर मग एका मुलीची मजा आहे! दोन-दोन चित्रं काढायला मिळणार कॅनव्हासवर आणि दोन-दोन चित्रं विकली जाणार! बाप रे! मी तुझ्याएवढा होतो तेव्हा मला काहीसुद्धा कळत नव्हतं. वसुंधरा, तुला?" डॉक्टरांनी अचानक बोलण्याचा विषय बदल्याने वसु एक क्षण गोंधळली. पण स्वतःला सावरत म्हणाली, "काका, मुद्दाम माझ्या लेकीसमोर का हो चिडवताय मला? तुम्हांला माहिती आहे, मला चित्रकलेतलं ओ की ठो कळत नाही! बरं विपू, आजोबा म्हणताहेत तसं त्यांना वह्या घरी नेऊ देत का? म्हणजे डॉक्टरआजीला पण पहायला मिळतील चित्रं. आणि आता आपल्याला घरी जायला हवं ना? आजोबांकडे पेशंट बाहेर वाट बघत असतील. आपण वह्या द्यायला आलो आणि गप्पाच मारत बसलो की!"

डॉक्टरांच्या शेवटच्या बोलण्याने आणि आईच्या समजावणीमुळे विप्लवि बरीच शांत झाली होती. मानेनीच आईला हो म्हणून ती म्हणाली,"सॉरी, डॉक्टरआजोबा, मी वेड्यासारखी वागले ना?"

"वेड्यासारखी? सायकिअॅट्रिस्ट कोण आहे सांग बरं?"

तशी विप्लवि खुदकन् हसली… खुर्चीवरुन उठत आईला म्हणाली, "आई, चल आपण जाऊया. खरंच डॉक्टरआजोबांचे पेशंट बाहेर वाट बघत असतील ना?"

बाहेर पडताना चक्क विप्लवि आईच्या मागे न लपता तिचा हात धरुन, तिच्या शेजारुन चालत होती. गाडीत बसतानाही तिनी विचारलं, "आई, मी पुढे बसू तुझ्याशेजारी?"

"बस की! थांब, आपण आधी घरी फोन करु." असं म्हणत वसुने घरी फोन लावला. आई बहुधा फोनजवळच बसल्या होत्या कारण पहिल्याच रिंगला फोन उचलला. "आई, काही आणायचंय का? आम्ही निघतोय इकडून."

"तिकडे काय झालं ते सांग बाई आधी! इथे आमचा दोघांचा जीव टांगणीला लागलाय…"

"आई, आले की सांगते तुमच्या नातीच्या करामती डिटेलमध्ये, पण बाबांना सांगा, त्यांच्या मित्राची विपूनेच उलटतपासणी घेतली! सायकिअॅट्रिस्ट नक्की काय करतो यावर चर्चा चालली होती दोघांची. आणि हो, त्यांनी विपूच्या चित्रांच्या वह्या ठेऊन घेतल्यात. घरी नेऊन काकूंना दाखवून मग सिलेक्ट करतो म्हणाले चित्रं…"

"आई, आईऽऽऽ आजीला विचार ना आपण मलई सँडविच आणि ढोकळा नेऊया का…." मध्येच विपूला काय झालं कोणास ठाऊक.

"विचारते"

"काय गं वसु? काय म्हणतेय विप्लवि?"

"बाबा, विपू विचारतेय की आम्ही येताना मलई सँडविच आणि ढोकळा आणू का." दोघं बहुधा दोन हँडसेटवरुन बोलत असावेत.

"थांब, ते तुझ्या सासूलाच सांगू दे. पण श्रीरंग आणि विपूची पहिली भेट कशी झाली?

"बाबा, आपल्याला अपेक्षित होती तशीच थोडीफार. पण बहुधा बाईसाहेबांना मलई सँडविचची आठवण झाली म्हणजे आत्तातरी खुशीत दिसताहेत."

"बरं, वसु, बाकी काही आणायचं नाहिये. पण विप्लवि खूप दिवसांनी आपणहून काहीतरी हट्ट करते आहे ना? मग आण हो, तिला काय हवं ते. रात्रीच्या जेवणाचं बघू नंतर. एवढं खाणं झालं की बहुधा नुसती मुगाची खिचडी टाकली तरी चालेल."

"ठीक आहे. मग आम्ही तेवढं घेऊन येतोच घरी. जास्त वेळ नाही लागणार." वसुने फोन बंद केला आणि गाडी सुरु.

नवी पहाट - भाग ९

- ९ नव्या पहाटेची सुरुवात -

इकडे डॉ. जोश्यांनी आजच्या बाकीच्या अपॉईंटमेंट रद्द करायला त्यांच्या रिसेपशनिस्टला सांगितलं. एक तर अजून दोनच पेशंट्स यायचे होते आणि आत्ताच्या विप्लवि आणि वसुंधराच्या भेटीनंतर दुसऱ्या केसवर नीट लक्ष देणं जमेलसं त्यांना वाटेना. त्यांनी विप्लविच्या चित्रांची पहिलीच वही पुढे ओढली आणि चाळायला सुरुवात केली. विप्लविने काढलेली चित्रं आणि आजचं संभाषण या दोन्हीमुळे विचारात पडले होते. विप्लवि प्रतिभावान होती हे चित्रांवरुन स्पष्ट होतंच होतं. त्यामुळेच ती जास्त भावनाशीलही असावी. पण वसुंधराच्या बोलण्यावरुन आणि शनिवारच्या जोगांच्या घरच्या एकूण बोलण्यावरुन विप्लविला ती वसुंधरा आणि सुभाषची मुलगी नाही याची कल्पना असावी असं वाटलं तरी नाही.

आणि खरं तर विप्लवि भाग्यवानच म्हणायला हवी. अमेरिकेतच काय, जगात कुठेही जन्मदात्या आई-वडिलांना नकोश्या झालेल्या मुला-मुलींचं आयुष्य कसं आणि कुठल्या दिशेला भरकटेल हे सांगणं कठीणच असतं. आई किंवा वडिलांपैकी एक जण जरी कोणत्याही कारणाने कुटुंबात नसला तरी मुलांच्या जडण-घडणीवर याचा परिणाम होतोच; मग दोघेही नसले तर? विप्लविच्या बाबतीत एक गोष्ट फार चांगली झाली होती की यातल्या कशाचीच जाणीव व्हायच्या आधीच तिला तिच्यावर जीवापलिकडे प्रेम करणारं घरटं मिळालं होतं. शिवाय तिचे जन्मदाते आई-वडिल कोण, कुठल्या देश-धर्माचे याची त्यांनी कधी चौकशीही केली नव्हती; ती 'मुलगी' आहे यानेही या सुसंस्कृत कुटुंबाला काही फरक पडला नव्हता. शिवाय मुलगी काही महिन्यांची असतानाच वसुंधरा आणि सुभाषनी अमेरिका कायमची सोडून भारतात यायचं ठरवल्यामुळे विप्लविला दोन्हीकडच्या आजी-आजोबांचं प्रेमही मिळत होतं.

इतक्या सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरणात लहानपणापासून वाढवल्यावर हे असं काहीतरी व्हावं हे सगळ्या कुटुंबाला हादरवून सोडेल हे साहजिक होतं. विप्लविच्या वागण्याचा संबंध तिच्या जन्मदात्या आई-वडिलांशी निदान रक्ताने तरी जुळू शकतो का? पण लगेचच ही शक्यता डॉ. जोश्यांच्या मनाने खोडून काढली. कारण तिच्या वागण्यातल्या बदलाचा तिचे पिरियडस् सुरु होण्याशीच असावा असं जितका जास्त विचार करावा तितकं त्यांना वाटत होतं. एकीकडे ते नकळत तिची चित्रं पहात होते. सहज त्यांची नजर चित्राकडे गेली. विचार करता-करता ते विप्लविने तिच्या पहिल्या पिरियडनंतर काढलेल्या चित्राशी येऊन थांबले होते. त्या चित्राशी विप्लविचं भावनिक नातं जुळलं असावं कारण त्यानंतर तिची चित्रांची शैली बदलली होती. पहिल्या पिरियडचा काळ कुठल्याही मुलीसाठी शारीरिक आणि भावनिक - दोन्ही पातळ्यांवर मोठा उलथापालथीचा काळ असतो. विप्लविसाठीही ते खरं होतंच. तिची भावनिक उलथापालथ दोन वेगळ्या पातळ्यांवर होत होती. एका बाजूला तिची स्वतःबद्दलची समज हळुहळु स्पष्ट होत होती, तिला ते व्यक्त करायचं माध्यमही सापडलं होतं. पण दुसऱ्या बाजूला सगळ्याच पुरुषजमातीबद्दल एक भीति आणि अविश्वास तिच्यात निर्माण झाला होता; त्यातून अगदी तिचे बाबा आणि आजोबाही सुटले नव्हते! पण असं अचानक का व्हावं? उलट तिला आई आणि आजीनी स्त्रीत्वाचं वेगळेपण, तिला मिळालेली अनोखी देणगी समजावून सांगितली होती. याचा संबंध तिच्यात झालेल्या शारीरिक बदलांशी तर नव्हता? वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी मासिक पाळी सुरु होणे हे जरा लवकरच होते.

अर्थात, त्यांना याची सगळी संगती लागतेय अस अंधुक जाणवत होतं. खूप लहान वयात मासिक पाळी सुरु झाली की मुलीत नैसर्गिक बदल व्हायचे ते होतातच, पण त्याही पलिकडे जाऊन कधी कधी डिप्रेशन, मूड चेंजेस् हे ही वाट्याला येतं. तश्या प्रकारचं संशोधन परदेशी मोठ्याच प्रमाणावर होतं, कारण तिथे त्यामानाने मानसोपचारतज्ञाची मदत घेणं भारतातल्यासारखं अवघड नाही. दुर्दैवाने भारतात आत्ता-आत्तापर्यंत मानसोपचारतज्ञ म्हणजे आत्ता विप्लवि म्हणाली तसे 'वेड्यांचे डॉक्टर' अशीच समजूत होती. त्यामुळे विप्लविसारख्या अनवट केसेसवर संशोधन होऊन इथल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचा आणि विप्लविला होणाऱ्या त्रासाचा संबंध काय यावर फारशी माहिती नाहीच असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांचा हा अंदाज बरोबर असला तर त्यांना परदेशी संशोधनावर आणि तिकडे प्रचलित उपचारांवर अवलंबून रहावं लागणार होतं. फक्त त्यांचा मानसोपचारतज्ञ म्हणूनचा प्रदीर्घ अनुभवच काय तो त्यांना विप्लविला योग्य ठरतील असे बदल करायला मदत करणार होता.

तेवढ्यात इंटरकॉमच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. रिसेपशनिस्ट ते अजुन किती काळ थांबणार आहेत हे विचारत होती कारण मिसेस् जोग आणि त्यांची मुलगी गेल्यावर डॉक्टरांनी दिवसाच्या उरलेल्या अपॉईंटमेंट रद्द करायला सांगितल्या त्यालाही दीड-दोन तास होत आले होते. तिनी हे सांगितलं तेव्हा डॉ. जोश्यांनाच मोठी चूक झाल्यासारखं वाटलं. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत तिला घरी जायला सांगितले. विप्लवि आणि वसुंधराच्या आजच्या भेटीचा वृत्तांत, त्यावरचे त्यांचे विचार आणि सुभाष-वसुंधराशी काय बोलायचे आहे या सगळ्याच्या नोट्स विप्लविच्या फाईलमध्ये लिहिल्या आणि ती फाईल घेऊन ऑफिसला कुलूप लावून ते घरी गेले. जेवतानाही त्यांचं लक्ष विप्लविच्या केसमध्येच जास्त होतं; पण एव्हाना त्यांच्या पत्नीला ते माहिती झालं होतं. काहीतरी वेगळी केस आली की डॉक्टरांचं कशातच लक्ष नसतं, शिवाय मानसोपचारतज्ञ असल्यामुळे कुठल्याच केसबद्दल काहीच ते अगदी स्वतःच्या पत्नीलाही सांगू शकत नसत. त्यामुळे उगीच प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही हे ताडून मागचे सगळे आवरुन त्या वाचीत असलेले पुस्तक घेऊन बेडरुमकडे निघाल्याच होत्या, तेवढ्यात डॉक्टरांनीच त्यांना हटकलं. जरा आश्चर्य वाटून त्या नवऱ्याजवळ येऊन बसल्या. त्यांना दोन वह्या देत डॉक्टर म्हणाले, "श्यामल, या वह्या बघशील आज? चित्रं आहेत; ती पाहून तुझं काय मत ते सांग मला."

श्यामलताई विचारात पडल्या, पण ओठांशी आलेला प्रश्न मागे सारुन त्या गप्पपणे तिथेच बसून चित्रं पाहू लागल्या. सुरुवातीला अगदी रोजच्या आयुष्यातल्या घटनाच चित्रित केल्या होत्या, पण चित्र काढणाऱ्याच्या रेषांत सफाई होती, नेमकेपणा होता. हळुहळु चित्रांचं स्वरुप बदलु लागलं. रोजच्या आयुष्यातल्या घटनांची जागा जणू चित्रकाराच्या मनाने घेतली होती. शिवाय आता चित्रात रंग आले होते. चित्रकलेतलं काही न कळणाऱ्या व्यक्तीला कदाचित सगळे बारकावे जाणवले नसते, पण श्यामलताईंचं तसं नव्हतं. कोणे एके काळी त्यांनीही कॅनव्हासला ब्रश लावला होता. पण पुढे संसाराच्या धकाधकीत, डॉक्टरांच्या वेळी-अवेळी येण्यात, आल्यावरही कधी असं केसमध्ये हरवून बसले की त्यांची काळजी करण्यात-घेण्यात चित्रकलेने कुठल्या वळणावर हात सोडला ते वळणही आठवत नव्हतं आता. पण अचानक ही सफाईदार चित्रं पाहून जणू त्यांचं हरवलेलं जग त्यांना पुन्हा हाक मारु लागलं. ही अशी अमूर्त चित्रकला त्यांना विशेष कधी भावली नव्हती कारण बरेच वेळा त्यातूनही काही सांगायचं असतं हे चित्रकारालाच उमगलेलं नसे. मुक्तछंद कवितेसारखं काहीसं होतं ते. पण समोरची अमूर्त चित्रं तशी नव्हती. ती काढणारी व्यक्ती गोंधळलेली होती, धुक्यात वाट हरवावी तशी हरवलेली होती आणि तो सगळा गोंधळ, हरवल्यामुळे आलेली असहाय्यता थेट मनाला भिडत होती. सगळी चित्रं एकदा पाहून झाल्यावर त्या हळुवारपणे नवऱ्याला म्हणाल्या, "तुम्ही शनिवारी गेला होतात ती विप्लवि का ही?"

डॉ. जोशी जणू कुठल्यातरी प्रश्नाचीच वाट पहात असावेत कारण लगेच त्यांनी सगळी केस सांगितली आणि त्यांचं झालेलं मतही. ऐकून श्यामलताईही मनातून हलल्या. "तुम्ही सुभाष आणि वसुंधराशी बोललात यावर?"

"नाही गं… आज त्या दोघी या वह्या देऊन गेल्या तेव्हापासून विचार करतो आहे. नंतरच्या सगळ्या अपॉईंटमेंटही रद्द केल्या. तुला माहिती आहे, मी एरवी माझ्या केसेसबद्दल काहीच सांगत नाही. पण यावेळी का माहीत नाही, पण मला तुझं मत घ्यावंसं वाटतंय. तुला काय वाटतं? माझं जे मत तयार झालंय त्यात तथ्य आहे? वैद्यकीय दृष्टीने नाही विचारत. पण एक स्त्री म्हणून सांग."

"तुम्हांला तर माहिती आहे, आपल्यावेळी या गोष्टींवर विशेष चर्चा होत नसे. 'वेळ आली की होईल सगळं नीट' हाच बहुतेकवेळा दृष्टीकोन असायचा. पण पुढे शिकल्यावर, आपलं लग्न झालं, मी आई झाले, तुम्ही मानसोपचारतज्ञ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलंत - त्या दर वेळी मला वाटायचं 'होईल सगळं नीट' हे आत्तापर्यंत ठीक होतं, पण दिवसें-दिवस मुली वयात येण्याचं वय कमी होतंय. न्युक्लियर कुटुंबामुळे म्हणा, काळाची किंवा पैशाची गरज म्हणा, आई-वडिल दोघे उच्चशिक्षीत असले तर करीयर म्हणून म्हणा - पण मुला-मुलींना घरी सोबत, संस्कार, वेळ पडली तर धीर हे सगळं द्यायला घरात माणसं असतात कुठे! कदाचित वयात येताना शरीरात आणि मनात होणारे बदल पेलणं म्हणूनच कठीण होत असेल का? विप्लविच्या बाबतीत यातले बहुतेक सगळे मुद्दे गैरलागू आहेत खरे, पण माणसाच्या मनाचे व्यापार कोणाला उलगडलेत पूर्णपणे?"

श्यामलताई जरी मुख्यतः गृहिणी असल्या, तरी त्या एक अतिशय संवेदनाशील मन असलेली व्यक्ती होत्या हे पुन्हा एकदा त्यांना जाणवलं. एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून त्यांनी डॉक्टरांचं मत योग्यच होतं याची जणू नकळत पावतीच दिली होती. ते म्हणाले, "श्यामल, असं कर, तुला आवडतील ती चित्रं निवड या वह्यांतली. मी विप्लविला कबूल केलंय. मी एक फोन करतो आणि येतोच झोपायला." श्यामलताई दोन्ही वह्या घेऊन बेडरूमकडे पुन्हा वळल्या. डॉक्टरांनी सुभाषला फोन लावला आणि शक्य असेल तर दुसऱ्याच दिवशी त्याला आणि वसुंधराला संध्याकाळी क्लिनिकमध्ये बोलवलं.

संध्याकाळी ठरलेल्या वेळेच्या आधीच सुभाष आणि वसुंधरा दोघेही क्लिनिकमध्ये पोहोचले होते. डॉक्टरांनी मुद्दाम फोन करुन दोघांना यायला सांगितलं त्याचा अर्थ त्यांना काहीतरी उपाय सापडला असावा अशी दोघेही आशा करत होते. पण "आई चिंती ते वैरी न चिंती" अशी वसुंधराची अवस्था झाली होती. आधीचा पेशंट बाहेर पडला तरी बोलावणे येईना तशी दोघेही क्षणाक्षणाला अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागले. शेवटी एकदाचे रिसेप्शनिस्टनी दोघांना आत जायला सांगितले.

"काका, विपू होईल ना पुन्हा पुर्वीसारखी?" खुर्चीत बसेपर्यंतही सुभाषला धीर नव्हता!

"अरे, हो, हो! आधी बसा तर दोघे. सुभाष, तू ऑफिसमधून सरळ इकडेच आला आहेस का? दोघे चहा-कॉफी काही घेणार का?"

"डॉक्टर, चहा, कॉफी काही नको. आधी विपूला बरं करा…"

"वसुंधरा, तू काय पाहिलंस याच्यात? किती उतावळा आहे हा! बरं, बरं… चिडू नकोस. सांगतो सगळं. मला वाटतं, की खूप लहान वयात मासिक पाळी सुरु होण्याचे हे परिणाम आहेत. थोडक्यातर सांगायचं तर, त्या एका घटनेने होणारे शारीरिक आणि मानसिक बदल तर होऊ लागतात, पण लहान वयामुळे ते पेलण्याची मानसिक, बौद्धिक क्षमता असतेच असं नाही. काही वेळेस मुलींच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना भोवती सगळ्या मुलीच असल्यामुळे एक प्रकारे सुरक्षिततेचं कवच मिळतं, पण विप्लवि को-एड मध्ये जाते. अश्या वेळेस बरोबरीच्या मुलींपेक्षा वेगळं असल्याची भावना तर येतेच, पण जोडीला हार्मोन्समधील बदलांमुळे भावनिक गोंधळ होतात, नवीन अनुभव जोडीला नवी आकर्षणे घेऊन येतात. पण त्यांचा अर्थ कळण्याइतकी मानसिक आणि बौद्धिक परिपक्वता नसते. या गोष्टींतले चांगले-वाईट, बरोबर-चूक कसे ओळखायचे याचा मग गोंधळ होऊ लागतो. त्यामुळे पुष्कळ वेळा डिप्रेशन, मूड सारखे बदलणं असे प्रकार होऊ शकतात. कालपर्यंत तिला ज्या पुरुषांच्या सहवासात सुरक्षित वाटत होतं - आज अचानक तिचा गोंधळ उडतो, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही समजेनासं होतं. मग त्यात आपलेच बाबा, आजोबाही येतात. त्यापेक्षा आई-आजी जास्त विश्वासू वाटतात."

"डिप्रेशन? काका, अहो तिला त्या शब्दाचं स्पेलिंग कदाचित येत असेल, पण त्याचा अर्थ तरी तिला कळण्याचं वय आहे का?" सुभाष हे सगळं ऐकून डिनायलमध्ये असल्यासारखं वाटत होतं त्याच्या बोलण्यावरुन.

"अरे, डिप्रेशनसारख्या गोष्टी वय, माणूस पाहून होतात का? मी म्हणालो तश्या प्रकारचं संशोधन परदेशी मोठ्याच प्रमाणावर होतं, कारण त्यामानाने मानसोपचारतज्ञाची मदत सहजपणे घेतली जाते. पण भारतात अजुनही ते थोडं कठीणच आहे. त्यामुळे विप्लविसारख्या केसेसवर संशोधन होऊन इथल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचा आणि विप्लविला होणाऱ्या त्रासाचा संबंध काय यावर फारशी शास्त्रीय माहिती नाही. पण त्याऐवजी सुदैवाने तिच्या भोवती आम्ही ज्याला चांगली सपोर्ट सिस्टीम म्हणतो, ती आहे. एका दोन दिवसांच्या, चर्चच्या पायरीवर टाकलेल्या मुलीला तिचे आई-वडिल कोण याची अजिबात पर्वा-चौकशी न करता तुम्ही तिला आपलं म्हटलंत - नुसतं नावापुरतं नाही, तर वसुंधरा विप्लवि खरोखरीच तिच्या पोटी जन्माला आली असावी इतक्या मायेनी, प्रेमानी, खरंच आपली मुलगी म्हणून तिला वाढवते आहे. तिनेच सांगितलं त्यावरुन तर आत्ता-आत्तापर्यंत सुभाष आणि विप्लवि म्हणजे बाप-लेकीचं नातं किती निर्मळ आणि प्रेमळ असावं याचा नमुना होतं. आणि नुसतं तुम्ही दोघांचंच नव्हे तर तिला दोन्हीकडच्या आजी-आजोंबांचंही प्रेम मिळालं. विप्लविनेही साजेसा प्रतिसाद दिलाय. घरातले संस्कार आणि उपजत बुद्धीमत्ता याच्या जोडीला अतिशय संवेदनाशील मन आणि उच्च प्रतिभा लागलेली एक अतिशय भाग्यवान मुलगी आहे ती. पण तिच्या वर्गात मासिक पाळी सुरु झालेली ती एकटीच मुलगी आहे, बरोबर ना?"

वसुने होकारार्थी मान हलवली.

"म्हणजे, जेव्हा तिला शाळेत काही अॅक्टिव्हिटीजमध्ये गेल्या दोन महिन्यांत भाग घेता आला नसेल तेव्हा ती वर्गातल्या इतरांपेक्षा वेगळी पडली. बरं, तिने याचं कारण कोणाला सांगितलं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मैत्रिणींच्या प्रश्नांना गप्प राहण्याखेरीज तिच्याकडे उत्तर नाही. साहजिकच ती शाळेत कदाचित थोडी एकटी पडली असेल. मासिक पाळी सुरु झाल्यामुळे तिचं शरीर पौगंडावस्थेत प्रवेश करु पाहतंय, पण तिच्या शरीराची आणि त्याहीपेक्षा तिच्या मनाची हे इतके बदल पेलण्याची अजुन तयारी नाही. या सगळ्यामुळे ती थोडीशी डिप्रेशनमध्ये गेली आहे, मूडी झाली आहे. तुम्ही केवळ तिचे आई-बाबा म्हणून नाही तर त्रयस्थपणेही विचार केलात तर तुम्हांला लक्षात येईल - ८-९ वर्षांची मुलगी, जिचं शरीर तिला पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर नेऊ पाहतंय पण मनानी ती अजुन तिच्या वयाच्या मुलींसारखीच हळुहळु मोठी होतेय; थोडक्यात शरीर आणि मन यांची ओढाताण किंवा गुंतागुंत होत असल्याने ती खूप गोंधळली आहे, थोडी घाबरलेली आहे. शरीरातल्या बदलांमुळे तुम्ही तिला सावध केलंत जे करणं तिच्याच सुरक्षिततेसाठी योग्यही होतं. मनानी ८-९ वर्षाच्याच असलेल्या मुलीचा मात्र गोंधळ उडाला आहे कारण नक्की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून जपुन रहायचं हे समजण्याचं तिचं वय नाही. जेव्हा हीच गोष्ट सर्वसाधारण वयात होते तेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही वाढीच्या एकाच टप्प्यावर असतात. शारीरिक वाढीबरोबरच मनालाही तारुण्याची ओढ लागायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हे असं डिप्रेशनचं स्टेशन त्या प्रवासात लागतच नाही."

"आई गं! माझं पिल्लू… काय करुन बसलो आम्ही! तिला सगळ्यांत जास्त आमची गरज होती तेव्हाच नेमकं तिला आम्ही समजून घेऊ शकलो नाही! डॉक्टर, यावर उपाय नाही का काही?"

"सुभाष, वसुंधरा - आधी तुम्ही स्वतःला दोषी ठरवणं थांबवा बरं! आणि घरी गेलात की आई-बाबांनाही हे सगळं सांगा. वसुंधरा, तू म्हणालीस तशी तिची मासिक पाळी इतक्या लवकर सुरु होईल हे मनात यायचं काहीच कारण नव्हतं. सर्वसाधारणपणे आईची ज्या वयात सुरु होते, त्याच सुमारास मुलीचीही सुरु होते. पण विप्लविचे जन्मदाते कोण हे दुर्दैवाने आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. पण हा झाला इतिहास. तुम्ही दोघांनी सगळ्यांत चांगली गोष्ट केलीत की फार उशीर व्हायच्या आत वैद्यकीय मदत घेतलीत. आत्ताशी हा प्रश्न उभा राहून दोन-तीन महिने होताहेत. त्यामुळे काळ आपल्या बाजूला आहे. काऊन्सेलिंग आणि लागलंच तर तिच्या वयाला योग्य असं एखादं औषध याच्या आधारे हा प्रश्न अगदी नक्की सुटेल. आणि आपण सगळेच आहोत ना, विप्लविला मदत करायला! तिची चित्रं मी माझ्या बायकोला दाखवली. तिने एके काळी जे.जे. मधून फाईन आर्टचा डिप्लोमा घेतलेला आहे. त्यामुळे विप्लविच्या चित्राची निवड करण्याचं काम मी तिच्यावर सोपवून मोकळा झालोय. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या केसबद्दल मी तिच्याशी बोललो. पण त्यात माझा एक हेतू होता - माझ्या अंदाजाप्रमाणेच विप्लविने काढलेली चित्रं पाहून श्यामल खूपच प्रभावित झाली. त्यामुळे बाकीचे उपचार करत असतानाच तुमची इच्छा आणि तयारी असेल तर आपण श्यामलला सांगू शकतो विप्लविला चित्रकलेचं नीट शिक्षण द्यायला."

"काका, खरंच हे सगळं असं होईल? गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच आम्हांला आशेचा किरण दाखवलात तुम्ही! आणि काकू खरंच शिकवतील विपूला? अहो, विप्लवि जेमतेम रेघोट्या ओढते कागदावर!"

"सुभाष, विप्लविची चित्रं तू शेवटी कधी पाहिली होतीस?" सुभाषचा गोरामोरा झालेला चेहरा पाहून डॉ. जोशी म्हणाले, "वाटलंच मला, पिकतं तिथे विकत नाही! अरे, श्यामल तर फार प्रभावित झाली आहे तिची चित्रं पाहून. आणि तिच्या सहवासात राहून मी एक गोष्ट शिकलोय, चित्र काढण्याची कला जशी अंगी बाणवण्यासाठी शास्त्रोक्त शिक्षणाची गरज असते, तशीच चित्र पाहण्याची नजरही तयार व्हावी लागते. ती माझी इतक्या वर्षांत नाही झाली, बहुधा तुझाही ठणठणगोपाळच दिसतोय याबाबतीत. पण माझी खात्री आहे, विप्लविला या शिक्षणाने नक्की मदत होईल. आपण असं करु, तुम्ही बाहेर पडलात की रिसेप्शनिस्टकडे विप्लविसाठी दर आठवड्याची अपॉईंटमेंट घेऊनच टाका - सध्या पुढचे सहा महिने तरी. आणि श्यामलची अपॉईँटमेंट घ्यायला तुम्ही सगळे - अगदी आई-बाबांसकट - एखाद्या शनिवारी किंवा रविवारी घरीच या कसे!"

"काका, शनिवारी नको… आमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही शनिवारीसुद्धा कन्सल्टींग करता असं दिसतंय. त्यापेक्षा रविवारच बरा.. काय वसु?" यावर सगळेच खळखळुन हसले. सुभाष आणि वसु तर दोन-तीन महिन्यांनी इतक्या मोकळेपणानी हसले असतील. क्लिनिकमधून बाहेर पडताना दुपारच्या रखरखीत उन्हातही त्यांना खात्री होती त्यांच्या आयुष्यात नवी पहाट नक्की उगवणार होती. एक नवी आशा उराशी धरुन दोघे गाडीकडे जाऊ लागले.

- ~ - ~ -